‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 08:45 AM2022-05-29T08:45:28+5:302022-05-29T08:46:14+5:30

सन 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी 74 पुरस्कार्थींची निवड

konkan marathi sahitya parishad announced literary and non literary awards of last three years | ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर!

‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर!

Next

ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे वाङ्मयीन तसेच वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांच्या मानकऱ्यांची घोषणा शनिवारी, 28 मे 2022 रोजी करण्यात आली. यावेळी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि पालघर येथे होणाऱ्या महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे या उपस्थित होत्या. कोमसापकडून गेल्या तीन वर्षांतील 74 पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे. 11  व 12 जून रोजी पालघर येथे होणाऱ्या कोमसापच्या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभावेळी विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचा वितरणसोहळा संपन्न होईल.

मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड प्रयत्नशील असणाऱ्या कोमसापकडून गेल्या 25 वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. परंतु कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्कारांचे वितरण शक्य झाले नाही. त्यामुळे आता कोरोनाचा झाकोळ दूर झाल्यानंतर कोमसापकडून सन 2018-19, 2019-20 आणि 2020-21 अशा गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान देणाऱ्या तब्बल 74 पुरस्कार्थींचा समावेश आहे. प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार्थींची निवड केली आहे.

कोमसापने 11 व 12 जून 2022 रोजी पालघर येथे प्रसिद्ध लेखिका-संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या उपस्थित राहणार असून राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत. या संमेलनाच्या समारोप समारंभावेळी, 12 जून रोजी विशेष कार्यक्रमात वरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि ज्येष्ठ कवयित्री-लेखिका नीरजा या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या विशेष अतिथी असून कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष मोनिका गजेंद्रगडकर, स्वागताध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल, अशी माहिती कोमसापचे प्रसिद्धी प्रमुख जयु भाटकर यांनी दिली. 
 

Web Title: konkan marathi sahitya parishad announced literary and non literary awards of last three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे