वेतनश्रेणी, निवृत्तीवेतनासाठी बालवाडी शिक्षिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:38 AM2019-11-22T00:38:24+5:302019-11-22T00:38:26+5:30

पोलिसांची मध्यस्थी; बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित, सोमवारी आयुक्तांसमवेत होणार बैठक

Kindergarten teachers' agitation for salary category, pension | वेतनश्रेणी, निवृत्तीवेतनासाठी बालवाडी शिक्षिकांचे आंदोलन

वेतनश्रेणी, निवृत्तीवेतनासाठी बालवाडी शिक्षिकांचे आंदोलन

Next

कल्याण : वेतनश्रेणी व निवृत्तीवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी केडीएमसीच्या बालवाडी शिक्षिकांनी गुरुवारी महाराष्ट्र हुतात्मा दिनाचे औचित्य साधत पश्चिमेतील शिवाजी चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. वरिष्ठ नागरिक परिसंघ, ठाणे जिल्हा संलग्न भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, आंदोलनापूर्वी आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी चर्चेसाठी यावे, असे पत्र संघटनेला दिले होते. परंतु, आयुक्तांकडून आमची केवळ फसवणूकच सुरू आहे, असा आरोप करीत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर, बाजारपेठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. आता सोमवारी आयुक्तांकडे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

केडीएमसीत सध्या ६८ बालवाडी शिक्षिका असून, त्यांना आठ हजार रुपये मानधन मिळते. तर, ४८ शिक्षिका निवृत्त झाल्या असून, त्यांना कोणत्याही प्रकारे निवृत्तीवेतन मिळत नाही. २५ सप्टेंबर १९९६ ला ९५० ते १७५० रुपये, असा वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर झाला असतानाही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रमुख मागणीसह निवृत्तीवेतन लागू करावे, अशी मागणी बालवाडी शिक्षिकांची आहे.

शिक्षिकांनी याआधी ८ मार्चला उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. परंतु, प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यावेळी बालवाडी शिक्षिकांना बोडके यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, त्यांना मंत्रालयात बैठकीला जावे लागल्याने शिक्षिकांच्या मागण्या प्रलंबितच राहिल्या. कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शिक्षिकांच्या वतीने १७ सप्टेंबर २०१९ ला भरपावसात आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल महापालिकेने घेतलेली नव्हती. त्यामुळे मागण्यांसाठी गुरुवारी पुन्हा हुतात्मा दिनाचे औचित्य साधत बेमुदत उपोषणाला त्यांनी प्रारंभ केला. तत्पूर्वी, आयुक्तांकडून सोमवारी चर्चा करू, असे पत्र आंदोलनकर्त्यांना पाठविण्यात आले होते. परंतु, हे पत्र धुडकावून लावत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. यातील बहुतांश शिक्षिका या ६० वर्षे व ६५ वयोगटांतील असल्याने त्यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडण्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी महापालिकेचे उपायुक्त मिलिंद धाट यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, आम्ही त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. त्यांना चर्चेसाठीही बोलावले आहे. मात्र, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवल्याचे धाट यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर पोलीस अधिकाºयांनी आयुक्त बोडके यांचीही भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.
आयुक्तांनीही शिक्षिकांना सोमवारी चर्चेसाठी बोलावल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास नकार दिला. अखेर, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. सोमवारच्या चर्चेचे पत्र आंदोलनकर्त्या शिक्षिकांकडून स्वीकारण्यात आले.

...तर दालनातच ठिय्या मांडू
दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बेमुदत उपोषण तूर्तास मागे घेऊन सोमवारी आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय शिक्षिकांनी घेतला आहे. जर सोमवारी चर्चा नाही झाली आणि न्याय नाही मिळाला, तर आयुक्तांच्या दालनातच ठिय्या मांडणार, असा पवित्रा शिक्षिकांनी घेतला आहे.

Web Title: Kindergarten teachers' agitation for salary category, pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.