कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो

By जितेंद्र कालेकर | Published: November 26, 2019 11:27 PM2019-11-26T23:27:45+5:302019-11-26T23:38:53+5:30

कसाब आणि आमच्यात त्या रात्री सुमारे अर्धा तासभर धुमश्चक्री झाली. त्याचवेळी त्याने हॅन्डग्रेनेड फेकून गोळीबारही केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झालो. कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो, अशा शब्दात ‘पराक्रम पदक’ प्राप्त करणारे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Kasab's use of handgrenade caused serious injuries | कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो

कसाबने हॅन्डगे्रनेडचा वापर केल्याने गंभीरजखमी झालो

Next
ठळक मुद्देकसाबने हॅन्डगे्रनेडचा वापर केल्याने गंभीर जखमी झालोपराक्रम पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी व्यक्त केल्या भावना ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकात सध्या कार्यरत

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईतील कामा हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावरील दोन सुरक्षारक्षकांवर गोळीबार करुन त्यांना ठार केल्यानंतर कसाबसह दोघे अतिरेकी आत शिरले होते. त्यांचाच पाठलाग करीत आम्ही सहाव्या मजल्यावर पोहचलो होतो. कसाब आणि आमच्यात धुमश्चक्री झाली. त्याचवेळी त्याने हॅन्डग्रेनेड फेकून गोळीबारही केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झालो. कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो, अशा शब्दात ‘पराक्रम पदक’ प्राप्त करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्याच्या भावना व्यक्त केल्या.
संपूर्ण देशभर मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि एनएसजी कमांडोंना मंगळवारी आदरांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त या हल्ल्यात मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस कामा हॉस्पीटलमध्ये आपल्या पथकासह मोठया धाडसाने शिरकाव करून कसाबशी दोन हात करणाऱ्या पोवार यांनी २६ -११ च्या आठवणींना उजाळा दिला. २६ नोव्हेंबर २००८ ची ती रात्र. मुंबईतील आझादनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकात पोवार (सध्या ठाण्यातील अमली पदार्थ विरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक) हे कार्यरत होते. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल (सीएसटी) स्थानकात गोळीबार सुरू असल्याची माहिती रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. ती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे (सध्या ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्यासह चार ते पाच कर्मचाऱ्यांसह ९ वाजून २० मिनिटांनी सीएसटी स्थानकामध्ये पोहचले. त्याठिकाणी अनेकजण जखमी अवस्थेमध्ये सीएसटीमधून बाहेर पडत होते. एकच पळापळ सुरू होती. काही प्रवाशांवर अदांधुंद गोळीबार झाल्याने ते गंभीर अवस्थेत खाली पडले होते. हे धक्कादायक चित्र पाहून मन खंबीर करून आठ ते दहा जखमींना पोवार आणि शिंदे यांच्या पथकाने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी सीएसटीतून अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल हे दोघे अतिरेकी बाहेर पडले. त्यांनी मेट्रो जंक्शनकडे जाणा-या रस्त्याने कामा हॉस्पीटलमध्ये शिरकाव केला. प्रवेशद्वारावरील दोन सुरक्षारक्षकांवर गोळीबार करून त्यांना ठार करून ते आत शिरले. तोपर्यंत तिथे पोहचलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याबरोबर पोवार आणि शिंदे यांचे पथकही कामामध्ये शिरले. त्यावेळी कामाच्या गच्चीवरून कसाब अंदाधुंद गोळीबार करीत होता. दाते, पोवार आणि शिंदे यांचे पथक तसेच कसाब आणि अबू हे दोघे अतिरेकी यांच्यात अर्धा तास गोळीबाराच्या फैरी सुरू होत्या. सहाव्या मजल्यावरुन पोलिसांचे हे पथक अतिरेक्यांशी दोन हात करीत होते. तर सहाव्या मजल्यानंतर गच्चीवरूनच कसाबचा या पथकावर गोळीबार सुरू होता.
त्यावेळी कसाबच्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खांडेकर हे शहीद झाले. दाते यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्याचवेळी पोवार यांच्या हाताच्या उजव्या दंडाला गोळी लागली. तर हँन्डग्रेनेड फेकल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांनाही गंभीर जखम होऊन ते बेशुद्ध झाले. तर सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या उजव्या पायाला गोळी लागली. पोवार बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. दुस-या दिवशी ते शुद्धीवर आले. पोवार, शिंदे यांच्यासह दहा पोलिसांच्या या धाडसी पराक्रमाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना २०१३ मध्ये पराक्रम पदक जाहीर केले. ते त्यांना २५ जानेवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आले. आज २६ नोव्हेंबर २०१९ रोजी तब्बल ११ वर्षांनंतरही हा प्रसंग डोळयासमोर उभा रहातो. संपूर्ण पोलीस सेवेत अशा प्रकारचा हल्ला आणि त्याला प्रतिकार करण्याचा प्रसंग आयुष्यात प्रथमच मोठ्या धाडसाने अनुभवला. कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात करून देश संरक्षणासाठी आपले योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचे पोवार म्हणाले.

Web Title: Kasab's use of handgrenade caused serious injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.