कल्याणमध्ये ‘ती’ कुटुंबे आजही जगताहेत भीतीच्या सावटाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:52 AM2020-08-11T00:52:26+5:302020-08-11T00:52:31+5:30

नेतिवली, कचोरे टेकडीचा धोका कायम; जाळ्या लावण्याचे काम रखडले

In Kalyan, 'she' families are still living under fear! | कल्याणमध्ये ‘ती’ कुटुंबे आजही जगताहेत भीतीच्या सावटाखाली!

कल्याणमध्ये ‘ती’ कुटुंबे आजही जगताहेत भीतीच्या सावटाखाली!

Next

कल्याण : मुंबईतील पश्चिम उपनगरांत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कांदिवलीजवळ दरड कोसळल्याची तर, मुंब्रा बायपास मार्गावर भूस्खलन होऊन दगडमातीचा ढीग रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे धोकादायक दरडींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पत्रीपुलानजीकच्या नेतिवली आणि कचोरे-हनुमाननगर टेकडीवरही माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पावसात तेथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये भीतीचे सावट असते. धोकादायक दरडींबाबत केडीएमसीने संरक्षक भिंत तसेच जाळ्या लावण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, ते अर्धवट राहिल्याने टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका कायम आहे.

कल्याणच्या दक्षिणेला पत्रीपुलाजवळ प्रशस्त पसरलेल्या हिरव्यागार नेतिवली आणि कचोरे टेकडीवर झोपड्या, चाळींचे अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी रेल्वेने मुंबईकडून कल्याणमध्ये प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर ही निसर्गरम्य टेकडी नागरिकांचे स्वागत करीत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत टेकडीच्या पायथ्यापासून सर्व जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते.

टेकडीवर आणि पायथ्याशी सुमारे साडेचारशे ते पाचशे कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. २००९ मध्ये दरड कोसळून येथे एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तिघे गंभीर जखमी झाले होते. तर, २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू तर, सहा जण जखमी झाले होते. २०११ च्या मार्चमध्ये घडलेल्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते.

२०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये दरड कोसळली होती. परंतु, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे येथील हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. यावेळीही कोणतीही हानी झाली नव्हती. या घटनेनंतर नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. परंतु, हे काम अर्धवट राहिले आहे. पावसाळ्यात अथवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर तेथील रहिवाशांना सतर्कतेच्या आणि स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र ठोस कारवाईअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.

‘ते’ काम खर्चिक : टेकडीच्या परिसरात राहणाºया रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. कचोरे येथील हनुमाननगरमध्ये टेकडीवर संरक्षक खांब लावले आहेत. परंतु, नेतिवली येथे संरक्षक जाळी आणि भिंत बांधण्याचे काम केले जाणार होते. परंतु, ते काम खर्चिक असल्याने होऊ शकलेले नाही. संबंधित जागा वनविभागाची असल्याने त्यांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.
- भरत पाटील,
‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसी

Web Title: In Kalyan, 'she' families are still living under fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.