Kalyan Lok Sabha election result 2019 news | कल्याण लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्साह वाढत गेला; शिंदेंचा विजय स्पष्ट होताच जल्लोष
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्साह वाढत गेला; शिंदेंचा विजय स्पष्ट होताच जल्लोष

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटच्या (टपाल मतदान) मतमोजणीला प्रारंभ झाला. ही मतमोजणी सुरू असतानाच ईव्हीएम मशीनमधील प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्टÑवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पहिल्या फेरीनंतर...
डॉ. शिंदे यांनी सकाळीच डोंबिवलीतील श्री गणपती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी क्रीडासंकुलातील मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. यावेळी फारसे कार्यकर्तेही उपस्थित नव्हते.
घरडा सर्कल जवळील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने तेथे काही जण क्रिकेट खेळत होते. मात्र, मतमोजणी सुरू होताच शिंदे यांनी ९४६ मतांनी आघाडी घेतली. सकाळी १० वाजता पहिल्या फेरीतील मतांचा आकडा जाहीर करण्यात आला. शिंदे यांची आघाडी वाढू लागताच कार्यकर्ते केंद्राबाहेर येऊ लागले. सकाळी ११ वाजता दुसऱ्या फेरीचा आकडा जाहीर करण्यात आला. शिंदे यांची आघाडी वाढू लागताच पाटील यांच्या चेहºयावर अस्वस्थता उमटू लागली.

तिस-या फेरीनंतर...
दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी तिसºया फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये शिंदे यांनी ५४ हजार ८६१ मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर, शिवसेनेचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन आले. तिसºया फेरीचा निकाल जाहीर झाल्यावर जवळपास दोन तासांनी चौथ्या फेरीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, घरडा सर्कलचा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने या रस्त्यावर मुलांनी पकडापकडी खेळण्याचा आनंद लुटला.

चौथ्या फेरीनंतर...
पाटील यांनी चौथ्या फेरीनंतर मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. रिक्षातून त्यांनी आपले घर गाठले. पाटील यांनी घर गाठले, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना ते आघाडी घेतील, अशी आशा कायम होती. त्यामुळे त्यांनी केंद्राबाहेरच राहणे पसंत केले. कोणता उमेदवार कधी आघाडी घेईल, हे सांगता येणार नाही, असे कार्यकर्ते सांगत होते. चौथ्या फेरीची आकडेवारी येण्यास उशीर झाला. मात्र, शिंदे यांनी घेतलेली आघाडी पाहून आमदार बालाजी किणीकर, शरद गंभीरराव, तात्या माने यांची पावले क्रीडासंकुलाकडे वळली. स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, युवासेनेचे योगेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डॉ. शिंदेसमवेत मतदान केंद्रामध्ये चर्चा केली. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यकर्ते जमू लागल्यावर त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था या शेडमध्ये करण्यात आली.

आठव्या फेरीनंतर...
आठव्या फेरीच्या निकालानंतर शिंदे यांच्या विजयाची चिन्हे दिसू लागताच किणीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या फेरीनंतर शिंदे यांनी एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. फटाक्यांची आतषबाजी आणि नाचून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. घोषणा देऊ न परिसर दणाणून सोडला. आम्हाला विजयाची खात्री असल्याने आधीच जल्लोषाची तयारी केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

बाराव्या फेरीनंतर...
दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर घरडा सर्कलजवळच्या परिसरात शुकशुकाट होता. संध्याकाळी शिंदे यांची बाराव्या फेरीनंतर दोन लाखांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी वाढून तीन लाखांच्या पुढे गेल्याने कार्यकर्ते मतमोजणी केंद्राजवळ जमू लागले. शहराच्या मध्यवर्ती शाखेजवळ कार्यकर्त्यांनी मावळचे ढोलपथक, बॅण्डबाजाच्या ठेक्यावर नाचत जयघोष केला. कार्यकर्त्यांनी भगवे कपडे परिधान करून गुलाल उधळला. ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है’चा नारा देण्यात आला.

पालकमंत्री येताच केला जल्लोष

डोंबिवली : शिवसेनेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. सायंकाळी ७.३० च्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मतमोजणी केंद्राजवळ येताच कार्यकर्ते, सेनेचे पदाधिकारी यांच्या जल्लोष, आनंदाला पारावर उरला नव्हता. ढोलाच्या तालावर भगवे झेंडे आसमंतात फडकवत कार्यकर्त्यांनी ठेका धरला. कार्यकर्त्यांचा जोश पाहून एकनाथ शिंदेही हरकून गेले. सर्वांनी आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. श्रीकांत शिंदे यांनी केलेले कामच यातून दिसत आहे, त्याचा खूप आनंद आहे. पण, मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे थोडा धीर धरा, असे सांगत त्यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. काही वेळाने डॉ. शिंदे हे पालकमंत्र्यांना घेऊन बाहेर आले आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आले. ‘ए वाजव रे’चा जयघोष झाला, आमचा नेता एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे अशा घोषणाही दिल्या. सर्वप्रथम राजेश मोरे यांनी पालकमंत्र्यांना गुलाल लावला. पालकमंत्र्यांनी डॉ. शिंदे यांना आणि त्यानंतर डॉ. शिंदे यांच्या पत्नीही जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. गुलाल उधळत, फटाके फोडून कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते. आमदार सुभाष भोईर, जनार्दन म्हात्रे, तात्या माने, विवेक खामकर, कविता गावंड, रमेश म्हात्रे, रवी म्हात्रे, योगेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भाजपतर्फे विजयोत्सव साजरा

डोंबिवली : लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी चैतन्य पसरले. शहरातील पूर्व मंडल, पश्चिम मंडल, तसेच कल्याण ग्रामीणमध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे पोस्टर हातात घेत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री चव्हाण यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. पश्चिम मंडलाचे अध्यक्ष संजीव बीडवाडकर, रवी ठाकूर, नगरसेवक विशू पेडणेकर, विश्वदीप पवार, स्थायीचे सदस्य नितीन पाटील, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, राजन आभाळे, नगरसेविका खुशबू चौधरी, विद्या म्हात्रे, रेखा चौधरी, प्रमिला चौधरी यांच्यासह शहरामधील विविध पदाधिकाºयांनी, असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. पूर्वेतील रेल्वेस्थानकासमोरील पूर्व मंडल कार्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच मोदी, फडणवीस, चव्हाण, कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड यांच्या छबी असलेले पोस्टर सर्वत्र झळकावण्यात आले. पश्चिमेलाही घनश्याम गुप्ते रस्ता, सम्राट चौकानजीक राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर प्रचंड जल्लोष करण्यात आला.

जनतेचा कौल महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामुळे पक्षाला प्रचंड यश जनतेने दिले आहे. त्या यशामध्ये जनतेने जो कौल दिला, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ही मजल गाठता आली. पक्षाची जनतेशी असलेली घट्ट नाळ हीच आजच्या विजयमधून दिसून आली. आता विधानसभा लक्ष असून त्यातही विजय मिळेल. - रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री


Web Title: Kalyan Lok Sabha election result 2019 news
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.