Kalyan Lok Sabha election result 2019: The fort of Kalyan is maintained by Shivsena | कल्याण लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कल्याणचा गड शिवसेनेने राखला! महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरभरून मते
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कल्याणचा गड शिवसेनेने राखला! महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरभरून मते

- प्रशांत माने

कल्याण - लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे गुरुवारी पुन्हा स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघाच्या झालेल्या मतमोजणीदरम्यान शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकल्याने ते आता दुसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्ली गाठणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. तर, बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली असली, तरी त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

२०१४ मध्ये शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा ते नवखे होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा अडीच लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यावेळी मताधिक्य वाढण्यासाठी मोदीलाट कारणीभूत ठरली होती. परंतु, यंदा अशी कोणतीही लाट नसताना त्यांना अडीच लाखांहून अधिक मिळालेले मताधिक्य पाहता त्यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना एकप्रकारे मतदारांनी पोचपावती दिल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत ३३ वर्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार कल्याण मतदारसंघाला मिळाला होता. पाटील यांनीही या मुद्याचा प्रचारात पुरेपूर वापर केला. प्रसंगी उपराविरुद्ध स्थानिक असाही प्रचाराचा कल राष्ट्रवादीकडून निवडणुकीदरम्यान राहिला. त्यात भूमिपुत्र असल्याने भूमिपुत्रांची साडेतीन लाख मते आपल्यालाच मिळतील, असा दावाही पाटील यांच्याकडून केला जात होता. परंतु, मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता ‘आगरीकार्ड’ फेल ठरल्याची चर्चा आता मतदारसंघात सर्वत्र सुरू आहे.

पाणीप्रश्न, दिवा डम्पिंग, वाहतूककोंडी, रस्त्यांची दुर्दशा, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दाही या निवडणुकीत विरोधकांकडून कळीचा ठरवण्यात आला होता. परंतु, विकासाचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरलेल्या शिंदे यांनाच मतदारांनी पुन्हा निवडून दिले.

२०१४ च्या निवडणुकीत शिंदे यांना चार लाख ४० हजार ८९२ मते मिळाली होती. पण, यंदा मात्र हा आकडा त्यापुढेही निघून गेल्याने दुसरीकडे कल्याण मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

सव्वा लाखाहून अधिक मते मिळवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटलांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना २३ फेरी अखेर ६२ हजार २३२ मते मिळाली. मात्र, या पक्षाचा फारसा प्रभाव पाहायला मिळाला नाही.
कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. परंतु, तीन उमेदवारांच्या पारड्यात मतदारांनी मते टाकल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले.

वाढीव मतदानाचा फायदा सेनेलाच

कल्याणमध्ये यंदा एकूण १९ लाख ६५ हजार १३० मतदारांपैकी आठ लाख ८९ हजार ८०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी मतदानाची टक्केवारी ४५.२८ इतकी होती. गतवेळेस ती ४२.८८ टक्के होती. साधारण वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते, याकडे लक्ष लागले होते. अखेर, भरभरून मते शिंदे यांच्या पारड्यात पडल्याने त्यांची दिल्लीवारी सुकर झाली आहे.

२०१४ ला एकूण मतदानाच्या १.११ टक्के म्हणजेच नऊ हजार १८५ इतक्या जणांनी ‘नोटा’चा वापर केला होता. यंदाही हा आकडा तेराव्या फेरीअखेर साडेसात हजारांच्या आसपास पोहोचला होता. तर, २३ व्या फेरीपर्यंत १२ हजार ०४३ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, १५ अपक्षांना २३ व्या फेरीपर्यंत साधारण चार हजारांच्या आसपास मते मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.

5 कारणे विजयाची
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या सत्तेचा झाला फायदा.
सक्षम पक्षसंघटन आणि कार्यकर्त्यांचा भक्कम जनसंपर्क ठरला मोलाचा.
उच्चशिक्षित, तसेच पाच वर्षांत केलेली विकासकामे ठरली जमेची बाजू.
वडील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्ह्यावरील प्रभाव ठरला निर्णायक.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमुळे वातावरणनिर्मिती.

बाबाजी पाटील यांच्या पराभवाची ५ कारणे
लोकसभा निवडणूक लढवण्याचा पहिलाच अनुभव, गाठीशी केवळ नगरसेवकपदाच्या निवडणुकीचा अनुभव. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत ते तुल्यबळ उमेदवार नव्हते. नियोजनाचाही अभाव.

पुरोगामी विचारसरणीच्या राष्ट्रवादी पक्षात आगरीकार्डचा प्रचारासाठी वापर. पक्षातील अन्य जातीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले. जातीच्या बोलबालामुळे इतर समाजही झाला नाराज.

पक्षांतर्गत कुरबुरी आणि गटबाजीचा फटका, विस्कळीत पक्षसंघटन, मर्जीतल्या लोकांना पदांचे वाटप, पात्रता नसतानाही दिलेली पदे यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढू शकलेली नाही.

पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. विधानसभा लढवण्यासाठी आग्रही होते. लोकसभेची उमेदवारी जबरदस्तीने लादली गेली. त्यामुळे ते एक प्रकारे नाखूशही होते.

निवडणूक प्रचारकाळात पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. त्यांच्याभोवती जी मंडळी होती, ती फारशी अनुभवी नव्हती. विश्वासात घेतले जात नाही, काही मोजकीच समाजाची मंडळी घेऊन प्रचार केला जात असल्याने कार्यकर्त्यांनीही सुरुवातीपासूनच पाटलांच्या प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले.

निवडणुकीत हार-जीत ही होतच असते
कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक शांततेने पार पडली. कोणतीही निवडणूक म्हटली की हार-जीत ही होतच असते. जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. माझ्या समाजासह अन्य सर्व समाजाने मला जे सहकार्य केले, त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. नागरीप्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी मला कधीही हाक मारा, मी निश्चित सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करीन.
- बाबाजी पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार, कल्याण मतदारसंघ

बाबाजी पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट

डोंबिवली - ठाणे महापालिकेतील नगरसेवक बाबाजी पाटील यांना राष्टÑवादीने कल्याण मतदारसंघातून थेट उमेदवारी दिली. विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आगरीकार्डची खेळी राष्टÑवादीने केली होती. ग्रामीण भागात आगरी समाजाचा मोठा दबदबा असल्याने त्यांनी याच मतांवर लक्ष केंद्रित करत प्रचाराची दिशा ठेवली. मात्र, आगरीकार्ड न चालल्याने शिवसेना-भाजपचे उमेदवार शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. मतमोजणीगणिक पराभव होत गेल्याने मतमोजणी केंद्राबरोबरच पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पसरला होता.
कल्याण मतदारसंघात सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच युतीचे उमेदवार डॉ. शिंदे आघाडीवर होते. तर, पाचव्या फेरीत त्यांनी ७४ हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर विजयाची आशाच पाटील यांनी सोडली. त्यामुळे दुपारी १२.३० वाजता पाटील मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी रिक्षातून आपल्या निवासस्थानाकडे जाणे पसंत केले. मुंब्रा ते अंबरनाथपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच राष्टÑवादीने पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, पहिल्या फेरीपासून पाटील पिछाडीवर पडले. पाटील यांचा पराभव दिसू लागल्याने त्यांच्या शीळफाटा येथील कार्यालयाबाहेर दुपारपासूनच शुकशुकाट होता. पाटील मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले असले, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना ते पुढच्या फेरीत तरी आघाडी घेतील, अशी अपेक्षा असल्याने त्यांनी केंद्राबाहेरच राहणे पसंत केले होते. मतदान प्रक्रियेत कोणता उमेदवार आघाडी घेईल, हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही अंतिम निर्णयाची वाट पाहत असल्याचे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.


Web Title: Kalyan Lok Sabha election result 2019: The fort of Kalyan is maintained by Shivsena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.