तू या शाळेत असणे आमच्यासाठी लज्जास्पद , मुख्याध्यापकांचे वाक्य जिव्हारी लागले : रिषभ कालिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:52 PM2020-07-05T16:52:37+5:302020-07-05T17:03:38+5:30

विद्यार्थ्यांसमोर यशवंतांनी आपला प्रेरणादायी प्रवास उलगडला.

It's a shame for us to be in this school, said the headmaster: Rishabh Kalia | तू या शाळेत असणे आमच्यासाठी लज्जास्पद , मुख्याध्यापकांचे वाक्य जिव्हारी लागले : रिषभ कालिया

तू या शाळेत असणे आमच्यासाठी लज्जास्पद , मुख्याध्यापकांचे वाक्य जिव्हारी लागले : रिषभ कालिया

Next
ठळक मुद्देसतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय उपक्रमई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" -दिवसः-चौथायशवंतांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे : इयत्ता सातवीत असताना आपल्या मस्तीखोर, खोडकर वृत्तीमुळे `तू या शाळेत असणे आमच्यासाठी, शाळेसाठी लज्जास्पद आहे' हे मुख्याध्यापकांचे वाक्य जिव्हारी लागलेला विद्यार्थी आपल्यावरील टीकेकडे सकारात्मकतेने पाहुन, `एक दिवस सर्वांना अभिमान वाटेल` ही जिद्द उराशी बाळगतो,आणि पुढे वयाच्या १२ व्या वर्षापासून जनसंवाद साधतो, इयत्ता दहावीत आदर्श विद्यार्थी म्हणून `हेड बॉय' चे पद मिळवतो, ` वर्ल्डस यंगेस्ट मोटिव्हेटर' ही बिरूदावलीने ओळखला जातो, हा सर्व अविश्वसनीय प्रवास जगातील सर्वांत तरुण मार्गदर्शक रिषभ कालिया यांनी आपल्या खास शैलीत मांडला. शाळा, महाविद्यालयाच्या चार भिंतींपलीकडच्या शिक्षणाचा ध्यास घ्या, स्वानुभवातून शिका, कमी वयातच ध्येय निश्चित करून त्याचा प्रयत्नपूर्वक मागोवा घ्या, ध्येयनिश्चिती झाल्यानंतर ते गाठण्यासाठी अविरत कष्ट करा, असा प्रेरणादायी सल्ला रिषभ यांनी दिला.   
    सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावर 'ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड.' ह्या  वेबिनारच्या पाचव्या `ऑनलाइन व्यासपीठ आणि ई लर्निंग कोर्सेस` या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा आणि  या सत्रात विविध क्षेत्रातील यशवंतांच्या अनुभवकथनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. `भारतीय जीवन कौशल्य शिक्षण संघटनेत` सदस्य म्हणून, तसेच `अनुभवात्मक शिक्षण  केंद्रात' प्रशिक्षण  सहकारी या पदांवर कार्यरत, नचिकेत जोशी यांनी  मार्गदर्शन  करताना सामान्यतः वापरात असलेल्या व शिक्षणक्षेत्राशी संलग्न  ॲप्सव्यतिरिक्त स्लॅक अँप, इव्हरनोट, यांसारख्या अगदी वेगळा धाटणीच्या ॲप्सविषयी सविस्तरपणे माहिती दिली. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी महाजालावर सहज उपलब्ध  असलेल्या सशुल्क आणि निःशुल्क अॉनलाईन अभ्यासक्रमांचा लाभ घ्यायला हवा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.  Skillshare.com, masterclass.com, coursera.com, udemy.com यांसारखी विकास, वैयक्तिक विकास, आयटी, सॉफ्टवेअर अशा विविध क्षेत्रातील अॉनलाईन अभ्यासक्रम पुरवणाऱ्या संकेतस्थळांची ओळख  करून दीली. यापैकी udemy.com या संकेतस्ळाची विस्ताराने माहिती देऊन अॉनलाईन अभ्यासक्रमासाठी नोंदणी कशी करावी, ते सांगितले. आपण आपल्या वेळेनुसार अॉनलाईन कोर्सेसचा लाभ घेऊ शकतो, तसेच महाजालावर आपल्या करियरच्या आणि आपल्या अभिरूचीनुसार असंख्य कोर्सेस उपलब्ध आहेत, ह्या कोर्सेसच्या साहाय्याने आपल्याला भविष्यात शिक्षणाबरोबरच पैसे कमावण्याचीही संधी मिळू शकते, असे अॉनलाईन कोर्सेसचे अनेक फायदे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्लॅक अँप ची माहिती त्यांनी दिली, व्हाट्सएप सारखेच परंतु माहितीच्या आदान-प्रदानास अत्यंत सुलभ म्हणजे स्लॅक अँप होय, असे ते म्हणाले. स्लॅक अँपच्या मदतीने आपण विविध विषयांवरील अभ्यासगटाची निर्मिती करू शकतो. जनरल, रँडम, प्रोजेक्ट अशा तीन प्रकारांत चॅनल्स तयार करून नवनवीन माहिती प्रकाशित करू शकतो, हे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जोशी यांनी समजावून सांगितले. इव्हरनोट या आगळ्या-वेगळ्या नोट मेकिंग ऍप च्या साहाय्याने आपल्याला आवश्यक व नेमकी अॉनलाईन वा अॉफलाईन  माहिती, ड्रॅग आणि ड्रॉपच्या साहाय्याने नोटस् स्वरूपात सहजपणे साठवून ठेवता येते. अनेकदा एखाद्या विषयावर अहवाल तयार करताना, संशोधनासाठी नेमक्या माहितीचा अभ्यास करताना, अशी नेमकी माहिती इव्हरनोटच्या माध्यमाने सहजपणे एकत्रितपणे गोळा करता येते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयोगी ठरते, असे श्री.जोशी म्हणाले. 
            दुसऱ्या सत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तरूणांचे अनुभवकथन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. या सत्रात `वर्ल्डस यंगेस्ट मोटिव्हेटर म्हणून ओळखले जाणारे रिषभ कालिया, झुफ सॉफ्टवेअर सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक स्मितेश मोरे, सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ञ, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे सदस्य व मॕरेथॉन धावपटू डॉ.महेश बेडेकर आणि अभिनेते आदित्य पांडे या दिग्गजांच्या स्वानुभवातून त्यांची प्रेरणादायी यशोगाथा विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने पोहचली. व्यवस्थापकीय संचालक स्मितेश मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपयशाने खचून जावून माघार न घेता, अपयशाची कारणे शोधून, त्याचे विश्लेषण करून, त्यातून यशोमार्ग शोधण्याचा प्रयत्न केल्यास यशाची चव हमखास चाखता येते, असे ते म्हणाले. सुरवातीला अनेक लहान-मोठ्या कंपन्यांसाठी संकेतस्थळे बनविणारी कंपनी त्यांनी स्थापन केली. ट्रान्समगो ही वाहन खरेदी-विक्री क्षेत्रातील कंपनीलाही अपेक्षित यश मिळाले नाही, या अपयशातून ते बरेच काही शिकले. ग्राहकांच्या प्रतिक्रीया पाहून आवश्यक पाऊले न उचलल्यामुळे अपयश आल्याचे त्यांना समजले. या अपयशाला न घाबरता त्याचा धैर्याने सामना करून `niteappetite` या रात्रपाळीत काम करणाऱ्यांसाठी जेवण पुरवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. आणि अविश्वसनीय यश त्यांना मिळाले. असा अपयशाच्या गर्द छायेतून जिद्दीने यशाकडे मार्गक्रमण करणारा त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी होता.
          यानंतर सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ञ, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे सदस्य व मॕरेथॉन धावपटू डॉ.महेश बेडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अर्धी व पूर्ण या मॕरेथॉनच्या प्रकारांत धावपटू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, आहाराच्या बाबतीत पाळलेली पथ्ये, नियमित व्यायामाची स्वयंशिस्त हा संपूर्ण प्रवास त्यांच्या सहज-संवादातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना एखादा छंद जोपासा, अपयशातून शिका, जीवनातील आव्हानांना धैर्याने तोंड द्या असा प्रेरणादायी सल्ला दिला. तसेच  कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटकाळात ज्ञानसाधना महाविद्यालयाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उदात्त हेतूने राबवलेल्या विक्रमी विनामूल्य आंतरराष्ट्रीय उपक्रमांबद्दल संस्थेचे सचिव कमलेश प्रधान यांना अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
    यानंतर छोट्या पडद्यावर अनेक उल्लेखनीय भूमिका वठवलेले अभिनेते आदित्य पांडे यांनी आपला आजवरचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. यश राज स्टुडियोसारख्या प्रोडक्शन हाऊसकडून मिळालेली पहिली संधी आजही बरंच काही शिकवून गेली, असे ते म्हणाले. त्यांनी आजवर माही वे( sony tv), गुमराह( channel V ), कटींग प्यार(zoom), हम आपके घर मे रहेते हे( sub tv), दिया और बाती अशा अनेक मालिकांमध्ये यशस्वीपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयक्षेत्रात येऊ ईच्छिणाऱ्यांनी खूप मेहनत करणे आवश्यक आहे.या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी दुर्दम्य महात्त्वाकांक्षा बाळगणे गरजेचे आहे. नवोदितांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपयश पचवून यशाचा सदैव प्रयत्नपूर्वक पाठलाग करण्याची जिद्द बाळगावी, असे ते म्हणाले. कार्यक्रमाची सूत्रे पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली.

 या उपक्रमाची सांगता ६ जुलै रोजी होणार आहे. अजूनही ईच्छूक विद्यार्थ्यांना https://forms.gle/4my6C7naMaE3YXyDA या लिंकवर  विनामूल्य नावनोंदणी करता येणार आहे

Web Title: It's a shame for us to be in this school, said the headmaster: Rishabh Kalia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.