कोरोना संसर्गात देखील भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 03:11 PM2021-01-04T15:11:41+5:302021-01-04T15:11:49+5:30

वाहतुक कोंडी आणि चालण्यास जागा नसल्याने नागरिक त्रस्त

The illegal Sunday market of Bhayander West also revived in Corona infection | कोरोना संसर्गात देखील भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात

कोरोना संसर्गात देखील भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात

Next

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गाचे नियम धाब्यावर बसवून भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावरील बेकायदेशीर रविवार बाजार पुन्हा जोमाने भरू लागला आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून चण्यास जागा नसल्याने नागरिक त्रासले आहेत . बाजार वसुली ठेकेदार आणि फेरीवाल्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमता मुळे पालिका व नगरसेवक अवाक्षर काढत नसल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत . 

पूर्वी- भाईंदर गाव असताना काही  प्रमाणात लोकांची गरज म्हणून रविवार आठवडे बाजार भारत असे . ग्रामीण पण भागातुन सुकी मासळी, भाजीपाला घेऊन येणाराया महिला बाजारात येत . पण गेल्या काही वर्षात बाजार फुगत चालला असून तो थेट शिवसेना गल्ली तर दुसरीकडे मांदली तलाव व कोंबडी गल्ली पर्यंत बेकायदेशीरपणे विस्तारला आहे . अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या फेरीवाल्यानी मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडले असून स्थानिक महिला मात्र गल्ली बोळात बसू लागल्या आहेत . 

फेरीवाले मात्र थेट रस्ता - पदपथावर बस्तान मांडुन एका मागोमाग एक अशा हातगाडय़ा लावत आहेत . फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे भाईदर पोलीस ठाण्या पासुन शिवसेना गल्ली नाका र्पयतचा मुख्य रस्ता जाम होत आहे. वास्तविक सदर रस्ता हा भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा असुन या मुख्य मार्गावरुन एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. 

परंतु रविवार बाजारच्या अतिक्रमणा मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन सुध्दा जाऊ शकणार नाही अशी स्थिती आहे.  अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते. लांबच लांब रांगा लागतात व प्रवासी अडकुन पडतात. पालिकेच्या बस स्थानकांना सुध्दा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.

भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयों मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . बाजार आटोपल्यावर फेरीवाले, भाजीवाले कचरा तसाच टाकुन जातात. बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. साफसफाईचा भुर्दंड मात्र पालिकेलाच सोसावा लागतो. 

डिसेंबर २०१५ च्या महासभे मध्ये बेकायदा विस्तारीत बाजार बंद करण्यासह भाजी व सुकीमासळी विक्रेत्या स्थानिकांना वगळुन अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला गेला होता. पण पाच वर्ष झाली तरी महापालिका, नगरसेवक व राजकारणी मात्र ह्या बेकायदा आठवडे बाजारावर ठोस कारवाई करण्यास अवाक्षर काढत नाहीत . 

फेरीवाल्यांकडून मोठी वसुली होत असल्याने बाजार वसुली ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी कारवाई टाळली जातेच पण ह्यात काही नगरसेवक  - राजकारणी, फेरीवाला पथक , कनिष्ठ अभियंता , प्रभाग अधिकारी सह अन्य अधिकारी आदींचे अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी नंदकिशोर बडगुजर यांनी केला आहे . कोरोना संसर्गाचे नियम - निर्देश सुद्धा सर्रास धुडकावले जात आहेत . 
 

Web Title: The illegal Sunday market of Bhayander West also revived in Corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.