तानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:39 AM2020-09-28T00:39:34+5:302020-09-28T00:39:43+5:30

सात कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलीस अधीक्षकांच्या विशेष टीमची बेकायदा रेती वाहतुकीवर कारवाई

Illegal sand excavation in Tansa, Vaitarna river basin | तानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन

तानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन

Next

नालासोपारा : विरार शहरातील मौजे खानिवडे तसेच खर्डी येथील तानसा व वैतरणा नदीच्या पात्रात विनापरवाना रेती उत्खनन करत असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाल्यावर त्यांच्या विशेष टीमने येथे शनिवारी संध्याकाळी सापळा लावला. या कारवाईत १५२ सक्शन पंप, १६५० ब्रास रेती, २३० बोटी, एक जेसीबी असा सात कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पालघर जिल्ह्यातील खानिवडे, वैतरणा, नारिंगी, खर्डी या विभागांतून बेकायदा उखन्नन व रेतीची चोरटी वाहतूक रात्री केली जाते. विरार परिसरात रात्री खानिवडे येथील नदीतून आणि खाडीतून रेती काढत असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. यानुसार कारवाई करण्यासाठी स्वत: जातीने हजर राहत सफाळा प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, नालासोपारा उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्यासह पोलीस स्टाफ आणि सातपाटी प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, पालघर उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्यासह पोलीस स्टाफ अशा दोन टीम बनवून खानिवडे आणि खर्डी रेतीबंदरावर छापा टाकला. या छाप्यात खर्डी येथून ७४ लाख ९ हजारांची ७५० ब्रास रेती, १५ लाखांचा एक जेसीबी, एक कोटी ८० लाखांच्या ८० बोटी, ५० लाखांचे ५० सक्शन पंप असा एकूण दोन कोटी ९९ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या छाप्यात खानिवडे बंदरातून ८३ लाख ९७ हजार १५० रुपयांची ८५० ब्रास रेती, एक कोटी दोन लाखांचे १०२ सक्शन पंप, तीन कोटींच्या १५० बोटी आणि ४ लाख ९३ हजार ९५० रु पयांची क्रशरजवळील ५० ब्रास साठा असा एकूण ४ कोटी ९० लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील तपास देण्यात आला आहे. या कारवाई वेळी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विरार, नालासोपारा, पालघर येथील उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी हजर होते.

गेल्या काही दिवसांपासून रेतीची चोरटी वाहतूक आणि उपसा होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. यामुळे शनिवारी संध्याकाळी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह खर्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर सापळा लावून छापा टाकला. यामध्ये सात कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- दत्तात्रेय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर

Web Title: Illegal sand excavation in Tansa, Vaitarna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.