सुरुवात तर उत्तम झाली, सातत्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:05 PM2020-02-23T23:05:04+5:302020-02-23T23:06:08+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवलीच्या स्कायवॉकला अचानक भेट दिल्याने फेरीवाल्यांचा मुक्तसंचार अनुभवला.

If the beginning is good, you need consistency | सुरुवात तर उत्तम झाली, सातत्य हवे

सुरुवात तर उत्तम झाली, सातत्य हवे

googlenewsNext

- अनिकेत घमंडी, डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महापालिकेला डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यामुळे एक सनदी अधिकारी आयुक्तपदी लाभला आहे. सूर्यवंशी यांनी सूत्रे स्वीकारताच अचानक स्कायवॉकला भेट देऊन बेशिस्त फेरीवाल्यांचा उपद्रव पाहिला आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरु केली. डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन तेथील गैरव्यवस्थापनावर कटाक्ष टाकला. आयुक्तांनी सुरुवात तर उत्तम केली. मात्र त्यामध्ये सातत्य ठेवायला हवे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी मतपेटीच्या आमिषाने कारवाईत खोडा घालायला नको, तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी न करता आयुक्तांच्या कारवाईला सहकार्य करण्याची गरज आहे.

बुधवारी रात्री कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवलीच्या स्कायवॉकला अचानक भेट दिल्याने फेरीवाल्यांचा मुक्तसंचार अनुभवला. धड चालायलाही येत नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, हालअपेष्टांचा ‘आँखो देखा हाल’ पाहिला. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी या भयंकर स्थितीला जबाबदार असणाºया तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यामुळे आयुक्तांची सरप्राईज व्हिझीट भलतीच गाजली. अनेक ज्येष्ठ कल्याण, डोंबिवलीकरांना या आधीचे आयुक्त टी. चंद्रशेखर यांची आठवण झाली. आयुक्त येऊन गेले का? कधीही येतील ही भीती अधिकारी, कर्मचाºयांमध्ये गेले दोन दिवस दिसून आली. आयुक्तांनी एवढ्यावरच न थांबता सरप्राईज व्हिझीटचा बुस्टर डोस असाच अधूनमधून दिल्यास प्रशासनात आलेली मरगळ नाहीशी होईल.

जे कामचुकार आहेत, अशा सगळ््यांवर कारवाई व्हायला हवी, जेणेकरून शिस्त, नियम आणि कर्तव्याची जाणीव इतरांमध्ये कायम राहील. सध्याच्या प्रशासनामध्ये कोणाही अधिकारी, कर्मचाºयांत भीती राहिलेली नाही. एकंदरीतच कामामध्ये सुस्तावलेपण आलेले असून मनमानी कारभार सुरु आहे. काही कर्तव्यतत्पर अधिकारी, कर्मचारी वगळता बाकी आनंदीआनंद आहे. कर्तव्यतत्पर अधिकाºयांचे प्रमाण अल्प आहे. विशेषत: स्वच्छता, आरोग्य, अतिक्रमण विरोधी पथक, फेरीवाला कारवाई विरोधी पथक, अनधिकृत बांधकाम विरोधी पथक, सुरक्षा रक्षक, करवसुली, पाणी गळती रोखणे आदी विभागांमध्ये काम करणाºयांना पाट्या टाकण्याची सवय लागल्याचे दिसून येते. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीस ‘बकाल शहर’ असा कलंक लावला. आरोग्य व्यवस्था कोलडमडलेली आहे. खड्डे असल्याने रस्ते ओबडधोबड आहेत. सीसी रस्त्यांची जेथे कामे झाली आहेत त्या ठिकाणी काही भागात रिकास्टींगची गरज आहे. ओल्या सुक्या कचºयाचे वर्गीकरण होत नाही, प्लास्टिक बंदीचे आदेश धाब्यावर बसवलेले असल्याने सगळा अनागोंदी कारभार सुरु आहे.

सगळ््यांना ताळ््यावर आणणाºया खमक्या अधिकाºयाची या ठिकाणी आवश्यकता आहे. आयएएस अधिकारी हवा ही नागरिकांची मागणी अनेक वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. व्हिजन डोळयासमोर ठेवून यंत्रणेला त्या ध्येयासाठी काम करायला लावणारा अधिकारी येथे हवा आहे. सूर्यवंशी ते काम चोख पार पाडतील, असा आशावाद नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी पदभार घेतल्यावर अवघ्या तीन तासांमध्ये डम्पिग ग्राऊंडला भेट दिली, नागरिकांना श्वसनाचे त्रास होणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. त्याची अंमलबजावणी होते की नाही याची ते स्वत: रोज माहिती घेत आहेत. त्या पाठोपाठ त्यांनी तातडीने फेरीवाल्यांवर चोख कारवाई हवी असे स्पष्ट निर्देश दिले. पण ते केवळ कागदावर राहू नयेत यासाठी ते स्वत: रातोरात स्पॉटवर गेले, तेथे त्यांनी फेरीवाले असल्याचे पाहिले. तत्कालीन आयुक्त गोविंद बोडकेंनी गुरुवारी केलेल्या बदल्यांसंदर्भात त्यांनी जलद गतीने निर्णय घेत आदेशाला स्थगिती दिली. बोडकेंनी केलेल्या बहुतांशी बदल्या रद्द केल्या. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी खडबडून जागे झाले असून काम दाखवावेच लागेल असा भीतीयुक्त आदर त्यांच्यात निर्माण झाला आहे. कडक प्रशासक या ठिकाणी अपेक्षित होता, सूर्यवंशीच्या रुपाने तो मिळेल असे तूर्त दिसून येत आहे.

या शहरांमधील रस्ते, पाणी, अनधिकृत बांधकामांचे फोफावत चाललेले जाळे, फेरीवाल्यांचा जटील प्रश्न, सुमारे १७ किमीचा विस्तीर्ण खाडी किनारा सौंदर्यीकरण, घनकचरा विल्हेवाटीची समस्या, डम्पिगची समस्या, वाहतूककोंडी सोडवणे ही आव्हाने आहेत. काही रिक्षा चालकांची मनमानी, जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड यामुळे दोन्ही शहराना बकाली आली आहे. त्या सर्व यंत्रणा मार्गी लावण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. तसेच प्रशासनाला आलेली मरगळ झटकणे, त्यांच्याकडून काम करवून घेणे यासाठी कौशल्य पणाला लावायला लागणार आहे. महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसवणे हेही आव्हान नव्या आयुक्तांपुढे आहे. याकरिता थकबाकीदारांना वठणीवर आणावे लागेल. आयुक्तांची ही कारवाई नव्याचे नऊ दिवस असल्याची कुजबुज अधिकारी, कर्मचारी व फेरीवाले यांच्यात सुरु आहे. त्यांचा हा अंदाज खोटे ठरवणे आयुक्त सूर्यवंशी यांच्यावर अवलंबून आहे. आयुक्तांनी केवळ कारवाईचाच बडगा न उगारता ज्या अधिकाºयांची क्षमता आहे, अशांना संधीही द्यावी, जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत असतील अशांना विश्वासात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे. जेथे कचरा जमा होतो तेथे दोन ऐवजी तीन राऊंडमध्ये कचरा उचलण्यात येत असून जंतूनाशक पावडरची फवारणी करण्यात येत आहे. हा बदल नागरिकांच्या नजरेत भरणारा आहे. स्कायवॉकवरून विनाअडथळा चालता येणे ही नागरिकांची गरज होती व आहे. महापालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची किड समूळ नष्ट करणे हे आयुक्तांपुढील मोठे आव्हान आहे. केडीएमसीतील अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ््यात सापडले असून आताही कार्यकारी पदांवर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रतिमेला बट्टा लागला आहे. महापालिकेची प्रतिमा सुधारणे हे काम आयुक्तांनी करावे, अशी अपेक्षा आहे. आयुक्त सुर्यवंशी यांची आठवड्यातील कार्यवाही धडाकेबाज आहे. त्यात ते सातत्य किती राखतात यावर पुढील प्रगती अवलंबून आहे.

हीच ती वेळ....
आता सत्ताधाºयांनी, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी, आणि नागरिकांनीही आयुक्त सुर्यवंशीच्या महत्वाकांक्षी निर्णयांना पाठींबा देऊन त्यांचे मनोधैर्य खच्ची होणार नाही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. निवडणूक डोळ््यासमोर दिसत असल्याने अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालणे, करचुकव्यांना, फेरीवाल्यांना संरक्षण देणे, असे प्रकार लोकप्रतिनिधींनी करु नयेत. तसेच नागरिकांनीही कुठेही कचरा टाकणार नाही, फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणार नाही, उघड्यावरचे पदार्थ खाणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार, शौच करणार नाही. वाहने शिस्तीत उभी करेन, असा संकल्प अमलात आणण्याची गरज आहे.

Web Title: If the beginning is good, you need consistency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.