IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रारीविरोधात केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:20 PM2021-06-11T17:20:15+5:302021-06-11T17:37:47+5:30

IAS officer Sanjeev Jaiswal's letterbomb : संजय घाडीगावकर यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

IAS officer Sanjeev Jaiswal's letterbomb sensation; verification against the complaint by sending a letter to the Chief Minister | IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रारीविरोधात केला खुलासा 

IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रारीविरोधात केला खुलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देआता संजीव जयस्वाल यांनी देखील घाडीगावकर यांनी केलेल्या तक्रारीविरोधात मुख्यमंत्र्यांकडे पाच पानी पत्र पाठवून खुलासा केला आहे.

ठाणे : ठाणे  महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात अनेक  प्रकरणात अनियमीतता झाली असून त्या विरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता संजीव जयस्वाल यांनी देखील घाडीगावकर यांनी केलेल्या तक्रारीविरोधात मुख्यमंत्र्यांकडे पाच पानी पत्र पाठवून खुलासा केला आहे. यामध्ये घाडीगावकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याने आणि त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुक लढविता येणार नसल्याने, तसेच माझ्या कार्यकाळात हाफ्तेखोरीला लगाम लावल्यानेच त्याचा राग मनात धरूनच घाडीगावकर यांनी तक्रार केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. परंतु त्यांनी या पत्रात आणखी काही मुद्यांना हात घातला असल्याने त्यांचा हा लेटर बॉम्ब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
    

ठाणे  महापालिकेतील माजी नगरसेवक संजय घाडीगावर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात तब्बल १०२  हून अधिक प्रकरणात अनिमितता झाली असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या महापालिकेतील वाढीव कार्यकाळाबाबतही आक्षेप घेत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या असलेल्या सलोखाच्या संबधांमुळेच त्यांचा कार्यकाळ आणि शहरातील अनेक कामात अनियमितता झाली असल्याचा आरोपही केला आहे. तसेच त्यांच्या आयुक्त बंगल्यात देखील एका अल्पवयीन मुलीबाबत झालेल्या प्रकार बाबतही त्यांनी या पत्रत उल्लेख केला आहे. शहर विकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, स्थावर मालमत्ता, तत्कालीन अग्निशमन अधिकारी यांची चुकीच्या पध्दतीने केलेली निवड आणि एकूणच या विभागांच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमूण या सर्व प्रकरणांची चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
परंतु घाडीगावकर यांच्या पत्रानंतर ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून या सर्व आरोपांचा खुलासा केला आहे. या संदर्भात त्यांनी पाच पानी पत्र पाठविले असून सध्या ते सोशल मिडियावर वायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जयस्वाल यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला नसतानाही तो त्यांनी का दिला अशी देखील चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान, जयस्वाल यांनी केलेल्या खुलाश्यामध्ये संजय घाडीगावकर ब्लॅकमेलर असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, त्या चुकीच्या आणि बोगस असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पत्रमुळे आपल्याला धक्का बसला असल्याने आपण हा खुलासा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याने घाडीगावकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. तसेच त्यांनी पुढील सहा वर्षे निवडणुक लढविता येणार नसल्यानेच याचा राग मनात धरुन त्यांनी ही तक्रार केल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. किंबहुना तेव्हापासून ते माझ्याविरोधात खोटय़ा तक्रारी करुन माझी पत्रिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात, त्यांनी आत्महत्येसाठी काही नगरसेवक आणि राजकारण्यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरले होते. त्यानंतर पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ठाण्यातून (चार) नगरसेवक विक्रांत चव्हाण (आयएनसी), सुधाकर चव्हाण (मनसे), हणमंत जगदाळे (राष्ट्रवादी) आणि नजीब मुल्ला (राष्ट्रवादी) यांना अटक करण्यात आली आणि बराच काळ तुरूंगात आहेत. हे सर्व नगरसेवक ठाण्यातील कुख्यात गोल्डन गँगचे सहकारी होते. त्यांच्या व्यतिरिक्त संजय घाडीगावकर व अन्य काही नगरसेवकही गोल्डन गँगचे सदस्य असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे आणखी खळबळ उडाली आहे. परंतु वरील प्रकरणात पुरावे नसल्यामुळे आणि त्यानंतर पोलिसांनी नोंदविलेल्या संपत्तीच्या प्रकरणात त्यांना अटक केली गेली नव्हती. या टोळीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेत टोळी ठाणे महानगरपालिकेत ब्लॅकमेलिंग व खंडणीखोरीचे एक युग सुरू झाले होते. परंतु पोलिसांच्या मदतीने मी या गोल्डन गँगचे वर्चस्व मोडीत काढण्यात यशस्वी झालो होतो, त्यानंतर अटक केलेले नगरसेवक जामिनावर तुरुंगाच्या बाहेर होते परंतु त्यांचा खटला अजूनही सुरू आहे.

 

तसेच महापालिकेतील खोटय़ा तक्रारी करणाऱ्यांचे रॅकेटही मी उघडकीस आणले होते. शिवाय प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालत देखील आरटीआय कार्यकर्ता ब्लॅकमेलर म्हणून घाडीगावकर यांचे आहे. विशेष म्हणोज तेव्हा एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक देखील झाली होती. तसेच बोगस व्हिडीयो क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी देखील करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु या प्रकरणातील गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. याशिवाय लेडीज बार, लॉजमध्ये जेथे बेकायदेशीर व्यवसाय चालतात त्यांच्यावर देखील मी कारवाई केली होती. या बारच्या मालकाने माझ्याविरुध्द हा खोटा व्हिडिओ बनविला होता. जो पोलीस अन्वेषण आणि आरोपित पीडितेच्या नकार व्हिडिओद्वारे सिद्ध झाला होता. तसेच माझ्याविरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने आरोप फेटाळून लावले असल्याचा उल्लेखही या पत्रात दिसत आहे.  तसेच १०० हेक्टरी जमीनवर बेकायदा बांधकामे करण्यात आल्याने ती देखील हटविण्यात आली होती. तसेच माझ्या कार्यकाळात बेकायदा बांधकामे देखील पाडली गेली होती. त्यामुळे अशा ब्लॅकमेलरचे हप्ते देखील बंद झाले होते. त्यामुळे माझ्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळेच मी पोलीस संरक्षण घेतले होते. आजही मला जीवाला धोका असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

संजय घडीगावकर आणि नारायण पवार, अर्चना मनेरा, राजकुमार यादव, विक्रांत चव्हाण आदींनी माझ्याविरुध्द केलेल्या अनेक बोगस तक्रारी सोडल्याखेरीज संजय घाडीगावकर यांनी माझ्याविरोधात टीडीआर लोडींगची देखील तक्रार केली होती. परंतु देखील युडीकडून फेटाळण्यात आली. मला देण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यकाळाच्या विरोधातही घाडीगावकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने ती तक्रार देखील फेटाळून लावली. जीवाची पर्वा न करता मी ठाण्याचा विकास केला आहे. घाडीगावकर यांनी माझ्या कार्यकाळात आणि त्यानंतरही मला मानिसक त्रस देत आहेत, याचा उल्लेखही त्यांनी या पत्रत केला आहे. त्यामुळे काही गोष्टी आता रेकॉर्डवर आणण्याची वेळ झाली असून त्यानुसार आपण हे पत्र पाठवित असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार या पत्राची दखल घेऊन घाडीगावकर यांच्याविरोधात सरकारने फौजदारी चौकशी करावी आणि कायद्याच्या संबंधित कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी शेवटी या पत्रात केली आहे.  

Web Title: IAS officer Sanjeev Jaiswal's letterbomb sensation; verification against the complaint by sending a letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.