जीव देऊ, पण घरे वाचवू... झोपडीधारकांसाठी जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:04 PM2022-01-20T18:04:06+5:302022-01-20T18:07:56+5:30

ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी पाठविला होता. तो एक पाऊल पुढे गेलेला आहे

I will wear a chest coat to save the houses of the slum dwellers of thane, a warning of love | जीव देऊ, पण घरे वाचवू... झोपडीधारकांसाठी जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा

जीव देऊ, पण घरे वाचवू... झोपडीधारकांसाठी जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा

Next

ठाणे (प्रतिनिधी) - रेल्वे रुळालगतच्या सर्व झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही झोपडी मी पाडू देेणार नाही.  मी मंत्री नंतर आहे; प्रथम मी लोकांचा कार्यकर्ता आहे. त्या एकाही माणसाला मी घराच्या बाहेर पडू देणार नाही. निवारा हा त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर हिरावणार्‍यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहिन. गरीबाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. दरम्यान, केंद्राने मिठागरांच्या जागेवर इमारती बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने  मिठागरांवर इमारती बांधण्याची परवानगी गृहनिर्माण खाते कदापी देणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.  

ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी पाठविला होता. तो एक पाऊल पुढे गेलेला आहे. एमएमआरडीएने आराखडे वगैरे तयार करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. माझे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. मिठागरे ही केवळ मिठागरे नसून भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवण्याचे मोठे माध्यम आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आता मुंबईत जाणवत आहे. मात्र, जर ही मिठागरे गेली तर हा परिणाम मोठ्याप्रमाणात जाणवायला लागेल. त्यामुळेच मिठागरांवर इमारती बांधून देणार नाही, असा आमचा निर्णय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून तेही मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, या मताचे आहेत. मिठागरांवर इमारती बांधण्याची परवानगी गृहनिर्माण खाते कदापी देणार नाही. 

न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय आला असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेने त्या निर्णयानुसार रुळांळगतच्या झोपडीधारकांना नोटीसा दिल्या आहेत. जर सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटवावी लागली तर मुंबईतील 5 लाख लोकांचे संसार उघड्यावर येतील. ठाण्यात हजारो संसार रस्त्यावर येतील. कळव्यात जेव्हा असाच निर्णय आला होता. त्यावेळी 3 तास आम्ही रेल्वे रोखून धरली होती. सरकारला हा निर्णय फिरवायला भाग पाडले होते. मी मंत्री नंतर आहे; प्रथम मी लोकांचा कार्यकर्ता आहे. त्या एकाही माणसाला मी घराच्या बाहेर पडू देणार नाही. निवारा हा त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर हिरावणार्‍यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहिन. गरीबाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. गरीब माणूस हा गरजेनुसार झोडपी बांधतो. त्याच्यासाठी तो जीवनमरणाचा प्रश्न आहे. एक नोटीस द्यायची आणि त्याला घराबाहेर काढता; म्हणजे, तुम्ही त्याच्या आयुष्याशी खेळत आहात. आम्ही या झोपडीधारकांच्या बाजूने उभे राहणार आहोत.  जेव्हा 35  हजार झोपड्या पाडण्याचा निर्णय झाला. तेव्हा सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरुन आमचे सरकार असतानाही तो निर्णय फिरवायला भाग पाडले होते, याची आठवणही ना. डॉ. आव्हाड यांनी यावेळी करुन दिली. 

कालिचरणसारख्या नथुरामी पिलावळ कायदेशीररित्या ठेचली पाहिजे

कालिचरण महाराज यांना नौपाडा पोलीसांनी अटक केली असून आता त्यांना ठाण्यात आणले जाणार आहे. याबाबत विचारले असता, कालिचरण प्रकरणात मी माझे काम केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. कालिचरण याने महात्मा गांधीजींचा अपमान केला होता. आमच्या मते महात्मा गांधीजींचा अपमान हा देशाचा अपमान आहे, असे मी मानतो. त्यामुळे अशा नथुरामाच्या पिलावळीला कायद्याच्या कक्षेत ठेचले पाहिजे, असे डॉ. आव्हाड म्हणाले. 

बावनकुळे यांनी खात्री करावी; राजकारण करु नये

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकाच झालेल्या नाहीत, असे विधान भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी केले आहे. त्याबाबत ना.डॉ. आव्हाड म्हणाले की, बावकनुळे कुठून माहिती आणतात आपणाला माहित नाही. त्यांना मला एकच विचारायचे आहे की, जेव्हा मंडल आला तेव्हा आपण कूठे होतात? आपल्या हातात कमंडल होते. त्यामुळे अचानक आपण ओबीसी असल्याचे कशाला दाखवून देता, काही माहिती नसताना!  दहा बैठका झालेल्या आहेत; सतत बैठका होत आहेत. कारण नसताना उगाच संभ्रम निर्माण करुन राजकारण करु नका. कारण, ओबीसी हा मागास समाज आहे. त्यामध्ये राजकारण करुन त्यांची अडवणूक करु नका. आपण प्रचंड बुद्धीमान आहात. आपणाला मंत्रालयातील प्रत्येक कागद मिळतो, याची मला खात्री आहे. पण, हे कागद पुरवणारे नेमके कोणते शब्द गहाळ करतात; याची खात्री करुन घ्या, असा टोलाही डॉ. आव्हाड यांनी लगावला. 

गोव्यातील राजकारण बदलेल

उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. याबाबत डॉ. आव्हाड यांनी,  गोव्यात उत्पल पर्रिकर यांचे तिकिट नाकारले तर भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागेल. कारण, मनोहर पर्रिकर हे गोव्याने स्वीकारलेले नेतृत्व होते. जात-धर्माच्या पलिकडे लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले होते. अचानक त्यांच्या मुलाला शिस्तीच्या नावाखाली उत्पल पर्रिकर यांना तिकिट नाकारल्यास त्याचा परिणाम गोव्याच्या राजकारणावर होईल, असे सांगितले.  

महाविकास आघाडी झालीच पाहिजे

मी नेहमी सांगतोय की, महाविकास आघाडी झालीच पाहिजे. लोकांना जे वाटायचे असेल ते वाटू द्या; राजकीयदृष्ट्या विचार केला. तर, कार्यकर्त्यांचे मनोमिलन आज केले नाही तर पुढील काळात ते अवघड जाईल. हा धोक्याचा इशारा सर्वांना आहे. महापालिका नजरेसमोर ठेवून पुढील 10 वर्षांचे राजकारण केले जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल, असा युक्तीवाद डॉ. आव्हाड यांनी केला.
 

Web Title: I will wear a chest coat to save the houses of the slum dwellers of thane, a warning of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.