प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:42 AM2021-06-21T08:42:15+5:302021-06-21T08:42:48+5:30

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही.

How many MLAs will stand behind Shivsena MLA Pratap Sarnaik ?; Congress-Nationalist targets too | प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

Next

मुंबई/ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र मिळाल्यानंतरही तब्बल दहा दिवस त्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय न घेतल्याने, त्या आधारे वर्धापनदिनी काहीही भाष्य न केल्याने अखेर ते व्हायरल करण्यात आले. केंद्र-राज्याच्या संघर्षात माझा बळी दिला जातोय, असे भाष्य करून त्यावरही पक्षाने भूमिका न घेतल्याने सरनाईक यांच्या पाठीशी किती असंतुष्ट उभे राहणार असा प्रश्न शिवसेनेच्या वर्तुळात चर्चिला जात आहे. आपल्यासोबत आणखी काही जणांची नावे सरनाईक यांनी पत्रात घेतली असली, तरी पत्र व्हायरल झाल्यावर त्यातही एकही त्यावर भाष्य करण्यास पुढे आला नाही.

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही. त्यातही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, असा मारलेला शेरा मंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या कामाबाबत आक्षेप नोंदविणारा आहे. काही मंत्र्यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचा रोखही या मंत्र्यांना दुखावणारा आहे. त्यामुळेच या पत्रावर काय प्रतिक्रिया देणार, असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांनी सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या एकही मुद्द्यावर भाष्य केले नाही. फक्त विनाकारण त्रास दिल्याचा भाजप-विरोधाचा मुद्दा तेवढा उचलून धरला.

काँग्रेस- राष्ट्रवादीही लक्ष्य

आपली, आपल्या पक्षाच्या आमदारांची व्यथा मांडताना सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसैनिकांत आहे. या दोन्ही पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्यापूर्वीही शिवसेनेची राजकीय स्पर्धा फक्त भाजपशी असताना या दोन पक्षांना लक्ष्य करून आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी त्यांची आहे, की त्यामागे कोणी बोलविता धनी आहे याबाबत वेगवेगळे तर्क दिवसभर लढविले जात होते.

पत्र लिहिण्याची वेळ का आली?

सरनाईक कुटुंबाचे आजवरचे ठाण्यातील राजकारण हे तेथील स्थानिक नेत्यांशी जुळवून घेण्यापेक्षा थेट मातोश्रीच्या आशीर्वादाने चालणारे होते. मीरा-भाईंदरच्या राजकारणावर पकड मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचा इन्कार सरनाईक यांनी केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारीही मिळाली. मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि नरेंद्र मेहता यांना धक्का देत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या गीता जैन शिवसेनेत आल्यानंतर सरनाईक यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना वेसण घातली गेली.

मातोश्रीशी त्यांचे घनिष्ट संबंध असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत भाजप नेत्यांनी सरनाईक तेथे लपून बसल्याचा आरोपही केला. सुरूवातीपासून सरनाईक यांच्यामुळे अडचणीत येत गेल्याने मातोश्रीने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखल्याची चर्चा होती. त्यामुळे पक्षनेतृत्वाला पत्र लिहिण्याची आणि नंतर ते व्हायरल करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सांगितले जाते.

भाजपने गळ टाकल्याची चर्चा

शिवसेनेची संस्कृती ठावूक असूनही सरनाईक यांनी पत्र लिहिणे, ते व्हायरल करणे, नंतर त्यातील भूमिकेचे लगोलग स्वागत करणे यामुळे यामागे भाजपचे नेते असल्याची चर्चाही सुरू होती. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्याबाबतची पत्रातील भावनाही पुरेशी बोलकी असल्याकडे त्यामुळेच लक्ष वेधले जात होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र ठाण्यात पुरेसे नेते असल्याने आणखी एका नेत्याचा विचार सध्या सुरू नसल्याची तिरकस प्रतिक्रिया दिली. 

Web Title: How many MLAs will stand behind Shivsena MLA Pratap Sarnaik ?; Congress-Nationalist targets too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.