घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 07:15 IST2025-12-07T07:15:18+5:302025-12-07T07:15:50+5:30
ठाणेकडून येणाऱ्या आणि वर्सावेकडून ठाण्यास जाणाऱ्या घोडबंदरमार्गावर रस्ता मजबुतीकरणाचे काम ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले आहे.

घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
मीरा रोड : घोडबंदर मार्गावरील मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील तीन ठिकाणी रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. मात्र, यापूर्वी अशा कामासाठी जाहीर केलेली अवजड वाहन बंदी फोल ठरली होती. त्यामुळे यावेळीही ती फोल ठरल्यास वाहतूककोंडीची शक्यता आहे.
ठाणेकडून येणाऱ्या आणि वर्सावेकडून ठाण्यास जाणाऱ्या घोडबंदरमार्गावर रस्ता मजबुतीकरणाचे काम ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले आहे. पालघर - विरार - वसई बाजूकडून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर येण्यास मनाई असून, त्यांना शिरसाड फाटा - पारोळ - अंबाडी मार्गे; चिंचोटी मार्गे-कामन-खारबांव-अंजुरफाटा, भिवंडी येथून पर्यायी मार्गे जावे लागणार आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणेकरिता जाण्यासाठी फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे.
वाहतूक पोलिस तैनात
दुरुस्ती कामावेळी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यासह रस्ते मार्गिका वळवण्यात येणार असल्याने होणारी वाहतूककोंडी पाहता मीरा भाईंदर वाहतूक शाखेमार्फत नियोजन केले गेले आहे.
बंदोबस्तासाठी १० वाहतूक पोलिस अधिकारी व ४५ पोलिस कर्मचारी प्रत्येकी ३ पाळ्यांमध्ये नेमल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिली.
भीमाशंकरला भरधाव निघालेली कार घोडबंदर रोडवर जळून खाक
घोडबंदर रोडवर शुक्रवारी रात्री एका कारने अचानक पेट घेतला. या घटनेत भाईंदरहून भीमाशंकरला निघालेल्या कारचालकासह चार प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमुळे पातलीपाडा उड्डाणपुलाहून ठाण्याकडे येणारी वाहतूक तासभर खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ३५ ते ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, एक फायर वाहन पाचारण करण्यात आले होते.