बालपणीचा काळ सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:52 AM2019-08-17T01:52:45+5:302019-08-17T01:53:20+5:30

आईच्या गर्भातच आपण अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी पाहतो. आपल्या चेहऱ्यावर पहिलं हास्यही उमटतं, तेही कदाचित आईच्या गर्भातच. आपले लहानपणीचे अनेक फोटो आपण पुन:पुन्हा काढून पाहत असतो.

Happy life in childhood | बालपणीचा काळ सुखाचा

बालपणीचा काळ सुखाचा

googlenewsNext

- अर्चना देशपांडे-जोशी

आईच्या गर्भातच आपण अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी पाहतो. आपल्या चेहऱ्यावर पहिलं हास्यही उमटतं, तेही कदाचित आईच्या गर्भातच. आपले लहानपणीचे अनेक फोटो आपण पुन:पुन्हा काढून पाहत असतो. इतर कोणाला नाही दाखवू शकलो, तरी आपल्या लहानपणीच्या छबी आपण पाहत बसतो. त्यातून मिळतो तो फक्त आनंद. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा...’ असे म्हटले आहे ते खरेच आहे.

निरागस, निर्व्याज, निष्कलंक आणि प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे बालपण, बालपणीच्या गमतीजमती आणि त्यातला आनंद. रांगतारांगता मिळेल त्या गोष्टींचा आधार घेऊन पहिल्यांदा मूल स्वत:च्या पायावर उभे राहते, त्यावेळी त्याच्या आईवडिलांना होणारा आनंद स्वर्गसुखापेक्षा जास्तच असतो. लहान मूल मग ते कोणाचंही असलं तरी त्याला पाहून आपलं मन हळवं होतं आणि त्या बालमनालासुद्धा जातीपाती, धर्मभावना, गरीबश्रीमंत असल्या कोणत्याही भेदभाव करणाºया भावनांचा स्पर्श झालेला नसतो. त्या बालभावनांचे चित्रीकरण हीच तर खरी बालक्षणांची फोटोग्राफी आणि फोटोग्राफरची कसोटी.

आपले बालक्रीडेत रमलेले फोटो बघण्याचा आनंद जरी आपण लुटत असू, तरी त्यावेळी आठवणीने ते फोटो काढण्यासाठी आईवडिलांनी दाखवलेली समयसूचकताच कारणीभूत ठरते. लहान मुलांचे फोटो काढणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अर्थात, तुम्ही फोटो काढताना नेमका काय विचार करून फोटो काढता, यावर ते अवलंबून असते. मेमरीकार्ड असे जरी या चार्ज कपल डिव्हाइसचे नाव असले, तरी फोटो किती आणि का काढायचे, हे समजले नाही, तर आपलीच मेमरी नाहीशी होते. जेव्हा कोणत्याही गोष्टीच्या प्रमाणात वाढते, तेव्हा त्याची गुणवत्ता घसरू लागते.

फोटोग्राफी करणे, ही एक कला आहे. पण, हातात कॅमेरा आहे म्हणून फोटो काढत सुटणे योग्य नाही. कॅन्व्हास आहेत, रंग आहेत म्हणून चित्रकार भराभरा कधी चित्र काढत जात नाही. हेच लक्षात घेत जो फोटोग्राफर नेमक्या क्षणांना मोजक्या फोटोंच्या माध्यमातून टिपून ते क्षण जिवंत करीत असतो, तो खरा उत्कृष्ट फोटोग्राफर. कारण, एक सुंदर फोटो काढावयाचा असेल तर त्यामध्ये आकृतीपासून ते रंगांपर्यंत प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि जिवंतपणा दिसावा लागतो. सतत फोटो काढण्याच्या सवयीने कोणत्याच फोटोंचे अप्रूप राहत नाही. सोशल मीडियावर भारंभार अपलोड होणारे अनेकांचे फोटो पाहिले की, सोसवत नाही.

पण, लहान मुलांचे फोटो काढायचे म्हटले की, आपल्या त्या मुलासोबत लहान व्हावं लागतं, तरच ती आपल्याला प्रतिसाद देतात. प्रत्येक मुलाचे भावविश्व खूप वेगवेगळे असते. श्रीमंतांच्या घरची मुलं बागेत, मॉलमध्ये खेळताना दिसतात, तर झोपडपट्टीतील मुले रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यातही उड्या मारून आनंद लुटतात. पण, मूल हे मूल असते. ते प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि आनंद शोधते. झुमझुम करणारे पायातले पैंजण असोत की, पिकपिक करणारे बूट असोत, त्या ध्वनीनुसार मुलांच्या चेहºयावर उमटणारे हसू काही वेगळेच असते. लहान बाळांचे फोटो काढताना कोणत्याही अतिरिक्त प्रकाशाचा वापर करू नये. वेळ कोणती निवडावी, हे यात खूपच महत्त्वाचे आहे. पालक कधीकधी घरी आलेल्या पाहुण्यांसमोर आपलं मूल छान गाणं म्हणतं किंवा नाचतं असं सांगून मुलाला ते करून दाखवण्याचा आग्रह करतात. मात्र, मुलांना ते आवडते का, याचा विचार करावा. मुलांच्या आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि त्यांची खेळण्याची, झोपण्याची वेळ याचा अभ्यास करणं लहान मुलांच्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरते.

एका छोट्या बाळाच्या वाढदिवसाला घरातील मोठ्या माणसांनी सुंदर सोनेरी खुर्ची बनवली होती. त्यात बसून बाळाचा फोटो काढला जावा, असा सगळ्यांचा अट्टहास होता. मात्र, त्या बालकाने तो पूर्ण होऊच दिला नाही. त्याला त्याची नेहमीची मोडकी खुर्चीच बसायला आवडत होती. ती मोडकी असली तरी त्याची नेहमीची आणि त्याच्या हक्काची होती, हीच बालमनाची खासियत आहे आणि ती समजूनच फोटोग्राफरला फोटो काढावे लागतात.

त्यातही मुलाचा वाढदिवस, एखाद्या मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी, एखादं सक्सेस सेलिब्रेशन असं काही असलं की, मुलांचे फोटो काढण्यावर आपला भर असतो. वाढदिवसाच्या दिवशी मुलांचे सगळे मित्र जमले की, आधी केक कापून घ्यावा आणि मग खेळ खेळावेत. कारण, लहान मुलांची उत्सुकता आणि आनंद घेण्याची क्षमता वयोमानानुसार वेगवेगळी असते. पण, नेमके त्याचदिवशी फोटो चांगले येतातच, असेही नाही. कधीकधी कोणतेही औचित्य नसताना सहज म्हणून काढलेले फोटोही चांगले येतात, तर कधी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी किंवा कार्यक्रमानंतर दुसºयातिसºया दिवशी फोटो चांगले आलेले आपण अनुभवले असेल. कार्यक्रमादरम्यान विशेषत: फोटो काढताना मुलांचे कपडे साधे सुती आणि सुटसुटीत असावे. आपण त्यांच्यासाठी काही करण्यापेक्षा मुलं स्वत:हून जे काही करतील, त्यात आपण आनंदाने सहभागी व्हावे. तरच फोटोग्राफरला काही सुंदर क्षण अनुभवायला मिळतील. आपल्या वडिलांच्या पाठीवर बसून घोडा करून खेळले नाही, असे मूल विरळेच. या कृतीतीही सुंदर फोटो मिळू शकतो. मुलांचे फोटो हे कधीच ठरवून काढायचे नसतात, तर ते मिळवायचे असतात. सागरात जसे मोती सापडतात, तसेच सोनेरी क्षण मुलांच्या बागडण्यात असतात. फक्त ते शोधावे लागतात. त्यासाठी शांतपणाने, धीर धरून आणि योग्य क्षणाची वाट पाहणे यात फोटोग्राफरचा खरा कस लागतो. 

आपल्या लहानपणीचे फोटो पाहिले की, नकळतच चेहºयावर हास्य आणि मनात आनंदाची लकेर उमटते. बालमनाच्या भावना त्या फोटोतून दिसतात. या बालभावनांचे चित्रीकरण करण्यातच फोटोग्राफरची कसोटी असते. लहान मुलांचे फोटो काढायचे म्हटले की, आपल्याला त्या मुलासोबत लहान व्हावं लागतं. मुलांचे फोटो हे कधीच ठरवून काढायचे नसतात, तर ते मिळवायचे असतात. फक्त ते शोधावे लागतात. त्यासाठी शांतपणे, धीर धरून आणि योग्य क्षणाची वाट पाहावी लागते.
   apac64kala@gmail.com 

Web Title: Happy life in childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार