महिला रिक्षाचालकांशी शासन अन् नेत्यांचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:55 AM2021-01-14T01:55:48+5:302021-01-14T01:56:03+5:30

पासिंग करताना होतेय अडवणूक : काळी-पिवळी रिक्षा चालविताना केला जातो दंड

Government rickshaw pullers harm women rickshaw pullers | महिला रिक्षाचालकांशी शासन अन् नेत्यांचा दुजाभाव

महिला रिक्षाचालकांशी शासन अन् नेत्यांचा दुजाभाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे :  महिलांनाही कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनाकडून विविध योजना जाहीर होत असतात. मात्र, परमिट त्यांच्या नावावर देत असताना शासन आणि राजकीय नेते त्यांच्याशी दुजाभाव करीत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिल्या गेलेल्या परमिटवर रिक्षा कंपन्या महिलांना काळ्या-पिवळ्या रिक्षा देतात. परंतु, अधिकाऱ्यांकडून मात्र त्यांच्या रिक्षाचे पासिंग केले जात नसल्याने महिला रिक्षाचालकांसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर असे दुहेरी संकट उभे राहत आहे.

महिलांसाठी ठाण्यात अबोली रंगाची रिक्षा सुरू करण्यात आली. महिलांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकार आणि शासनाने हा निर्णय घेतला आहे. ठाण्यात अशा प्रकारच्या २५० रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. २०१७ पासून हा निर्णय अंमलात आणला आहे. सुरुवातीला ठाण्यातील ३० महिलांना पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अबोली रिक्षांचे वाटप केले आहे. या रिक्षांच्या खरेदी कागदपत्रांवर काळ्या-पिवळ्या रंगांचा उल्लेख आहे. तर रस्त्यावर त्या अबोली रंगाने धावत आहेत. रिक्षा महिलेच्या नावावर असेल तर पासिंग करताना तिचा रंग अबोली असणे आवश्यक आहे. तरच अधिकारी तिची पासिंग करतात. एखादी महिला तिच्या नावे असलेली काळी-पिवळी रिक्षा पासिंगकरिता घेऊन गेली तर अधिकारी तिचे पासिंग करण्यास नकार देतात. महिलांना काळी-पिवळी रिक्षा असली तरी पासिंग करून घेण्यासाठी तिला अबोली रंगाने रंगवावी लागते. तरच तिची पासिंग केली जाते. महिलांनी सुरुवातीला घेतलेल्या त्या ३० रिक्षांचा रंग बदलल्याने गेल्या तीन वर्षांपासून त्यांची पासिंग होत आहे. मात्र, इतर महिला नावे असलेली काळी-पिवळी रिक्षा पसिंगसाठी घेऊन गेल्या असता पासिंग केले जात नाही. अधिकारी अशी रिक्षा थेट काळ्या यादीत टाकतात.

नेते मंडळींनी त्यांच्या प्रसिद्धीसाठी महिलांना काळी-पिवळी रिक्षा घेऊन दिली असता त्यांच्या दबावाखाली तिचे पासिंग होते. पण, सामान्य महिलांना मात्र हे अधिकारी उभेदेखील करीत नाहीत. एखादी महिला तिच्या नावे असलेली काळी-पिवळी रिक्षा चालविताना आढळली तर वाहतूक विभागाकडून तिला दंड ठोठावला जातो.

पासिंगसाठी बदलणार रिक्षांचा रंग 
ठाण्यातील एका नगरसेविकेने सामाजिक बांधिकलकी म्हणून महिलांसाठी नुकत्याच ३० काळ्या-पिवळ्या रिक्षा घेऊन दिल्या आहेत. आता दीड वर्षाने या काळ्या-पिवळ्या रिक्षांचे परिवहन अधिकारी यांच्याकडून पासिंग होणार आहे. हे पासिंग करताना महिलांना या सर्व काळ्या-पिवळ्या रिक्षांना अबोली रंग लावून मगच गाडीची पासिंग करून घ्यावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर, या महिलांना प्रवासी नेताना वाहतूक विभागाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Government rickshaw pullers harm women rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे