महापौर बंगल्यातील महिला भवनचे काम लवकर मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:28 PM2020-11-29T23:28:43+5:302020-11-29T23:28:52+5:30

शहरात महिला भवन नसल्याने याठिकाणी महिला भवन झाल्यास महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षण देणे, महिलांच्या कार्यशाळा आदी उपक्रम राबवता येणार आहेत.

Get the work of Mahila Bhavan in the mayor's bungalow started soon | महापौर बंगल्यातील महिला भवनचे काम लवकर मार्गी लावा

महापौर बंगल्यातील महिला भवनचे काम लवकर मार्गी लावा

Next

मीरा राेड :  मीरा-भाईंदर महापालिकेच्या वर्षानुवर्षे पडीक असलेल्या महापौर बंगल्यात महिला भवन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या कामास तातडीने सुरुवात करा, असे निर्देश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिका झाल्यावर आयुक्तांसाठी निवासस्थान बांधायचे म्हणून त्यावेळी महापौर निवासस्थानही मीरा रोडच्या कनकिया येथील सुविधा क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आले होते. २००५ मध्ये महापौर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर निर्मला सावळे यांच्याशिवाय आजतागायत एकही महापौर या बंगल्यात राहण्यास गेले नाहीत.

मीरा-भाईंदर शहर आकाराने लहान आहे. प्रत्येकाचे स्वतःचे निवासस्थान असल्याने मतदारसंघ सोडून महापौर बंगल्यात जाऊन कोणी राहायला फारसे उत्सुक नसते. त्यामुळे महापौर बंगल्याची दुरवस्था झाली असताना बंगल्यातील सामान व देखभाल-दुरुस्तीवर खर्चही लाखोंच्या घरात करण्यात आला. हे लाखो रुपये वायफळ खर्च होत आहेत. पडीक आणि दुर्लक्षित ठरलेल्या या महापौर निवासस्थानात महिलांसाठी महिला भवन सुरू करावे, अशी भूमिका महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी घेतली. तसे पत्र देऊन महासभेतही हा विषय घेतला आणि महिला भवन सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. महापौर बंगल्याचे क्षेत्रफळ ५०६ चौरस मीटर इतके असून त्याचे सुशोभीकरण व अंतर्गत बदल करून तेथे महिला भवन सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ९० लाखांचा खर्च होणार आहे. शहरात महिला भवन नसल्याने याठिकाणी महिला भवन झाल्यास महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षण देणे, महिलांच्या कार्यशाळा आदी उपक्रम राबवता येणार आहेत.

महिलांना हाेणार फायदा
महापौर हसनाळे यांनी पालिकेच्या महापौर निवासस्थानाचा वापर महिला भवन म्हणून करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील महिलांना याचा फायदा होईल. महिला भवन सुरू करण्यासाठी आवश्यक कामाच्या निविदा प्रक्रिया तातडीने करून काम वेळेत पूर्ण करा, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
 

Web Title: Get the work of Mahila Bhavan in the mayor's bungalow started soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.