वागळेमध्ये गणेशोत्सव दहाऐवजी दीड दिवसाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:40 AM2020-07-15T00:40:47+5:302020-07-15T00:41:06+5:30

उत्सवाचे दिवस कमी करण्याबरोबर या परिसरातील मंडळांनी मंडपाचे क्षेत्रफळ आणि गणेशमूर्तींची उंचीदेखील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ganeshotsav in Wagle is one and a half days instead of ten | वागळेमध्ये गणेशोत्सव दहाऐवजी दीड दिवसाचा

वागळेमध्ये गणेशोत्सव दहाऐवजी दीड दिवसाचा

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे ।

ठाणे : वागळे परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा दहा दिवसांचा गणेशोत्सव दीड दिवसावर आणला आहे. उत्सवाचे दिवस कमी करण्याबरोबर या परिसरातील मंडळांनी मंडपाचे क्षेत्रफळ आणि गणेशमूर्तींची उंचीदेखील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाविकांना घरातूनच गणरायाचे दर्शन घेण्याचे आवाहन या मंडळांनी केले असले तरी जे भाविक दर्शनासाठी येतील त्यांच्यासाठी ठरावीक आणि पाच-पाचच्या संख्येने दर्शनासाठी येण्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे, जे भाविक गणेश दर्शनासाठी येतील त्यांना प्रसादाऐवजी मंडळातर्फे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे.
अवघ्या एका महिन्यावर गणेशोत्सव आला आहे. तो साजरा करायचा या मतावर ठाण्यातील गणेश मंडळे ठाम आहेत. परंतु, याबाबत मंडळांनी स्वत:च्या पातळीवर नियमावली तयार केली आहे. ठाण्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून वागळे परिसरातील बहुतांशी सार्वजनिक मंडळांनी उत्सव दीड दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रत्येक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या उत्सवासंदर्भात आखलेल्या नियमावलीची कल्पना त्यांनी स्थानिक भाविकांनाही दिली आहे. आदल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत मंडपाच्या आतील भाग आणि आजूबाजूचा परिसर सॅनेटाईज करण्यात येणार आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही, यंदा भक्तांकडून वर्गणी न घेता पदाधिकारी आपापसांत वर्गणी काढून उत्सवाचा खर्च उचलणार आहेत.

किसन नगर नं. ३ येथील शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळाने रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी यंदा रस्त्यावर मंडप न टाकता शिवसेना शाखेत गणेशमूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

11
ऐवजी यंदा पाच दिवस गणेशोत्सव साजरा करणार आहोत तसेच तीन फुटांची मूर्ती आणणार आहेत. नागरिकांना लांबूनच दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष मधुकर खटाल यांनी सांगितले.

वागळे परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमध्येपण कमी झालेली नाही. कार्यकर्ते आणि गणेशभक्तांचा जीव धोक्यात नको म्हणून यंदा दीड दिवस गणेशोत्सव साजरा करणार. उत्सवाला गालबोट नको म्हणून हा निर्णय घेतला. १५ फुटांऐवजी ३ फुटांची गणेशमूर्ती आणणार आहोत. भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन करीत आहोत. तपासणी करूनच कार्यकर्त्यांना मंडपात दोन-दोनच्या संख्येने ड्युटी देणार आहोत.
- रवींद्र पालव, अध्यक्ष, भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, किसन नगर नं. ३

वागळे परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे आम्हीही ११ दिवसांचा गणेशोत्सव यंदा दीड दिवसावर आणला आहे. मंडपात एकावेळी दोनच कार्यकर्ते असतील याची दक्षता घेणार. पीओपीऐवजी ट्री गणेशाची स्थापना करणार. विसर्जन मिरवणूक न काढता जागीच विसर्जन केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी भल्या पहाटे गणेशाची स्थापना करणार तसेच हार -फुले न आणण्याचे आवाहन करणार आहोत.
- श्रीकांत परब, सभासद, जय बजरंग मित्र मंडळ, शिवटेकडी, किसन नगर नं. ३

आमच्या मंडळानेदेखील दीड दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ३ फुटांची शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करून टपातच गणरायाचे विसर्जन करणार आहोत. विसर्जनानंतर ती माती आणि रोपट्यांचे घरोघरी वाटप करू.
- प्रवीण भुटुगडे, सदस्य, श्री साईबाबा मित्र मंडळ, किसन नगर, संजय गांधी नगर, किसन नगर नं. २

Web Title: Ganeshotsav in Wagle is one and a half days instead of ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे