मानपाडा सर्कल ते स्टार कॉलनीदरम्यान सर्वत्र खड्डेचखड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:06 AM2019-09-28T01:06:33+5:302019-09-28T01:06:41+5:30

वाहतुकीचा मंदावतोय वेग : वाहने आदळणे, चाके रुतण्याच्या घटनांत वाढ

Everywhere between Manpada Circle to Star Colony | मानपाडा सर्कल ते स्टार कॉलनीदरम्यान सर्वत्र खड्डेचखड्डे

मानपाडा सर्कल ते स्टार कॉलनीदरम्यान सर्वत्र खड्डेचखड्डे

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मानपाडा रस्त्याच्या स्टार कॉलनी ते मानपाडा सर्कलदरम्यानच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा हा रस्ता शहरातील एक मुख्य रस्ता असतानाही त्याकडे पाच वर्षांत लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता होता की नाही, इतकी गंभीर अवस्था झाली आहे.

कल्याण-शीळ महामार्ग आणि डोंबिवली शहराला जोडणारे प्रमुख दोन रस्ते आहेत. त्यापैकी मानपाडा रोड हा एक आहे. शहरातून नवी मुंबई, पनवेल व पुढे मुंबई, पुणे, कोकणच्या दिशेने जाणारी वाहने मानपाडा रस्त्याने कल्याण-शीळ मार्गावर जातात. त्यामुळे केडीएमटी, एनएनएमटीच्या बस, स्कूल बस, रिक्षा, दुचाकी, मोटारी, अवजड वाहने याच रस्त्याने येजा करतात. तसेच लोढा, निळजे, संदप, भोपर, सोनारपाडा, कोळेगाव आदी ठिकाणचे नागरिक याच रस्त्याने डोंबिवली स्थानक गाठतात. परंतु, स्टार कॉलनी ते मानपाडा सर्कलदरम्यानच्या भागात प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यात वाहने आदळत आहेत. त्यामुळे मानपाडा रस्त्याने प्रवास करणे नकोसे झाले आहे. दुचाकी, रिक्षा यांची चाके अनेकदा खड्ड्यांमध्ये अडकत असल्याने अपघाताची शक्यता आहे. आधीच रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून चार ते पाच सीट घेतात. खड्डे जीवावर बेतण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. खड्ड्यांमुळे या परिसरात वाहतुकीचा वेगही मंदावत आहे. वाहतूककोंडीचा मोठा फटका स्कूल बसना बसतो. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच घरी पोहोचायला विलंब होतो. त्यामुळे पालक हैराण झाले आहेत.

स्टार कॉलनी ते मानपाडा सर्कलदरम्यान अभावानेच वाहतूक पोलीस आढळतात. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे चालकांमध्ये वाहन मागे घेण्यावरून वाद, हाणामारीचे प्रकार नेहमीच पाहायला मिळतात. खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त असतानाही ते बुजवण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या विभागाबाबत ते तीव्र शब्दांत रोष व्यक्त करत आहेत.

महापालिकेनेही केला पत्रव्यवहार
शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अन्य मंत्री, राजकीय नेते येणार असल्यास तातडीने डांबरीकरण केले जाते. मात्र, या रस्त्याला तसे भाग्य लाभले नसल्याची टीका परिसरातील रहिवासी करतात. नेते मंडळी शहरात एमआयडीसीच्या रस्त्यांवरूनच येजा करतात. ही मंडळी मानपाडा रस्त्याने गेल्यास त्यांना या रस्त्याची दुरवस्था समजेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाºया या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला आहे.
मानपाडा रस्त्याचा हा भाग बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून, या विभागाने डागडुजी करून द्यावी, यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली.

सतत पडणाºया पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झालीच आहे. तरीही, त्या भागात जसे जमेल तसे ग्रीड टाकण्याचे काम करण्यात येत आहे. पावसाळा काही दिवसांत संपेल. त्यानंतर त्यावर तातडीने डांबरीकरणाने खड्डे भरण्यात येतील. - प्रीतिश पराळे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Everywhere between Manpada Circle to Star Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे