आदेश! एकनाथ शिंदे यांची शिक्षकांना अनोखी ‘गुरूवंदना’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:42 AM2019-09-06T01:42:51+5:302019-09-06T01:43:08+5:30

निवडणुकीच्या कामासह अन्य कामे नकोत : १२ शिक्षकांचा केला सन्मान; जि.प.च्या प्रयत्नांमुळे पटसंख्येत वाढ

Eknath Shinde's unique 'Guruvandana' to teachers | आदेश! एकनाथ शिंदे यांची शिक्षकांना अनोखी ‘गुरूवंदना’

आदेश! एकनाथ शिंदे यांची शिक्षकांना अनोखी ‘गुरूवंदना’

googlenewsNext

ठाणे : शिक्षकांचा संबध विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांचा संबध थेट पालकांशी येत असल्याने त्यांचा मतदानावर प्रभाव पडू शकतो. यामुळे शिक्षकांवर निवडणुकीच्या कामासह अन्य कामे लादू नका, त्यांना नाराज करू नका असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिक्षकांना अनोखी गुरूवंदना केली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे, असे आवाहन त्यांनी गुरुवारी शिक्षक दिन कार्यक्रमात केले. शिक्षक दिनानिमित्ताने १० आदर्श शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. येथील एम.एच. हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतेवेळी शिंदे बोलत होते. हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खा. कपिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे सभापती वैशाली चंदे, किशोर जाधव, संगीता गांगड, सपना भोईर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, शिक्षणाधिकारी संगीता भागवत आदी उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षीच्या पाच शिक्षकांसह यंदाच्या पाच शिक्षकांचा आणि गेल्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त दोन शिक्षकांचा आदी जिल्ह्यातील १२ आदर्श शिक्षकांचा सन्मान यावेळी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. शिक्षणामध्ये क्र ांती घडवण्याची ताकद आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढलेल्या पटसंख्येच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, याची खात्री होते. अशाच पद्धतीने देशाचे उत्तम नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना कायम मदतीचा हात देत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत जाऊन कार्य केल्यास देशात एकही शिकवणी वर्ग सुरू राहणार नाही, असे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला गती असेल, त्या क्षेत्रात विद्यार्थ्याचा नावलौकिक कसा होईल, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आदर्श शिक्षकांप्रमाणेच आदर्श शाळांसाठीही स्पर्धा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनीही यावेळी मार्गदर्शपर भाषण केले. तर, मुरबाड तालुक्यातील डुंगे येथील शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत यावेळी गायले.
ग्रामीण भागातील शाळांना वीजबिलांचा वाढता खर्च भेडसावतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सौरऊर्जेवरील प्रकल्प उपलब्ध केल्यास शाळांना सुविधा होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधा दिल्या जात असून, गुणवत्तेवर भर दिला जात आहे. कोणत्याही दबावाविना केवळ गुणवत्तेवर १० शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केल्याचे सूतोवाचही सुभाष पवार यांनी यावेळी केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षक : चारु शीला किरण भामरे, आघाणवाडी शाळा, ता. अंबरनाथ, रमेश मंगल्या म्हसकर, वैजोळा, ता. भिवंडी, गिरीश नामदेव ठाकरे, जांभूळ शाळा, ता. कल्याण, संजय गोविंद उंबरे, पाटगाव, ता. मुरबाड, प्रमोद भाऊ पाटोळे, वायाचापाडा, ता. शहापूर, यांना या २०१९-२० या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर गेल्या वर्षी म्हणजे २०१८-१९ या वर्षी राज्य शासनाचा पुरस्कारप्राप्त हर्षल संजय साबळे या महिला शिक्षकेसह विजय कुमार देसले या दोन शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

याशिवाय गेल्या वर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ झाला नव्हता. तो गुरुवारी घेण्यात आला. यामध्ये मोहिनी पंडित बागुल, मुळगाव, ता. अंबरनाथ, अंकुश नारायण ठाकरे, राहनाळ, ता. भिवंडी, नारायण घावट, भिसोळ, ता. कल्याण, डॉ. नीळकंठ रामचंद्र व्यापारी, आंबेळे खु., ता. मुरबाड, भगवान दुंदा फर्डे, मुगाव, ता. शहापूर. या पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Eknath Shinde's unique 'Guruvandana' to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.