प्रत्येक पक्ष ताकद अजमावण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:54 PM2020-02-23T22:54:58+5:302020-02-23T22:55:08+5:30

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना सरस ठरली आहे. मात्र या शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आपली ताकद वाढवू पाहत आहे.

Each party prepares to try its strength | प्रत्येक पक्ष ताकद अजमावण्याच्या तयारीत

प्रत्येक पक्ष ताकद अजमावण्याच्या तयारीत

Next

- पंकज पाटील, अंबरनाथ/ बदलापूर

अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेची निवडणूक दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शहरातील राजकीय गणिते बांधण्यास सुरूवात झाली आहे. आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी निवडणुकीशिवाय दुसरी संधी नसल्याने नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना सरस ठरली आहे. मात्र या शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आपली ताकद वाढवू पाहत आहे. तर भाजपचीही तीच अवस्था आहे. जास्तीत जास्त ताकद वाढविण्याचा प्रयत्न तेही करत आहेत. मनसे आणि वंचित यांना मात्र आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत अंबरनाथमधील चार प्रमुख पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. वाढलेली ताकद नेमकी किती हे अजमावण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रत्येकवेळी मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याचा मान मिळविला आहे. शिवसेनेची शहरात ताकद आहे हे मान्य असले तरी आता त्यांच्या ताकदीला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शहरातील इतर राजकीय पक्ष करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची चर्चा रंगलेली असली तरी या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित येऊन भाजपचा मुकाबला का करतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप ही १० च्या वर न गेल्याने भाजपला हरविण्यसासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने का म्हणून एकत्रित यावे. त्यापेक्षा पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपल्या ताकदीवर निवडणूक लढवून नंतर एकत्रित येणे हे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली ताकद अजमावता येणार आहे, सोबत राजकीय समीकरणे जुळवताना आपल्या ताकदीप्रमाणे पदांचेही वाटप करणे शक्य होणार आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ भाजप आणि काँग्रेस आहे. शिवसेना सत्तेचा वापर करून आपली ताकद आणखी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजप आणि काँग्रेस हे स्वतंत्रपणे ताकद वाढवत आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस, भाजपने शिवसेनेच्या विरोधात उमेदवारांना तयारही केले आहे. शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार पुढे केल्याने त्या ठिकाणी तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारीचे आश्वासन आधीच दिल्याने आघाडी केल्यास शिवसेनेच्या विरोधात तयार केलेल्या उमेदवाराच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. कार्यकर्त्यांची फळी वाढवली जात असताना त्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता कसा टिकून राहील याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेपुढे कमीपणा घेणार की संघर्ष करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर हीच अवस्था भाजपची झाली आहे. भाजपही या निवडणुकीत शिवसेनच्या विरोधात आहे. त्यांनीही अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप ही काँग्रेस आणि शिवसेना अशा दोघांच्या विरोधात लढण्यास तयार झाली आहे.

अंबरनाथमधील राष्ट्रवादी ही रिपाइसोेबत घेऊन शहरात आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी राष्ट्रवादीचे तीन आणि रिपाइचे दोन असे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. ती संख्या वाढविण्याचे लक्ष राष्ट्रवादीचे आहे. मात्र राष्ट्रवादी महाविकासआघाडी सोबत असो वा शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढविणे असो या दोन्ही तडजोडीसाठी तयार आहे. मात्र स्वबळावर ताकद अजमावतांना त्यांचीही दमछाक होणार आहे.

अंबरनाथमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे मूळ लक्ष्य हे शिवसेनाच आहे. तर उरलीसुरली मनसेही शिवसेनेच्या विरोधातच आपली ताकद अजमावणार आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपसोबत एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी मनसे करत आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीचे समीकरण अंबरनाथमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. नव्याने नावारुपाला आलेली वंचित बहुजन आघाडी इतरांना त्रासदायक नक्की ठरेल हे मात्र उघड आहे. त्यामुळे वंचितला सोबत घेऊन कोण पुढे जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अपक्षांच्या जागेवर कोण करणार दावा ?
गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक हे शिवसेनेसोबत असल्याने त्यांना पक्ष संघटनेमध्ये सामावून घेत आगामी निवडणुकीत उमेदवारी देणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडी झाल्यावर अपक्ष नगरसेवकांच्या जागेवर कोण दावा करणार हा प्रश्न भेडसावत आहे. त्यावर तोडगा निघणे कठीण दिसत आहे.

Web Title: Each party prepares to try its strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.