ऋण काढून निवडणूक जिंकण्याचा निर्धार; ठामपा तिजोरीत केवळ २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:12 AM2021-03-27T00:12:42+5:302021-03-27T00:13:00+5:30

विकासकामांसाठी प्रसंगी घ्या कर्ज 

Determination to win elections by taking out loans; Only 25 crores in the treasury | ऋण काढून निवडणूक जिंकण्याचा निर्धार; ठामपा तिजोरीत केवळ २५ कोटी

ऋण काढून निवडणूक जिंकण्याचा निर्धार; ठामपा तिजोरीत केवळ २५ कोटी

Next

ठाणे : पुढचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने जर ठाणे महापालिकेकडे विकास कामांकरिता निधी उपलब्ध नसेल तर कर्ज काढून कामे पूर्ण करा, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी केली. ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणखी कर्ज काढून विकास कामे करण्याच्या मागणीबाबत नोकरशाहीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.     

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले मुद्दे उपस्थित केले. मात्र उत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला कर्ज काढण्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असतानाही विकास कामे होणे आवश्यक असल्याचे फाटक म्हणाल्या. बरेच उद्योग समूह कर्ज घेतात मग ठाणे महापालिकेला कर्ज घेण्यास काहीच हरकत नाही. पुढचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने आम्हाला लोकांसमोर जायचे आहे. त्यामुळे कर्ज काढून विकास कामे पूर्ण करावी अशी मागणी फाटक यांनी केली. शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी देखील कर्ज काढून विकास कामे करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने नगरसेवकांनी सुचवलेली कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत रेपाळे यांनी व्यक्त केले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामे केली आहेत त्यांची बिले निघत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. कर्ज घेतले म्हणजे महापालिका डबघाईला आली असे होत नाही. त्यामुळे विकासकामांसाठी कर्ज घेण्याचा आग्रह रेपाळे यांनी धरला.          

 ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे २५ कोटी शिल्लक आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि ठेकेदारांची बिले देण्यासाठी ठाणे महापालिकेला शासनाच्या १०० कोटी मुद्रांक शुल्कावर अवलंबून रहावे  लागणार आहे. मात्र परिस्थिती इतकी गंभीर असताना आगामी वर्षात येणाऱ्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करुन भागणार नाही. महापालिकेकडे पैसे नसल्यास कर्ज काढून नगरसेवकांनी सुचवलेली कामे पूर्ण करा, असा सूर सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी लावला.

Web Title: Determination to win elections by taking out loans; Only 25 crores in the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.