मंदी, दर्जाहीन अभ्यासक्रमामुळे अभियंते ‘दीन’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:52 AM2019-09-15T00:52:35+5:302019-09-15T00:52:55+5:30

आपल्या मुलांनी अभियंता किंवा डॉक्टर बनावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते.

Depression, unemployed courses cause engineers 'humble' | मंदी, दर्जाहीन अभ्यासक्रमामुळे अभियंते ‘दीन’

मंदी, दर्जाहीन अभ्यासक्रमामुळे अभियंते ‘दीन’

googlenewsNext

- स्वप्नील पेडणेकर
ठाणे : आपल्या मुलांनी अभियंता किंवा डॉक्टर बनावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी मग ऐपत नसताना लाखोंची कर्जे घेऊन त्याची फी भरली जाते. याचाच फायदा घेऊन इंजिनीअरिंग कॉलेजचे सर्वत्र पीक आले आहे. संस्थाचालकांनी स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी पदव्या वाटण्याचा अक्षरश: धंदा सुरू केला आहे. मात्र, बाजारात त्यांचे मूल्य शून्य होत असल्याने बेरोजगार अभियंत्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. एकीकडे स्किल इंडिया, मेक इन इंडियासारख्या या योजना राबवत असताना अभियंत्यांवर ओढवलेली ही स्थिती चिंताजनक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अनेकांवर पडेल ती कामे करण्याची वेळ ओढवली आहे.
एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी हजारो नवे अभियंते तयार होत आहेत. त्यातील सुमारे ८० टक्के बेरोजगार आहेत. अभियंत्यांच्या पदासाठी जागा निघाल्या, तर एका जागेसाठी ३०० अर्ज येतात. यामध्ये प्रतिष्ठित संस्थांतील पदवीधरांनाच संधी मिळत असल्याने इतरांच्या वाट्याला निराशा येत आहे. त्यातच, अर्थव्यवस्थाही गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित वातावरणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडमोडींबाबत संवेदनशील असलेली निर्यात आणि सेवाक्षेत्रांची कामगिरी डळमळीत सुरू आहे. आयटी क्षेत्राचे अर्थकारण ज्या अमेरिका आणि युरोपशी जोडलेले आहे, त्या देशांनाही मंदीची झळ सहन करावी लागत आहे. तसेच, अमेरिकेत स्थलांतराविषयीचे कायदे कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संकट ओढवले आहे. आॅटोमोबाइल उद्योगाचीही अवस्था बिकट झाली आहे. गेल्या सहासात महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घसरत आहे. परिणामी, उत्पादन घटवावे लागत असल्यामुळे नोकऱ्यांवरही गदा आली आहे. बांधकाम क्षेत्राचीही तीच स्थिती आहे. या सर्वच बाबींचा फटका इतरांबरोबर अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधारकांनाही बसत आहे.
स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि रोजगारांविषयी चर्चा करताना अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात नोकरी मिळवताना झगडावे लागत आहे. लाखो रुपयांची फी भरूनही दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात तंत्रकौशल्य आणि त्या क्षेत्रातील ज्ञान आवश्यक आहे, मात्र त्याचाच नव्या पदवीधारकांमध्ये अभाव दिसून येतो. या समस्येमुळे संपूर्ण व्यवस्थाच अडचणीत येऊ शकते, असे जेडी इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी संचालक रूपल दलाल यांनी सांगितले.
आर्थिक बाबींसोबतच कालबाह्य अभ्यासक्रम, दर्जेदार शिक्षकांची उणीव, आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आणि तंत्रशिक्षणाबाबतच्या धोरणातील त्रुटी यामुळे विविध कॉलेजमधून दर्जाहीन अभियंत्यांची निर्मिती होत आहे. आपल्या ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्षात वापर कसा करावा, हेही अनेकांना उमगत नाही. त्यातच तंत्रज्ञानातील बदलाच्या झपाट्यात जुना अभ्यासक्रम वेगाने मागे पडत आहे. अभियांत्रिकी कॉलेजना वाटलेली परवानगीची खैरात आणि त्यातून निर्माण झालेल्या असंख्य जागा या कशा भरायच्या, याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दरवर्षी ५० टक्के जागा रिक्त राहत असल्यामुळे आर्थिक चणचणीमुळे नवे अभ्यासक्रम, सुविधा देणे जड जात आहे. त्यामुळेच शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नोकºयाच मिळत नसल्यामुळे अनेकांना आपल्या क्षेत्राबाहेर नोकरी करावी लागत आहे. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे १०-१५ हजारांची नोकरीही ते करत आहेत. काही जणांवर तर मिक्सर, फॅन दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्राकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.
>मेकॅनिकलच्या ७२ टक्के, तर सिव्हिलच्या ६७ टक्के जागा रिक्त
तंत्रशिक्षण संचालनालयानुसार, राज्यात मेकॅनिकल शाखेच्या एकूण ३३,९०० जागा आहेत. यातील सुमारे ७२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल शाखेत अनुक्रमे ६७ टक्के आणि ६९ टक्के जागा रिक्त आहेत. तर, कॉम्प्युटर शाखेत १७,४९६ जागांपैकी ३३ टक्के जागा रिक्त आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यावर्षी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या एक लाख ६२ हजार जागा रद्द केल्या आहेत. २०१४-१५ मध्ये अभियांत्रिकीच्या जागा १९ लाख एक हजार ५०१ होत्या. त्यात आतापर्यंत चार लाख ३५ हजार ३८७ जागा कमी झाल्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेचे पदवीधरही आयटी आणि सेवा क्षेत्राकडे वळत आहेत. आॅटोमेशनमुळे उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक सुपरवायझर वा अभियंत्यांची गरज कमी झाली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उपलब्ध संधींच्या तुलनेत मनुष्यबळाचा पुरवठा वाढल्याने नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने नोकरी मिळणे हे मोठे आव्हान ठरत आहे.
>अभियांत्रिकीच्या घसरलेल्या जागांची आकडेवारी
वर्ष जागा
२०१४-१५ १९,०१,५०१
२०१५-१६ १८४४६४२
२०१६-१७ १७,५२,२९६
२०१७-१८ १६,६२,४८८
२०१८-१९ १५,८७,०९७
२०१९-२० १४,६६,११४

Web Title: Depression, unemployed courses cause engineers 'humble'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.