बांधकामावर कारवाई केल्याने शिवसेनेला केले बदनाम, दशरथ घाडीगावकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:16 AM2020-01-23T00:16:53+5:302020-01-23T00:17:14+5:30

कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी महासभेत शिवसेना आणि महापौर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

defaming Shiv Sena due to action against construction | बांधकामावर कारवाई केल्याने शिवसेनेला केले बदनाम, दशरथ घाडीगावकर यांचा आरोप

बांधकामावर कारवाई केल्याने शिवसेनेला केले बदनाम, दशरथ घाडीगावकर यांचा आरोप

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी महासभेत शिवसेना आणि महापौर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला होता. महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याने उपमहापौरांच्या पतीच्या नावे असलेल्या जागेवरील बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई जून २०१९ मध्ये केली होती. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले. त्या रागापोटी त्यांनी शिवसेना व महापौरांना बदनाम केल्याची माहिती शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांनी दिली आहे.

घाडीगावकर म्हणाले की, भोईर यांचे पती शक्तिवान भोईर यांच्या नावे सातबारा उतारा असलेली जागा आहे. या जागेवर रूपेश भोईर यांनी बांधकाम केले होते. प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी याप्रकरणी रूपेश भोईर यांना नोटीस दिली. त्याचबरोबर त्यांनी बेकायदा बांधकाम केले असल्याने ते पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला. पोलीस बंदोबस्त मागवून जून २०१९ मध्ये बांधकामे पाडण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे उपमहापौर संतप्त झाल्या. या गोष्टीचा राग त्यांच्या मनात होता. त्यांनी हाच राग २० जानेवारीला सभेत काढला. त्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची कुठेही वाच्यता न करता शिवसेना व महापौर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. हा त्यांचा आरोप त्यांचेच पितळ उघडे पाडणारा आहे, याकडे घाडीगावकर यांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे घाडीगावकर यांनी सादर केली आहेत. उपमहापौरांच्या शिवसेनेच्या विरोधात उलट्या बोंबा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘ती’ जागा विकसित करण्यासाठी दिलेली होती!
उपमहापौर भोईर यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्यांच्या पतीच्या नावे सातबाराची जागा ही वडिलोपार्जित आहे. ही जागा त्यांच्या पतीचे चुलत भाऊ रूपेश यांना करारनाम्यानुसार विकसित करण्यास दिली आहे. रूपेश यांनी बेकायदा बांधकाम करावे की अधिकृत, हे सांगण्याचा अधिकार आमचा नाही. त्यांनी बेकायदा बांधकाम केले, त्यांच्याविरोधात प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
मी अनेकदा बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी केल्या. त्यांच्याविरोधात कारवाई न करता आमच्या घरातील खुसपटे काढण्यात प्रभाग अधिकाºयांनी धन्यता मानली. अन्य बेकायदा बांधकामांवर प्रभाग अधिकाºयाने का कारवाई केली नाही, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला.

Web Title: defaming Shiv Sena due to action against construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.