CoronaVirus News : वेळेवर उपचार न मिळाल्याने कल्याणमधील रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:46 AM2020-06-21T00:46:59+5:302020-06-21T06:31:18+5:30

त्यांचा बराचसा वेळ वाया गेल्याने रुग्ण दगावला आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या आरेरावीचा फटका रुग्णांना बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Death of a patient in Kalyan due to untimely treatment | CoronaVirus News : वेळेवर उपचार न मिळाल्याने कल्याणमधील रुग्णाचा मृत्यू

CoronaVirus News : वेळेवर उपचार न मिळाल्याने कल्याणमधील रुग्णाचा मृत्यू

Next

कल्याण : शहरातील दोन रुग्णांपाठोपाठ आणखी एका रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खाजगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने रुग्णाचे कुटुंबीय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत उपचारासाठी वणवण फिरत होते. त्यात त्यांचा बराचसा वेळ वाया गेल्याने रुग्ण दगावला आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या आरेरावीचा फटका रुग्णांना बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील गंगोत्री इमारतीमधील रहिवासी विनोद हजारे (६०) यांना १५ जूनच्या मध्यरात्री १२ वा. छातीत दुखू लागले. त्यांचा मुलगा सौरभ, त्यांच्या पत्नी व शेजाऱ्यांनी त्यांना लाल चौकी येथील खाजगी रुग्णालयात नेले. तेथे नर्सने विनोद यांचा रक्तदाब व आॅक्सिजनची पातळी तपासली. आॅक्सिजन कमी असल्याने त्यांना मीरा रुग्णालयात नेले. मात्र, त्यांना तेथे सुविधा नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उपासनीस यांच्या रुग्णालयात नेले असता तेथे बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी एजीएन रुग्णालयात नेले असता त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. होलीक्रॉस रुग्णालयात नेले असता ते कोविड रुग्णालय असल्याने त्यांनी आत घेतले नाही. या सगळ्या प्रक्रियेत पहाटेचे ४ वाजले.
अखेरीस केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विनोद यांना इंजेक्शन देत आॅक्सिजनचा पुरवठा सुरू केला. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात अथवा जवळच्या खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगितले.
त्यानुसार विनोद यांना मुलाने शहरातील आयुष रुग्णालय नेले असता तेथे आक्सिजनची सुविधा नसल्याने मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला गेला. सौरभने कशीबशी खाजगी रुग्णवाहिका मिळवून विनोद यांना मुंबईतील सरकारी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू केले असता विनोद यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार मिळाले असते तर विनोद बचावले असते, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
>‘शास्त्रीनगर’मध्ये बेडची वानवा डोंबिवली पूर्वेतील एका ५० वर्षांच्या महिलेचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिच्या मुलाने तिला शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात नेले. तेव्हापासून शनिवार दुपारपर्यंत तिला बेड मिळाला नाही. त्यामुळे मुलाने आईला मानपाडा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. तर, आयुक्तांना मेसेज केले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
>या संदर्भात शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बेडेकर म्हणाल्या की, शास्त्रीनगर रुग्णालयात सध्या ५९ रुग्ण उपचार घेत आहे. बेड उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी व्यवस्था करा, असे सांगितले होते.

Web Title: Death of a patient in Kalyan due to untimely treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.