डोंबिवलीत ईव्हीएमविरोधी दहीहंडी; पूरग्रस्तांनाही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:10 AM2019-08-25T00:10:34+5:302019-08-25T00:11:35+5:30

ठाण्यातील दहीहंडी उत्सवावर पूर, महागाई, आर्थिक मंदी यांची छाया असल्याने यंदा या उत्सवाचा रंग फिका असेल, अशी अटकळ होती. मात्र, आयोजक व गोविंदा पथके यांचा उत्साह दांडगा होता.

dahihandi against EVM in Dombivli; Help for flood victims | डोंबिवलीत ईव्हीएमविरोधी दहीहंडी; पूरग्रस्तांनाही मदत

डोंबिवलीत ईव्हीएमविरोधी दहीहंडी; पूरग्रस्तांनाही मदत

Next

ठाणे : कोल्हापूर, सांगली व ठाणे जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे वाताहत झालेल्यांना मदतीचा हात देण्याकरिता जिल्ह्यातील शेकडो दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथके शनिवारी पुढे सरसावली. कुणी हजारांत तर कुणी लाखांत केलेल्या मदतीतून पूरग्रस्तांकरिता मदतीचे दिलासादायक थर लागले. त्याचवेळी थरांच्या थराराकरिता ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील दहीहंड्यांमध्ये थरांची स्पर्धा रंगली. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने दोन ठिकाणी नऊ थर लावले. रात्री उशिरा त्यांनी मनसेच्या उत्सवाच्या ठिकाणी १० थर लावून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा केलेला प्रयत्न फसला.


ठाण्यातील दहीहंडी उत्सवावर पूर, महागाई, आर्थिक मंदी यांची छाया असल्याने यंदा या उत्सवाचा रंग फिका असेल, अशी अटकळ होती. मात्र, आयोजक व गोविंदा पथके यांचा उत्साह दांडगा होता. एकीकडे उत्सवाचा आनंद घेत असतानाच सामाजिक भान राखण्याचा विसर ना दहीहंडी आयोजकांना पडला, ना गोविंदा पथकांना. शिवसेनेच्या दहीहंडीतून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली, तर प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने कोल्हापूर येथील मिरजेवाडी हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली.


मनसेच्या अविनाश जाधव यांनी आपल्या दहीहंडीच्या ठिकाणी पूरग्रस्त भागातील १० शेतकऱ्यांना पाचारण करून प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत दिली. तिकडे डोंबिवलीतील भाजपने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या दहीहंडीत पूरग्रस्तांकरिता २५ लाखांची मदत गोळा झाली. कल्याणमधील शिवाजी चौकात शिवसेनेने आयोजित केलेल्या दहीहंडीतून पूरग्रस्तांकरिता हजारो रुपयांची मदत देण्यात आली. अत्यंत साधेपणाने येथे हा उत्सव साजरा करण्यात आला.

डोंबिवलीत ईव्हीएमविरोधी दहीहंडी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यास विरोध केल्याने डोंबिवलीत मनसेने ईव्हीएमविरोधी दहीहंडीचे आयोजन
केले होते.
त्यातच परवाच्या दिवशी राज यांना ईडीने चौकशीकरिता बोलावले असल्याने मनसैनिकांमध्ये असलेला आक्रोश व संताप या दहीहंडीच्या ठिकाणी त्यांनी परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या व ईव्हीएमविरोधी मजकूर असलेल्या टी-शर्टमधून व्यक्त होत होता.
दहीहंडीला मटकीऐवजी ईव्हीएम मशीन लावण्याचे मनसेने ठरवले होते. दहीहंडीला लावण्याकरिता ईव्हीएम मशीनची प्रतिकृती आणताच पोलीस ती जप्त करण्याकरिता पुढे सरसावले.
यावेळी पोलीस व मनसैनिक यांच्यात झटापट होऊन ईव्हीएमची प्रतिकृती तुटली. त्यामुळे आमची ईव्हीएमविरोधी दहीहंडी फुटली, असे मनसेने जाहीर केले व सरकारचा निषेध केला.
जेटलींच्या निधनानंतरही ढाक्कुमाकुम
ठाण्यातील घोडबंदर भागात शिवाजी पाटील या भाजपच्या नेत्याने आयोजित केलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनानंतरही ढाक्कुमाकुम सुरूच होते. एकीकडे जेटली यांच्या निधनाची दृश्ये स्क्रीनवर दाखवली जात असताना दुसरीकडे डीजेच्या तालावर गोविंदा पथके व भाजपचे कार्यकर्ते थिरकत होते.
वृत्तवाहिन्यांनी यावरून पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार केल्यावर त्यांनी सायंकाळी ५ वाजल्यानंतर दहीहंडी गुंडाळली. तिकडे डोंबिवलीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडीत जेटलींच्या निधनाचे वृत्त आल्यावर डीजेचा आवाज बराच कमी करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभर
आयोजित केलेले मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, दहीहंडीचा उत्सव सुरूच ठेवण्यात आला.

 

Web Title: dahihandi against EVM in Dombivli; Help for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.