स्वामी विवेकानंद रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे तुटली; वाहनचालक, पादचा-यांच्या अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:49 PM2020-08-11T13:49:11+5:302020-08-11T13:49:34+5:30

 दुरुस्ती करूनही अवस्था तीच

The cover of the manhole on Swami Vivekananda Road was broken; Possibility of accident of driver, pedestrian |  स्वामी विवेकानंद रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे तुटली; वाहनचालक, पादचा-यांच्या अपघाताची शक्यता

 स्वामी विवेकानंद रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे तुटली; वाहनचालक, पादचा-यांच्या अपघाताची शक्यता

googlenewsNext

- अनिकेत घमंडी

डोंबिवली: शहरातील खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झालेली असतानाच आता रस्त्यामध्ये असलेले मॅनहोल तुटुन भगदाड पडल्याच्या घटनांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. येथील मानपाडा, स्वामी विवेकानंद पथ आदींसह अन्य भागातील मॅनहोल, डक्ट अनेक महिन्यांपासून तुटले आहेत. मानपाडा रस्त्यावरील ते झाकण बदलून देखिल एका रात्रीत त्याला भगदाड पडल्याने त्या झाकणांच्या दर्जाबाबत सवर्त्र चर्चा सुरु झाली आहे. अशा निकृष्ठ दर्जाच्या झाकणांमुळे वाहनचालकांसह पादचा-यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.

मानपाडा रस्त्यावरील मॅनहोलचे जुने झाकण तुटल्यासंदर्भात वरिष्ठ अभियंत्यांना कळवण्यात आले, त्यानूसार गेल्या आठवड्यात ते रात्री काम करून बदलून नवे टाकण्यात आले होते. मात्र ते झाकण एका रात्रीत तुटून त्यास भगदाड पडल्याने त्या झाकणांच्या दर्जासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. रामनगर येथे स्वामी विवेकानंद रस्त्यावर देखिल पाण्याचा डक्ट असलेल्या खड्याचे झाकण पाच महिन्यांपासून तुटलेले आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या ग प्रभागक्षेत्रातील अधिका-यांनी त्याची पाहणी केली, परंतू त्यास आता चार महिने होत आले असून परिस्थिती जैसे थे आहे. या तुटलेल्या झाकणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोविड रुग्णालय आहे. तेथे येणा-या रुग्णवाहिका, अन्य वाहने आदींना त्यापासून धोका होऊ शकतो, याची महापालिका अधिका-यांना कल्पना असूनही स्थिती जैसे थे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याखेरीज ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील पदपथांवर असलेले मॅनहोल देखील निकृष्ट दर्जाचे असून तुटलेले असल्याचे दिसून येत आहे. पावसाळया आधी गटारांमधील घाण काढण्यासाठी ती झाकणे काढण्यात आली होती, त्यापैकी बहुतांशी तुटली असूनही तशाच अवस्थेत कशीबशी लावून संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी वेळ मारून नेली असली तरी त्यामुळे पादचा-यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मात्र त्या वस्तूस्थितीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

यासंदर्भात मनपाच्या उपअभियंत्याशी संपर्क साधला असता मानपाडा रस्त्यावरील क्रॉस कल्व्हर्टचे झाकण ८ ऑगस्ट रोजी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतू नवे टाकण्यात आलेले झाकण हे कमी 20 टन ऐवजी 10 टन क्षमता सहन करेल एवढेच टाकल्याने ते देखिल तुटल्याची माहिती मिळाली असून ते पुन्हा बदलण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: The cover of the manhole on Swami Vivekananda Road was broken; Possibility of accident of driver, pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.