कोपर पुलासाठी १० कोटींचा खर्च; प्रस्ताव महासभेच्या मंजुरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:02 AM2020-01-14T01:02:18+5:302020-01-14T01:03:01+5:30

खर्च विभागून करण्यासाठी केडीएमसीचे रेल्वेला पत्र

The cost of the corner bridge is Rs. The proposal was approved by the General Assembly | कोपर पुलासाठी १० कोटींचा खर्च; प्रस्ताव महासभेच्या मंजुरीला

कोपर पुलासाठी १० कोटींचा खर्च; प्रस्ताव महासभेच्या मंजुरीला

Next

डोंबिवली : धोकादायक अवस्थेतील व सध्या वाहतुकीसाठी बंद असलेल्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे या पुनर्बांधणीच्या कामासाठी येणाऱ्या १० कोटी ३७ लाख ९२ हजार ५६ रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने मान्यतेसाठी २० जानेवारीला होणाºया महासभेपुढे सादर करणार आहे. दरम्यान, हा खर्च विभागून करण्यासाठी महापालिकेने रेल्वेला पत्रव्यवहार केला असून, नवीन करारनामाही सादर केला आहे. परंतु, त्यास रेल्वे प्रशासनाने अद्याप मान्यता दिलेली नाही.

डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तपासणीसाठी नेमलेल्या मे. रॅनकॉन कन्सल्टंट यांनी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करावा, असा अहवाल दिला होता. त्यानुसार, हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी १५ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. त्यामुळे सध्या वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून चालू आहे. दरम्यान, मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार उड्डाणपुलाचे सब-स्ट्रक्चर व सुपर-स्ट्रक्चर यांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर डेक स्लॅब पूर्णत: काढून नवीन बांधण्यात येणार आहे. डेक स्लॅबचे काम केडीएमसीने, तर सब-स्ट्रक्चर व सुपर-स्ट्रक्चरच्या विशेष दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने करावयाचे, असे २९ मे २०१९ च्या बैठकीत ठरले आहे. त्यानुसार, डेक स्लॅब तोडून नव्याने बांधण्यासाठी मे. रॅनकॉन कन्सल्टंट यांनी तयार केलेल्या नकाशांना आयआयटी आणि मध्य रेल्वे यांच्याकडून केडीएमसीने मंजुरी घेतली आहे.

उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील पोहोचरस्त्यावरील राजाजी पथासाठी असलेला अंडरपास पूलही खराब झालेला असल्याने तो पूलही तोडून नवीन बांधला जाणार आहे. त्यानुसार, रेल्वे उड्डाणपूल ते राजाजी पथ या भागातील वळण सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, पुनर्बांधणीच्या खर्चाला मान्यता मिळण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून प्रस्ताव २० जानेवारीच्या महासभेकडे पाठविण्यात आला आहे.

पुढील अंदाजपत्रकात तरतूद होईल
ठाकुर्ली, मोहने, वालधुनी व इतर ठिकाणी उड्डाणपूल, बोगदा तयार करणे यासाठी केडीएमसीच्या २०१९-२० च्या अंदाजपत्रकात केलेल्या २० कोटींच्या तरतुदींमधून कोपर उड्डाणपुलासाठी येणारा खर्च भागविला जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यामुळे अन्य प्रस्तावित आणि सध्या सुरू असलेल्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता कोपर उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करावी लागेल, याची कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नसल्यामुळे २०१९-२० च्या अंदाजपत्रकातील २० कोटींच्या तरतुदीखाली पुनर्बांधणीच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, पुढील अंदाजपत्रकात उड्डाणपूल पुनर्बांधणीच्या खर्चाचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे इतर कामांवर परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The cost of the corner bridge is Rs. The proposal was approved by the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.