कोरोनावर संक्रांत : शनिवारपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:53 AM2021-01-14T01:53:32+5:302021-01-14T01:53:48+5:30

आरोग्यसेवक नोंदणी ६२ हजार ७५०, अन् लस मिळाल्या ७४ हजार : ठाणे जिल्ह्याला पुरेसा साठा

Coronavirus: Vaccination from Saturday | कोरोनावर संक्रांत : शनिवारपासून लसीकरण

कोरोनावर संक्रांत : शनिवारपासून लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : आठ महिन्यांपासून असलेली कोरोना प्रतिबंधक लसींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल ७४ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांनी नोंदणी केली असून, त्यानुसार जिल्ह्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला असल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे. १० टक्के वेस्टेज सोडूनही काही प्रमाणात साठा शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस हा २८ दिवसांनी दिला जाणार असून, त्यासाठी पुन्हा लस उपलब्ध होणार आहेत.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. सध्याच्या स्थितीत राज्यासाठी ६० टक्के डोस उपलब्ध झाले आहेत. १७ लाख डोसची गरज असताना ९.६३ लाख डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या आरोग्यसेवकांपैकी ६० टक्के लोकांनाच ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, प्रत्यक्षात नोंदणी केलेल्या आरोग्यसेवकांपेक्षा आलेले डोस हे जास्तीचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांनी लसीसाठी नोंदणी केलेली असून शासनाकडून ७४ हजार डोस उपलब्ध झालेले आहेत. या ७४ हजारपैकी १० टक्के डोस वेस्टेज पकडलेले आहेत. म्हणजेच यातून ७ हजार ४०० वगळले तरी ठाणे जिल्ह्यासाठी ६६ हजार ६०० लस उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. तर २८ दिवसांनंतर पुन्हा दुसरा डोस दिला जाणार आहे. परंतु, त्यासाठी पुन्हा लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीदेखील सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नोंदणी केलेले आरोग्यसेवक 
ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ६० हजार आरोग्यसेवकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली होती. त्यात वाढ होऊन हा आकडा ६२ हजार ७५० च्या आसपास गेला आहे.

उपलब्ध होणारे डोस 
७४ हजार डोस उपलब्ध झाले असून, त्यातून ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांना लस दिली जाणार आहे.

६२ हजार ७५० आरोग्यसेवकांची नोंदणी असून, ७४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. त्या पुरेशा आहेत. १० टक्के लस या वेस्टेज पकडल्या आहेत.
- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक,
आरोग्य विभाग

कल्याण-डोंबिवलीला ६ हजार डोस प्राप्त

n कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी राज्य सरकारकडून कोविड शिल्डच्या ६ हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून, लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून करणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे. महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. प्रत्येक दिवशी १०० जणांना लस दिली जाणार आहे.

n रुक्मीणीबाई रुग्णालय, कल्याणमधील शक्तीधाम केंद्र आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, डीएनसी शाळा याठिकाणी लस दिली जाणार आहे. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लस न आल्याने अनेकांना जिविताची धास्ती होती. किती लोक लस घेण्यास उत्सूक आहेत हे प्रत्यक्ष लसीकरणावेळीच स्पष्ट होणार आहे. १० टक्के लोकांमध्ये लसीमुळे साईड इफेक्ट होण्याची भिती आहे.

उल्हासनगरमध्ये ४५०० जणांना देणार लस

n उल्हासनगर : शहरात कोरोना लसीकरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, यासाठी खाजगी रुग्णालय पालिकेच्या मदतीला धावणार आहेत. त्यानुसार उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी मंगळवारी सेंच्युरी, क्रिटिकेअर, सर्वांनंदन हॉस्पिटलची पाहणी केली.
n १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती सोंडे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य अशा ४५०० पेक्षा जास्त जणांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाचे महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी कौतुक केले.

 

Web Title: Coronavirus: Vaccination from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे