coronavirus : ठाण्यात दुध विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:08 PM2020-03-24T13:08:56+5:302020-03-24T13:08:56+5:30

दूध विक्री करताना ग्राहकांची  मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे .

coronavirus: Police action against milk vendors in Thane | coronavirus : ठाण्यात दुध विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई 

coronavirus : ठाण्यात दुध विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई 

Next

ठाणे - कळव्यातील दोन दूध विक्रेत्यांवर कळवा पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे . हे दोन्ही दूध विक्रेते पारसिक नगर येथे राहणारे असून कळवा नाक्यावर दूध विक्री करताना ग्राहकांची  मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे .  पोलिसांच्या या कारवाईमुळे दूध विक्रेता संघाकडून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दूध ही अत्यावश्यक सेवा असताना जर पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असेल तर दूध विक्री बंद करण्याचा इशारा दूध विक्रेता संघाकडून देण्यात आला आहे . त्यामुळे येत्या काही काळात नागरिकांना दूध मिळणे  देखील बंद होण्याची चिन्हे आहेत. 
 
सुधाकर एकसिंघे (५५) आणि संतोष पवार (४४) अशी कारवाई  करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही पारसिक नगर येथे राहणारे आहेत . कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तसेच संचार बंदी लागू केली असताना या दोघांनी सकाळी कळवा नाका या ठिकाणी दूध विकण्यासाठी दुधाच्या पेट्या ठेवल्या होत्या .  त्या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. गर्दी करू नका अशी विनंती देखील दूध विक्रेत्यांकडून करण्यात आल्यानंतरही आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांनी दूध घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे  कळवा पोलिसांनी या दोघांवरही  १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई तसेच वाहतुकीला अडथळा झाला म्हणून कारवाई करावी लागाली. या दोघांनाही  पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली असून यापुढे अशा प्रकारचे वर्तन होणार नाही असे लेखी स्वरूपात त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले . 

पोलिसांच्या या कारवाईमुळे  दूध विक्रेता संघामध्ये  मात्र नाराजीचे वातावरण आहे . संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळव्यात आल्या आहेत . तरीही दूध विक्रेत्यांवर अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नसल्याचे दूध विक्रेता संघांचे पदाधिकारी तसेच गोकुळ आणि महानंदा चे वितरक कृष्णा पाटील यांचे म्हणणे आहे .

जमावबंदी आणि  संचारबंदीमुळे दुधाची विक्री करण्यासाठी ड्रायव्हर देखील मिळत नाही. त्यामुळे दूध येण्यास देखील विलंब होत असून दूध येण्यास उशीर होत असल्याने ग्राहकांची गर्दी होत आहेत. ७० टक्के दूध हे रस्त्यावर आणि सकाळच्या वेळेसच विकले जाते. त्यामुळे दूध विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी आपण करत असून दूध विक्रेत्यांवर अशीच कारवाई सुरु राहिली तर नाईलाजास्तव दूध विक्री बंद करावी लागेल असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे .

Web Title: coronavirus: Police action against milk vendors in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.