coronavirus: वैद्यकीय कर्मचारी भरतीला केवळ १५ टक्केच प्रतिसाद, केडीएमसीतील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:08 AM2020-07-11T02:08:38+5:302020-07-11T02:08:51+5:30

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते.

coronavirus: Only 15% response to medical staff recruitment, reality in KDMC | coronavirus: वैद्यकीय कर्मचारी भरतीला केवळ १५ टक्केच प्रतिसाद, केडीएमसीतील वास्तव

coronavirus: वैद्यकीय कर्मचारी भरतीला केवळ १५ टक्केच प्रतिसाद, केडीएमसीतील वास्तव

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारांच्या घरात गेली असून, त्या तुलनेत मनपाची आरोग्य यंत्रणा थिटी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय अशा एकूण ८९० पदासांठी भरती प्रक्रिया राबविली. मात्र, आतापर्यंत केवळ १६१ जणच प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. ते पाहता मनपाच्या भरती प्रक्रियेला केवळ १५ टक्केच प्रतिसद मिळाला आहे. परिणामी, उर्वरित ७२९ पदे कशी भरायची, असा पेच प्रशासनापुढे आहे.
केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. तसेच मनपा विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड रुग्णालये सुरू करत असून, तेथे डॉक्टर, नर्सची गरज आहे. मनपाकडे एमडी पदवीधारक डॉक्टर नाही. त्यामुळे दोन एमडी डॉक्टरांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यांना पगार कमी असल्याने सुरुवातील दोन लाख तर, नंतर अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. तरीही या पदांना प्रतिसाद मिळालेला नाही. एमबीबीएस १२० डॉक्टर हवे होते. पण, या पदासाठीही कोणीही मुलाखतीसाठी आले नाही.
बीएएमएस पदासाठी १२० डॉक्टर हवे होते. पण अवघे १२ डॉक्टर मनपाच्या सेवेत रुजू झाले आहेत. ५८८ नर्सची आवश्यकता असताना केवळ ९७ नर्स कामावर हजर झाल्या आहेत. १४ एक्स रे तंत्रज्ञ हवे असताना १२ जण मिळाले आहेत. फार्मासिस्टच्या १५ च्या १५ जागा भरल्या गेल्या आहेत. नऊ इसीजी तंत्रज्ञांची गरज असताना तिघांनी काम स्वीकारले आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या २४ पैकी २२ जागा भरल्या गेल्या आहेत. मुलाखतीला प्रतिसाद मिळाला असला तरी कोरोनाच्या भीती पोटी अनेकांनी कामावर हजर होण्याची आॅर्डर स्वीकारलेली नाही.

७२९ पदांसाठी पुन्हा होणार भरती?

कोरोनाकाळात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत केवळ आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. केडीएमसीतील विविध ८९० पदांपैकी केवळ १५ टक्के म्हणजे १६१ पदे भरली गेली आहेत. उर्वरित ७२९ पदांसाठी केडीएमसीला पुन्हा भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

मनपाने १० दिवसांत एक हजार खाटांची व्यवस्था उभारण्याचा दावा केला आहे. तसेच प्रत्येक प्रभागांत किमान ३०० खाटांचे क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून जवळपास २५ हजार खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवस्थेसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे.

वॉर्डबॉयच्या ८० पदांसाठी १,११३ पात्र
भरती प्रक्रियेत केवळ वॉर्डबॉयची भरती अपवाद ठरली आहे. ८० पदांसाठी एक हजार १८९ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एक हजार ११३ जण पात्र ठरले आहेत. त्यामुळे पदसंख्या कमी आणि प्रतिसाद जास्त, असे चित्र पाहायला मिळाले आहे.

Web Title: coronavirus: Only 15% response to medical staff recruitment, reality in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.