CoronaVirus News: कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:51 AM2020-08-14T00:51:18+5:302020-08-14T00:51:29+5:30

पालघर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती; टेस्टिंगचे प्रमाण वाढवून रुग्णसंख्येला आळा घालण्याचे प्रयत्न, गावागावांतून कोविडविरोधात लढाई

CoronaVirus News: Efforts to stop Corona | CoronaVirus News: कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त!

CoronaVirus News: कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त!

Next

- हितेन नाईक 

पालघर : पालघर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या मार्च महिन्यापासून हनुमानाच्या शेपटीसारखी हळूहळू वाढतच चालली असून १३ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात असलेली एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ०९२ आणि ३८० मृत्यू अशी झालेली आहे. मार्चपासून जवळपास पाच महिन्याच्या कालावधीत कोरोना-बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात काय उणिवा राहिल्या याच्यावर अभ्यास करून नियोजनबद्ध आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे.

साधारणपणे २२ मार्चदरम्यान देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून २१ दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या. या वेळी पालघर जिल्ह्यात लक्षणे आढळलेले अवघे २० रुग्ण होते. एप्रिलमध्ये ११० पॉझिटिव्ह, १० मृत्यू, मे मध्ये जवळपास आठ पट वाढत रुग्ण संख्या ८४७ तर २९ मृत्यू या आकडेवारीत वसई-विरार महानगरपालिकेची कोरोनाबाधितांची संख्या ७८८ पॉझिटिव्ह आणि २९ मृत्यू अशी भयंकर होती. या वेळी कोरोना नियंत्रणाबाबत युद्धपातळीवर कडक धोरण अवलंबणे आवश्यक असताना लॉकडाऊनच्या बाहेर जाऊन दूरगामी नियोजनाचा अभाव दिसल्याने वसई तालुक्यातील वाढत्या प्रचंड संख्येने जिल्ह्यातील अन्य प्रशासनाला मात्र वेठीस धरले. वसई, नालासोपारा आदी भागात नोकरी, व्यवसाया-निमित्ताने जाणाऱ्याच्या माध्यमातून मग जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागली. यानंतर जूनमध्ये पॉझिटिव्ह संख्या ४ हजार ९८२ तर मृत्यू १३१, तर १३ आॅगस्टपर्यंत पॉझिटिव्ह संख्या १९ हजार ०९२ तर मृत्यू ३८० इतकी प्रचंड वाढत चालली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन दिवस-रात्र एक करीत आहेत. मात्र बिनकामाचे बाहेर पडणाºया काही बेपर्वा नागरिकांमुळे तसेच जिल्ह्याबाहेरून नोकरी निमित्ताने जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक कामासाठी दिलेल्या पासेसचा गैरवापरही कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रत्नातून कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकतो.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध गावांवरुन जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांमध्ये शेकडो नागरिक आले, मात्र आकडेवारी नाही.

कोरोनामुक्त गावे
पालघर जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील अनेक गावांनी कोरोनाचे संकट गावात येऊ नये, यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ दिसून येत आहे. अनेक गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखून धरण्यात यश मिळवले आहे.

प्राथमिक आ. केंद्र-उपकेंद्रांची भूमिका
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांची भूमिका या कोरोना संकटाच्या काळात खूपच महत्त्वपूर्ण ठरली आहे. कोरोनाशी लढताना योग्य ती काळजी घेऊन, वरिष्ठांच्या सूचनांनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांचे काम सातत्याने सुरू आहे.

अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी तसेच आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर्स यांचा खूपच उपयोग झालेला आहे. गावोगावी जाऊन त्यांनी योग्य त्या उपाययोजनांसाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांचे काम कौतुकास्पद असेच आहे.

नेमके
काय केले?
कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात २२ कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली.
पाच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली.
एकंदर ३१ संस्थांची निर्मिती करून साथीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत तीन उपजिल्हा रुग्णालय व नऊ ग्रामीण रुग्णालये कार्यरत.
जि.प.अंतर्गत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या खाली ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत.
तसेच ३१२ उपकेंद्रे अशी भक्कम फळी उपलब्ध आहे. या केंद्रात बाह्य रुग्ण सेवेसाठी येत असतात.
बाधितांच्या उपचारासाठी उभारलेल्या ३१ कोविड केंद्रांतील उपचारासंदर्भात तक्रारींचे निरसन.
आॅक्सिजन पुरवठा व व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याच्या
काही समस्या सोडवण्याचे प्रयत्न
रेमेडीसीविर आणि वॅसिलोझुमीव्ह या प्रभावी लसींचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत लसींच्या खरेदीचा प्रस्ताव.

रुग्णसंख्येला आळा
अनेक भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने गर्दीचे प्रमाण वाढले आहे. तसेच ठाणे, बोरिवली, वसई या भागातून प्रवासाच्या माध्यमातून रुग्णसंख्या वाढली आहे. टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यासाठी नव्याने
‘ट्रुमॅट’ नावाची मशीन उपलब्ध झाल्याने या रुग्णसंख्येला आळा घालता येईल.
- डॉ. कांचन वानेरे,
जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

बाहेरच्यांना रोखले
लोकांच्या मानसिकतेत बदल व्हावा, त्यांनी कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखाव्यात यासाठी प्रयत्न केले. बाहेरून येणाºयांना वेळीच रोखले.
-राजेश पाटील, खर्डी सरपंच

वस्तू विनामूल्य वाटप
निर्जंतुकीकरण फवारणी, मास्क, सॅनिटायझरचे विनामूल्य वाटप केले. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू भाजीपाला, गॅस आदीच्या पुरवठ्यात कमतरता येणार नाही याकडे लक्ष पुरविले.
- उदय मेहेर, नवापूर सरपंच

तरुणांची टीम बनवली
बाहेरची कुठलीही व्यक्ती गावात येणार नाही, याची काळजी घेताना गावातील सेवाभावी संस्थांना सोबत घेत प्रवेशद्वाराजवळ तरुणांची टीम बसवली. अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंचा पुरवठा केला.
-अरविंद पाटील, सातपाटी सरपंच

गावात जनजागृती
कोरोनाबद्दलची मनातली भीती काढून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी गावात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले. अत्यावश्यक सेवेची परिपूर्णता करताना संपूर्ण गाव सॅनिटायझिंग करून घेतले.
- हरेंद्र पाटील, उसरणी सरपंच

यंत्रणेला सहकार्य
कोरोनाची लोकांमधली भीती दूर करताना त्यांच्या मानसिकतेत वाढ केली. बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना अलगीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, आशा वर्कर यांना सहकार्य केले.
- करुणा तरे, एडवण सरपंच

Web Title: CoronaVirus News: Efforts to stop Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.