भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:22 PM2021-05-18T17:22:41+5:302021-05-18T17:29:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : शासकीय सर्व नियमांचे पालन करीत निसर्गरम्य वातावरणात हे कोविड सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची सोय देखील करण्यात आली आहे. 

CoronaVirus News The Covid Center set up by the Shelar Gram Panchayat in Bhiwandi | भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत  

भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत  

googlenewsNext

नितिन पंडीत 

भिवंडी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा व त्यातून निर्माण झालेला काळाबाजार यामुळे सर्वसामान्य कोविड रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असताना त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यात ग्राम पंचायतीने उभारलेले पाहिले कोविड सेंटर म्हणून शेलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर अवघ्या १५ दिवसांत ग्राम निधी व लोकसहभागातून उभारले आहे. मात्र सुसज्ज व सर्व सोयी सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अजूनही मान्यताच दिली नसल्याने हे सेंटर सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकत नसल्याची खंत शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांनी व्यक्त करीत सरकारी लालफिती बाबत नाराजी प्रकट केली असून महामारीच्या काळात ग्राम पंचयातीस सहकार्य करण्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी विनाकारण खोडा घालून नागरिकांना कोरोना महामारीसारख्या आजारात वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील सरपंच किरण चन्ने यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे ऐन महामारीच्या काळात देखील शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. 

सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांनी ग्रामपंचायत पातळीवर स्वतंत्र ५० बेड चे कोविड सेंटर जिल्हा परिषद शाळेत ग्रामनिधीतून उभारण्याचा निर्णय सभेत घेत कार्यवाही सुरू केली असता त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी सहकार्याचा हात पुढे करीत १५ दिवसांत शाळेचे रूपांतर सुसज्य कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. शासकीय सर्व नियमांचे पालन करीत निसर्गरम्य वातावरणात हे कोविड सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची सोय देखील करण्यात आली आहे. 

रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी सुसज्य स्वयंपाक गृह देखील याठिकाणी उभारण्यात आले आहे. त्यानंतर शासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला गेला परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला गेलेला आरोग्य विभागाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे तहसीलदार तावटे यांनी परवानगी नाकारल्याने हे सेंटर तयार होऊन ही सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही याची खंत अँड किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

हे सेंटर उभारताना लोक सहभागसुद्धा मोठा असल्याने सर्वानाच या कामाबद्दल आस्था आहे. जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी या केंद्राबद्दल प्रशंसा केली परंतु सरकारी बाबूगिरीने शुल्लक त्रुटी दाखवून परवानगी न देणे म्हणजे सर्वसामान्य गरजवंत रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे हे स्पष्ट करीत या सेंटरसाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्नी व विद्युत यंत्रणेचे परीक्षण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करून घेत सर्व अटी शर्तींची पूर्तता केली असतानाही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखविले जाते हे चुकीचे असल्याचे सांगत, सध्याच्या परिस्थितीत शासन कायद्या बाहेर जाऊन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना आमच्या प्रयत्नांना खो घालण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत असून हे असंवेदनशील, उदासीन प्रशासन यंत्रणेचे हे अपयश असून कोविड सेंटर तयार असून ते सुरू होऊन जनतेच्या उपयोगी यावे हिची इच्छा असून तसे न झाल्यास रुग्ण दगवल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेवटी सरपंच किरण चन्ने यांनी दिला आहे.


 

Web Title: CoronaVirus News The Covid Center set up by the Shelar Gram Panchayat in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.