Coronavirus : कोरोनाच्या भीतीमुळे मॉलमधील वर्दळ घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 01:22 AM2020-03-15T01:22:23+5:302020-03-15T01:22:54+5:30

ठाणे शहरातील मॉलमध्ये असलेले तसेच छोटे सिनेमागृह बंद झाल्याचे दिसून आले. त्यातही शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने ठाण्यातील दोन मोठ्या मॉलमध्ये गर्दी होत होती. परंतु, या शनिवारी मात्र या मॉलमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

Coronavirus : Corona's fears caused a spate of malls | Coronavirus : कोरोनाच्या भीतीमुळे मॉलमधील वर्दळ घटली

Coronavirus : कोरोनाच्या भीतीमुळे मॉलमधील वर्दळ घटली

Next

ठाणे - कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने ठाणे, मुंबईतील सिनेमागृहे, जिम, जलतरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ठाणे शहरातील मॉलमध्ये असलेले तसेच छोटे सिनेमागृह बंद झाल्याचे दिसून आले. त्यातही शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने ठाण्यातील दोन मोठ्या मॉलमध्ये गर्दी होत होती. परंतु, या शनिवारी मात्र या मॉलमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. तर, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मॉलधारकांनी आपल्या सुरक्षारक्षकांना मास्क देऊन स्वच्छतेबाबतही चोख पावले उचलल्याचे दिसून आले. मात्र, मेडिकलमध्येच सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने मॉलमधील दुकानांच्या प्रवेशद्वारावर ते दिसले नाही.

मध्यरात्रीपासून सिनेमागृहे बंद करण्याचे आदेश आल्यानंतर त्यानुसार त्या आदेशाचे पालन करून शहरातील सर्वच मॉलमधील सिनेमागृहांच्या बाहेर बंदचे फलक लावले आहेत. शहरातील छोटी सिनेमागृहेही बंद ठेवली होती. मॉलधारकांनी स्वच्छता तसेच नागरिकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले होते. त्यानुसार, कॅडबरी, नितीन कंपनी व घोडबंदर येथील मॉलचालकांनी खबरदारी घेतल्याचे दिसले. कॅडबरीजवळील मॉलच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच मॉलमधील प्रत्येक सुरक्षारक्षकांना मास्क बंधनकारक केले होते. तसेच वेळोवेळी फरशीची सफाईदेखील केली जात होती. स्वच्छतागृहांमध्येही साफसफाई आणि हॅण्डवॉश ठेवल्याचे दिसत होते.

शहरातील मॉलमध्ये शनिवार आणि रविवार आला की, जशी गर्दी दिसत असते, तशी गर्दी या शनिवारी मात्र दिसली नाही. यामध्ये जवळजवळ ५० टक्के घट झाल्याचे दिसले. सध्या जे कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर घोंगावत आहे, त्यातून सावरण्यासाठी आम्हीदेखील यात सहभागी असून त्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे मॉलधारकांनी सांगितले. त्यामुळे नफातोट्याचा विचार न करता या आजारावर मात कशी करता येईल, याचाच सध्या आम्ही विचार करत असल्याचेही स्पष्ट केले.

सॅनिटायझरचा तुटवडा
मॉलमधील प्रत्येक शॉपमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, असे असले तरी शहरात सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने मॉलमधील अनेक शॉपमध्ये ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील अनेक मेडिकलमध्ये मागील तीन दिवसांपासून याची कमतरता आहे.

महापौर जनसंवादही रद्द
नरेश म्हस्के हे मागील तीन महिन्यांपासून महापौर जनसंवादाचे आयोजन करतात. त्याला गर्दीही होते. परंतु, कोरोनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून या महिन्यातील जनसंवाद रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

विलगीकरण कक्षास विरोध
ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधलेल्या पाच मजली इमारतीत २५ खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी तातडीने ठाणे महापालिकेने घेतला असला तरी तेथे रुग्णांना ठेवण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. भरवस्तीत ही इमारत असल्याने या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण ठेवल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा नागरिकांनीच या इमारतीचा ताबा घेतला. अखेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथे ही सुविधा करण्याचा निर्णय तूर्तास थांबवला असून, हा वॉर्ड मनोरुग्णालयात हलवण्याचा विचार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

श्रीनगर येथील या इमारतीत तीन मोठे हॉल आणि १२ स्वतंत्र रूम असून, या ठिकाणी शुक्र वारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली. या इमारतीत ही तातडीची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शुक्र वारी संध्याकाळी घेण्यात आला होता. त्यादृष्टीने तेथे साफसफाई व इतर तयारीही केली होती. त्यामुळे रात्रीच तेथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामासाठी आल्याची बातमी स्थानिकांना समजली. त्यामुळे त्यांनी इमारती जवळ येऊन सफाईचे काम थांबवले. तसेच त्यांनी या इमारतींचा ताबा घेतल्याने पालिकेच्या यंत्रणेला काहीच काम करता आले नाही. अखेर मनोज शिंदे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अहिवर तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला.

एका रूममध्ये करणार होते एकाची सोय
अद्याप यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसला तरी या इमारतीत हा वॉर्डदेखील सुरू केला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये छोट्या छोट्या १२ रूम असून प्रत्येक रूममध्ये बाहेरून आलेल्या एका नागरिकाला स्वतंत्र ठेवण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

चित्रपटगृहे बंद करणे अनाकलनीय
ठाणे : कोरोनामुळे राज्यातील काही शहरांत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून शाळा, कॉलेज, तरणतलाव आणि चित्रपटगृहे बंद केली आहेत. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, मोठमोठे हॉटेल, बार व रेस्टॉंरंटमध्ये एकच ग्लास, प्लेट, चमचे वापरले जातात आणि हजारो लाखो एकाच ठिकाणी उठतात, बसतात, हात लावतात, अशा बार आणि रेस्टॉरंटवर ही बंदी लागू का नाही, असा सवाल मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजू माने यांनी केला आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरातील मॉलमधील सिनेमागृह, तसेच इतर छोटे सिनेमागृहही बंद केली आहेत. शासनाचा हा निर्णय योग्य आहे. मात्र, इतर गोष्टींकडेही माने यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठ्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये रोज शेकडो हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करतात, अशा आस्थापनांवरही बंदी आणली पाहिजे होती. मात्र, त्यांना या निर्बंधातून का वगळले हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानंतर ठाण्यातील सिनेमागृह, तरणतलाव, जिम बंद केले; परंतु या बारच्या बाबतीतही योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Coronavirus : Corona's fears caused a spate of malls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.