कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:57 AM2020-10-31T00:57:30+5:302020-10-31T01:24:26+5:30

कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते.

Corona's downfall on Kojagiri, decline in milk sales compared to last year | कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

Next

कल्याण : कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शुक्रवारी एकाच दिवशी आले. हा दुग्धशर्करा योग पाहता दुधाची मागणी वाढेल, अशी अपेक्षा शहरातील दूध नाक्यावरील दूधविक्रेत्यांना होती. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दुधाची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते. पश्चिमेतील मुस्लीमबहुल वस्तीत जवळपास १०० पेक्षा जास्त गोठे असून, त्यातील ताजे म्हशीचे दूध काढून जवळच असलेल्या दूध नाक्यावर सुटे विकले जाते. विशेष म्हणजे, ताज्या दुधाचा प्रतिलीटर भाव दररोज बदलत असतो. कोजागिरीला किरकोळ विक्रीसह अनेक सोसायट्या येथे दुधाची खरेदी करतात. १० ते ५० लीटरपर्यंत दूध येथून सोसायट्या घेऊन जातात. मग रात्री सोसायटीच्या आवारात अथवा गच्चीवर कोजागरी साजरी केली जाते. प्रत्येकाला चंद्रप्रकाशात गरम दूध दिले जाते.

ईद-ए-मिलादला मुस्लीमही दूध खरेदी करतात. त्यामुळे यंदा कोजागिरी व ईद-ए-मिलादला दुधाची जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांची होती. शुक्रवारी सकाळी दूध नाक्यावर दुधाचा भाव प्रतिलीटरमागे ६० रुपये होता, तर दुपारी २ वाजता हा भाव १० रुपयांनी वाढून ७० रुपये झाला. दिवसभरात केवळ १० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षी किमान २० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या दुलनेत यंदा विक्रीत ५० टक्के घट आहे. त्याचा फटका दूधविक्रेत्यांना बसल्याची माहिती दूधविक्रेते मोहम्मद हनी यांनी दिली. कोरोनामुळे दुधाची विक्री कमी झाली आहे.लोक एकत्रित येऊन सण साजरा करू शकत नाही. त्यामुळे जास्तीचे दूध घेऊन ते काय करणार, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.

गरम दुधासोबत चटकदार लाल शेव असलेले फरसाण जास्त विकले जाते. ते केवळ कोजागिरीनिमित्त तयार केले जाते. कोजागिरीला या खास फरसाणची जास्त मागणी असते. हे फरसाण २०० रुपये किलो दराने विकले जाते. त्याला यंदा मागणी कमी असल्याची माहिती एका डेअरीचे मालक प्रकाश हसीजा यांनी दिली. 

सोसायट्यांमध्ये कोजागिरी सुनसुनी 
 

कल्याण : कोरोनामुळे यंदा नागरिकांना कोणतेही सण, उत्सव उत्साहात साजरे करता आलेले नाहीत. दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्र मंडळी, महिला मंडळ जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. परंतु, कोरोनाचे विघ्न  टळले नसल्याने अनेक मंडळे, सोसायट्यांनी शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही.
डोंबिवलीतील रहिवासी वंदना सोनवणे म्हणाल्या की, मागील वेळेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वांगणी येथे फिरायला गेलो होताे. रात्रीच्या चंद्रप्रकाशात दूध, खीर पिण्यासाठी खूप मज्जा आली होती. माहुली गडावर जाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. परंतु, आता कोरोनामुळे महिला मंडळ बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या गच्चीवर जाऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा बेत आखला आहे.
घराघरांत खीर-पुरी, श्रीखंड यावर ताव
कोजागिरीची पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून दिले जाते. शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविण्यात आला. नंतर, नैवेद्य म्हणून ते दूध देण्यात आले. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खीर-पुरी, श्रीखंड-पुरी, तांदळाची पेज, अशी मेजवानी होती.
 

Web Title: Corona's downfall on Kojagiri, decline in milk sales compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.