Corona Virus News: संचारबंदीसाठी ठाणे पोलीस सज्ज: विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार करडी नजर

By जितेंद्र कालेकर | Published: April 14, 2021 11:50 PM2021-04-14T23:50:02+5:302021-04-15T00:07:41+5:30

वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.

Corona Virus News: Thane Police ready for curfew: | Corona Virus News: संचारबंदीसाठी ठाणे पोलीस सज्ज: विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार करडी नजर

एसआरपीएफसह राहणार पोलीस बंदोबस्त

Next
ठळक मुद्दे कलम १४४ चा भंग केल्यास होणार कारवाईएसआरपीएफसह राहणार पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळल्यास संबंधितांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
राज्य शासनाने यापूर्वीच रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश ४ एप्रिलपासून लागू केले होते. आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदीसाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात तसेच ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडयाही (एसआरपीएफ) तैनात केल्या आहेत. आयुक्तालयात एसआरपीएफच्या पाच कंपन्या (५०० जवान), ५०० होमगार्डस्, पोलीस मुख्यालयातील ७०० कर्मचारी याशिवाय, तीन हजार ५०० स्थानिक पोलिसांचा फौजफाटा खास संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. याशिवाय, वाहतूक शाखेचे ५०० कर्मचारीही दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये रस्त्यावर जागोजागी तैनात केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त वाहनांवर फिरणारे, मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणारे आणि अत्यावश्यक कामाचे नाव सांगून बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जागोजागी नाकाबंदी केली असून या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त नाकाबंदीचे नाक्यांवर अचानक तपासणी करणार आहेत.
* काय होणार कारवाई-
विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. जर तो एखाद्या वाहनातून जात असेल तर १७९ नुसार आदेशाचा भंग केल्यामुळे कलम २०७ प्रमाणे त्याच्याकडील वाहन जप्तीचीही कारवाई होऊ शकते.
* तर अटकेचीही कारवाई होऊ शकते-
संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याची आधी खातरजमा केली जाणार आहे. तो जर रुग्णालय, मेडिकल, औषध निर्माण कंपनी किंवा वाहतूकीसाठी जात असेल किंवा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अधिस्वीकृती पत्रकार तसेच रुग्णालयीन कर्मचारी असल्याचे आढळले तर कोणतीही कारवाई होणार नाही. पण यापैकी काहीही नसतांना पोलिसांशी हुज्जत घातली तर गरज पडली तर त्याच्यावर अटकेचीही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
* ठाणे ग्रामीणमध्येही बंदोबस्त-
ठाणे ग्रामीणमध्येही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड, गणेशपूरी आणि शहापूर या विभागांमधील ११ पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त आहे. याठिकाणीही नाकाबंदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Corona Virus News: Thane Police ready for curfew:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.