Coronavirus: कोरोना रुग्णांची एक कोटी ६४ लाखांची लूट; रुग्णांना फक्त सहा लाखांचा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 01:14 AM2020-10-17T01:14:08+5:302020-10-17T01:14:28+5:30

खासगी हॉस्पिटलने दाखवली आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली 

Corona patients robbed of Rs 1.64 crore; Patients should be reimbursed only Rs six lakh | Coronavirus: कोरोना रुग्णांची एक कोटी ६४ लाखांची लूट; रुग्णांना फक्त सहा लाखांचा परतावा

Coronavirus: कोरोना रुग्णांची एक कोटी ६४ लाखांची लूट; रुग्णांना फक्त सहा लाखांचा परतावा

Next

ठाणे : कोरोनावरील उपचारानंतर अवाजवी बिल देत गोरगरीब रुग्णांचे खिसे कापणाऱ्या खासगी रुग्णालयांना लगाम घालण्याच्या गंभीर मुद्याला मनसेने वाचा फोडल्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांचे बिल योग्य पद्धतीने तपासण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. या तपासणीत तब्बल पावणोदोन कोटींच्या आक्षेपार्ह बिलांचा झोल समोर आला. मात्र, पाच महिने उलटूनही केवळ पाच लाख ९३ हजार ९३३ रुपयांचा परतावा रुग्णांना करण्यात आला आहे. 

ठाण्यातील खासगी हॉस्पिटलनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. संबंधित रुग्णालयांनी रुग्णांचे पैसे परत न केल्यास मनसे स्टाइल दणका देण्याचा इशारा मनसेचे संदीप पाचंगे यांनी दिला आहे. कोरोना लढ्यात एकीकडे राज्य शासनाने सुरुवातीला तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो अशी आणि नंतर माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी भावनिक साद नागरिकांना घातली. ठाण्यात मात्र या उक्तीच्या विरोधाभासी वागत खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरू केली होती. कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता.

रुग्णालय प्रशासनाचा बिलांबाबतचा गलथानपणा रोखा, अशी मागणी पाचंगे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार, तत्काळ पालिका प्रशासनाने कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आठ कनिष्ठ लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमने परीक्षण करून एक कोटी ६४ लाख ६८ हजार २५६ रुपयांची बिले आक्षेपार्ह ठरवली होती. मात्र, केवळ पाच लाख ९३ हजार ९३३ रुपयेच रुग्णांपर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लुबाडलेले पैसे परत करा
आधी अवाजवी बिले आकारून रुग्णांचा खिसा कापला. कोरोना रुग्णांचे लुबाडलेले पैसे त्यांना खासगी रुग्णालयांकडून मिळालेच पाहिजेत, अन्यथा मनसेच्या दणक्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी.- संदीप पाचंगे, विभागाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ओवळा-माजिवडा विधानसभा
 

 

Web Title: Corona patients robbed of Rs 1.64 crore; Patients should be reimbursed only Rs six lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.