कोरोना रुग्णाला घरातच लावावा लागला ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:32+5:302021-04-17T04:39:32+5:30

ठाणे : ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय पवारनगर येथील एका दाम्पत्याला आला. १३ एप्रिलपासून ...

The corona patient had to be given oxygen at home | कोरोना रुग्णाला घरातच लावावा लागला ऑक्सिजन

कोरोना रुग्णाला घरातच लावावा लागला ऑक्सिजन

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय पवारनगर येथील एका दाम्पत्याला आला. १३ एप्रिलपासून रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करूनही वॉररूममधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या दाम्पत्याने घरातच स्वत:हून ऑक्सिजन लावून घेतला. विशेष म्हणजे, महापालिकेच्या कर्मचा-यांनी संबंधित दाम्पत्याची घरी येऊन चौकशी केल्यानंतरही वॉररूममध्ये नोंदणी झालेली नसल्याने बेड मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. अखेर, आरोग्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधल्यानंतर सूत्रे हलली.

निशिगंधा व्होल्टास कॉलनी येथे राहणा-या दाम्पत्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. ठाणे न्यायालयात कार्यरत असलेली ही महिला आणि तिचा पती यांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट १३ एप्रिल रोजी आला होता. त्यानंतर त्यांनी ठामपाच्या वॉररूमशी संपर्क साधून रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचा-यांनीही या दाम्पत्याची विचारपूस केली. मात्र, दोन दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांची कुठेही व्यवस्था झाली नाही. त्यानंतर सदर दाम्पत्याने वॉररूमशी संपर्क साधल्यानंतर, “तुमची नोंदणीच झालेली नाही; त्यामुळे तुम्हाला बेड कसा मिळणार?” असा प्रतिप्रश्न करून रुग्णालयातील प्रवेश नाकारला. गुरुवारी सदर महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या तिच्या पतीनेच बाहेर जाऊन ऑक्सिजनची व्यवस्था केली. घरातच या महिलेला ऑक्सिजन लावला. ही बाब राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव शशिकला पुजारी यांना समजताच त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून या दाम्पत्याला रुग्णालय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, नोंदणीचे कारण पुढे करून रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे पुजारी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मेसेजद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर टोपे यांचे स्वीय सहायक वैभव काळे यांनी फोनद्वारे संबंधितांना सूचना दिल्यानंतर एका बेडची व्यवस्था करण्यात आली. या संदर्भात शशिकला पुजारी यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळपासून आपण रुग्णालय उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. ठामपाचे अधिकारी मनोहर धायगुडे यांनी तर नोंदणी न करता बेड कसा मागता, असा सवाल केला. अखेर, आपण राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर एका बेडची व्यवस्था झाली.

Web Title: The corona patient had to be given oxygen at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.