दप्तरांचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा महासभेत; शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:36 AM2020-01-14T00:36:29+5:302020-01-14T00:36:40+5:30

पुस्तकांच्या बाइंडिंगसाठी दोन कोटी खर्च

The controversial proposal of the offices again in the General Assembly; Decision of the Department of Education | दप्तरांचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा महासभेत; शिक्षण विभागाचा निर्णय

दप्तरांचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा महासभेत; शिक्षण विभागाचा निर्णय

Next

ठाणे : ठाणे महापालिका शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेच्या पटलावर आणला आहे. यानुसार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना महिनाभराच्या अभ्यासासाठी एक पुस्तक आणि एक वही दप्तरात बाळगावी लागणार आहे. जुलै महिन्याच्या महासभेत या प्रस्तावावरून वादंग निर्माण झाले होते. शिक्षण समितीला विश्वासात न घेता हा प्रस्ताव आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आता मात्र शिक्षण समितीने याला मंजुरी दिल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. त्यानुसार, आता विद्यार्थ्यांच्या हाती येत्या शैक्षणिक वर्षात बाइंडिंग केलेली पुस्तके पडणार आहेत. एक वर्षासाठी या योजनेवर तब्बल दोन कोटी दोन लाखांचा खर्च केला जाणार आहे.

ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या यापूर्वी ३७ हजारांच्यावर होती. आजघडीला ती २७ ते २८ हजारांच्या घरात आहे. काही शाळांची अवस्था दयनीय आहे. शौचालयांना कडीकोयंडा नाही. दाटीवाटीने भरणारे वर्ग, धोकादायक असलेल्या इमारती अशा परिस्थितीत अनेक शाळा आहेत. असे असताना या सुविधा देण्याऐवजी हायटेक योजना राबवून मलिदा लाटण्याचा आरोप जुलैच्या महासभेत लोकप्रतिनिधींनी केला होता. तसेच शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातून पुस्तके देण्याचा हा प्रकार असल्याचा ठपकाही ठेवला होता. विशेष म्हणजे शिक्षण समितीला विश्वासात न घेता हा प्रस्ताव थेट महासभेत आणलाच कसा, असा आक्षेप त्यावेळेस शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी घेतला होता. त्यामुळे तो रद्द केला होता. त्यावेळेस तो दोन वर्षांसाठी तयार केला होता. त्यासाठी तीन कोटींहून अधिकची रक्कम खर्च केली जाणार होती. आता, मात्र नव्याने तो तयार केला असून याला शिक्षण समितीची मान्यता घेतल्याचा दावा उपायुक्त मनीष जोशी यांनी केला. त्यानुसार, आता तो २० जानेवारीच्या महासभेत पटलावर ठेवला आहे.

महिनाभराचा अभ्यासक्रम राहणार एका पुस्तिकेत

  • महापालिकेच्या १५० च्या आसपास शाळा असून त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक मिळून ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांची वर्गवारीदेखील केली आहे.
  • यामध्ये मासिक म्हणजे महिन्याचा अभ्यास एका पुस्तकात एकत्रित केला जाणार आहे. त्यानुसार, याच पद्धतीने महिन्याचे वेळापत्रक तयार केले जाणार असून त्यानुसार पुस्तकांची बांधणी (बाइंडिंग) केले जाणार आहे. म्हणजेच, नवी पुस्तके फाडून ती बाइंडिंग केली जाणार आहेत, असा याचा सरळ अर्थ होत आहे.
  • दीड वर्षापूर्वी अशा प्रकारची योजना पुण्यात जिल्हा परिषदेने काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली होती. आता ठाण्यातही हा प्रयोग राबविण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना किती विषय आहेत, त्याचे नियोजन आखून प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी आहेत, याची आखणी केली आहे.
  • यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती अशा सर्व शाळांची पटसंख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये गृहीत धरून यासाठी वार्षिक दोन कोटी दोन लाख ५१ हजारांचा खर्च अपेक्षित धरला आहे. आता लोकप्रतिनिधी त्याला मंजुरी देणार की दप्तरी दाखल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: The controversial proposal of the offices again in the General Assembly; Decision of the Department of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.