नगरपालिका निवडणुकीच्या मतदारयादीवरून संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:02 AM2020-11-28T00:02:02+5:302020-11-28T00:02:20+5:30

बाेगस नावांची धास्ती : यादीच्या अभ्यासावर उमेदवारांचे भवितव्य

Confusion over municipal election voter list | नगरपालिका निवडणुकीच्या मतदारयादीवरून संभ्रमावस्था

नगरपालिका निवडणुकीच्या मतदारयादीवरून संभ्रमावस्था

Next

पंकज पाटील

अंबरनाथ :  कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने पालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. भरीसभर म्हणजे, पालिकेची निवडणूक लागल्यावर नेमकी मतदारयादी कोणती घेतली जाणार, याबाबतही संभ्रम वाढत आहे. त्यातच २५ सप्टेंबरच्या मतदारयादीत अनेक बोगस नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारी येत असल्याने अधिकारी धास्तावले आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांची निवडणूक ही एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ती स्थगित करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यातच, लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने सर्व कारभार सांभाळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आली आहे. लॉकडाऊन उघडल्यावर पालिका निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीत घेण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येणार, या भीतीने आता पुन्हा प्रशासन निवडणुकीच्या कामापासून लांब सरकले आहे. मात्र, संभाव्य निवडणुकांसाठी मतदारयादी केव्हाची वापरली जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ३० जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध झालेली मतदारयादी ही निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती. त्या अनुषंगाने तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, निवडणूक स्थगित झाल्याने आता नव्याने प्रसिद्ध झालेली मतदारयादी घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदारयादी २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या यादीत अनेक प्रभागांत अनोळखी व्यक्तींची नावे टाकण्यात आल्याचे समोर येत आहे. मतदारयादीच्या अभ्यासावरच इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

निवडणूक आयाेगाकडे तक्रार
मतदारयादी निश्चित करताना त्या यादीवर कोणतीही हरकत नोंदविण्याची संधी न दिल्याने आता इच्छुक उमेदवारांनी २५ सप्टेंबरच्या मतदारयादीचा अभ्यास सुरू केला आहे. त्यात प्रभागात नसलेल्या व्यक्तींचीही नावे दिसत आहेत. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जी नावे प्रभागात नसतानाही मतदारयादीत टाकली आहेत, ती वगळण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Web Title: Confusion over municipal election voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.