कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:34 AM2021-05-13T11:34:57+5:302021-05-13T11:38:15+5:30

नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे.

Companies can't get people and workers can't get work | कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

Next

पंकज राऊत -

बोईसर : कोविड-१९ विषाणूचा सर्वत्र वाढलेला प्रचंड प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक  निर्बंधांबरोबरच ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीमुळे कोरोनाचा प्रसार काहीसा नियंत्रणात   येत आहे, ही  समाधानाची बाब असली तरी जसे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आरोग्यावर होतात तसेच त्याचे परिणाम बहुसंख्य उद्योगांवरही जाणवू लागले आहेत. विविध कारणांमुळे उत्पादनांचीही ‘ब्रेक द चेन’ होण्याच्या मार्गावर असल्याने  उद्योजकांची आर्थिक घडी पुन्हा रुळावरून घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

 नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे. फेब्रुवारी, मार्चदरम्यान कोरोनाच्या  आदळलेल्या महाभयंकर दुसऱ्या  लाटेत उत्पादनात प्रचंड घट होत असल्याने उद्योजकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

कुशल मनुष्यबळाची अडचण, इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा तुटवडा, कच्च्या मालाच्या भावात झालेल्या वाढीबरोबरच वेळेवर न मिळणारा कच्चा माल, बंद असलेल्या बाजारपेठा, मूळगावी परतलेले परप्रांतीय कामगार, स्थानिक कामगारांमध्ये असलेली संसर्गाची भीती, इम्पोर्ट व  एक्सपोर्टच्या माल वाहतुकीवर  झालेला परिणाम, अवजड मालाची चढ-उतार करण्याकरिता मजुरांची कमतरता, कच्चा व पक्क्या मालाचा वाहतुकीवर झालेला परिणाम व  मंदावलेली वाहतूक व्यवस्था,  यंत्रसामग्री (मशिनरी)ची देखभाल (मेन्टेनन्स ) दुरुस्तीदरम्यान  वेळेवर स्पेअर पार्ट्स उपलब्ध होत नसल्याने बंद पडणारी मशिनरी, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या  भीतीने  कामगारांच्या अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण, ऑर्डर आहे, परंतु नियोजित वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे पार्टी जाण्याची टांगती तलवार अशा अडचणींमुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांमधील उत्पादनावर गंभीर  परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास त्याच्या दूरगामी परिणामाला उद्योजकांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध क्षेत्रांवर 
गंभीर परिणाम
जिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने याचा उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे.

 कुशल कामगारांच्या तुटवड्याबरोबरच वेळेवर उपलब्ध न  होणारा कच्चा माल आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, कोरोनाचे सावट इत्यादी अनेक अडचणींमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याने  नियोजित वेळेत व  ठरलेल्या किमतीमध्ये पक्क्या मालाचा पुरवठा करण्याकरिता तारापूर येथील उद्योजकांना अनंत अडचणी येत आहेत.
  - डी .के. राऊत, अध्यक्ष, 
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

आम्ही अकुशल कामगार असून सध्या तारापूर एमआयडीसीमध्ये आम्हाला रोज काम मिळत नसल्याने नाका कामगारांप्रमाणे उभे राहण्याच्या ठिकाणी प्रतीक्षा करून घरी परतावे लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंतेत आम्ही आहोत? 
- विजय गौरा, कामगार
 

Web Title: Companies can't get people and workers can't get work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.