Commentary on Bharati Jadhav's video on the disfiguration of Ghanekar Natyagraha | घाणेकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर भरत जाधवांची व्हिडीओमधून टीका
घाणेकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर भरत जाधवांची व्हिडीओमधून टीका

ठाणे : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा एसी बंद असल्याने, घामामुळे चिंब भिजलेल्या अवस्थेत अभिनेता भरत जाधव यांनी नाट्यगृहाच्या व्यवस्थापनावर टीका करणारा व्हिडीओ शनिवारी फेसबुकवर शेअर केला. ठाण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा तसा नवीन नसला, तरी जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नाट्यक्षेत्र ढवळून निघाले आहे.

ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ नाटकाचा प्रयोग शनिवारी दुपारी सुरू होता. पावसाने विश्रांती घेतल्याने अगोदरच उकाडा वाढला आहे. अशातच या प्रयोगादरम्यान एसी बंद पडल्याने कलाकारांची मोठी गैरसोय झाली. जाधव यांनी आपली व्यथा फेसबुकच्या माध्यमातून मांडली आणि त्यांचा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, लगेच कलाकारांसह ठाणेकरांनीही घाणेकरमधील असुविधांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी या व्हिडीओचे समर्थन करीत, एवढ्या मोठ्या कलाकाराला अशा पद्धतीने नाट्यगृहाची व्यथा मांडावी लागते, हे चुकीचे असून याची दखल पालिकेने घ्यावी, अशी मते मांडली आहेत.
या आधीही नाट्यगृह बंद असणे, तसेच मिनी थिएटर्समध्ये समस्यांवर ठाण्यातील कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत, प्रशासनाकडे या नाट्यगृहाबाबत तक्रारीही केल्या होत्या.

शनिवारी प्रयोगाच्या मध्यंतरात भरत जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांना झालेल्या त्रासाबाबत आपली व्यथा मांडली. हा व्हिडीओ पाहिल्यावर सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी रविवारी पालिका अधिकाऱ्यांसोबत जाऊन नाट्यगृहाची पाहणी केली व संबंधितांना
लागलीच सूचनादेखील केल्या. भरत जाधव यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. यावेळी उपस्थित पालिकेच्या अधिकाºयांना यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मनसेने या प्रकाराची दखल घेतली असून, पक्षाचे पदाधिकारी सोमवारी पालिका प्रशासनाला याबाबत पत्र देणार आहेत.

काय म्हणाले भरत जाधव...
फेसबुकच्या माध्यमातून ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर टीका करताना भरत जाधव म्हणाले, ‘मी ओलाचिंब झालोय, पण पावसात भिजून नव्हे, तर घामाच्या धारांमुळे. कारण डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील एसी बंद आहे. या ठिकाणी माझ्या नाटकाचा प्रयोग सुरू आहे. भाडे पूर्ण घेऊनही, माझ्याबाबतीत दोन, तीन वेळा असे प्रकार घडले आहेत. एसी सुरू करण्याबाबत कर्मचाºयांना वारंवार सांगितले, पण याची दखल कोणी घेत नाही. म्हणून मला आॅनलाइन यावे लागले,’ अशा शब्दांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगाच्या दोन तास आधी तांत्रिक बिघाड झाला होता, परंतु त्यानंतर प्रशांत दामले यांचे नाटक व्यवस्थित पार पडले. कालचा प्रकार हा अपघाताने घडला असला, तरी घाणेकरमध्ये सुविधांचा अभाव आहे, हे मात्र खरे. या नाट्यगृहात ४० सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांवरचा खर्च कमी करून, तो सोईसुविधांसाठी वापरला, तर असे प्रकार घडणार नाहीत. पालिकेने नको त्या ठिकाणी होणारा खर्च कमी करावा. - विजू माने, दिग्दर्शक

एका कलाकाराला असा व्हिडीओ शेअर करावा लागतो, हे लाजिरवाणे आहे. गेल्या वर्षी येथील मुख्य नाट्यगृह बंद होते. वारंवार यंत्रणा कशा बंद पडतात? नाट्यगृहाची देखभाल-दुरुस्ती योग्य रीतीने होतेय का, हेही पाहणे गरजेचे आहे. या नाट्यगृहात स्वच्छता करणारी माणसे कमी आणि सुरक्षारक्षकच जास्त आहेत. अशा नाट्यगृहात प्रयोग करायचे नाही, अशी भूमिका निर्माते आणि कलाकारांनी घेऊन बघावी, म्हणजे काही फरक पडेल. - उदय सबनीस, ज्येष्ठ अभिनेते

शनिवारी नाट्यगृहात तांत्रिक बिघाड झाला होता, परंतु सोईसुविधा असल्या पाहिजेत, हे तितकेच खरे. नाट्यगृहात कधी आवाजाची, कधी एसीची, तर कधी स्वच्छतागृहांची सोय व्यवस्थित नसते. नाट्यगृहाचे छत कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रत्येक वेळी काही ना काही घडते. भरत जाधव जे बोलले, त्याच्याशी मी सहमत आहे. - मंगेश देसाई, अभिनेते

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना, एसीची थंड हवा येत नसल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि त्यांनी तो जाहीर केला. रविवारी मी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाºयांसमवेत नाट्यगृहाची पाहणी केली. यापुढे कलाकारांना आणि प्रेक्षकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासंबंधी सूचना केल्यात. नाट्यगृहाची उर्वरित कामे त्वरित करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले आहे. भरत जाधव यांना नाहक त्रास झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. - नरेश म्हस्के, सभागृह नेते

नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर विद्युत विभागातील कर्मचाºयांनी सांगितले की, नाट्यगृहातील हत्ती दरवाजा थोडासा उघडा राहिल्याने एसीची हवा बाहेर जात होती, पण एसी व्यवस्थित सुरू होता. हा प्रकार मानवी चुकांमुळे घडला आहे. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान त्या दरवाजाजवळ सुरक्षारक्षक ठेवण्यात यावे, अशी कर्मचाºयांना सूचना केली आहे. बांधकाम खात्यामार्फत नाट्यगृहातील फॉल सीलिंगचे सुरू असलेले काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाईल. - रवींद्र खडताळे, नगरअभियंता, ठामपा

साडेतीन हजार कोटींचे बजेट असणाºया पालिकेला काळिमा फासणारी ही घटना आहे. ठाण्यात दोनच नाट्यगृहे आहेत. तीदेखील जपली जात नसतील, तर कसली प्रगती आणि कसले प्रगतिशील ठाणे, हाच विचार आमच्या मनात येतो. - अविनाश जाधव, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष, मनसे


Web Title: Commentary on Bharati Jadhav's video on the disfiguration of Ghanekar Natyagraha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.