कल्याण एसटी डेपोतील बस १०० टक्के कोरोना फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:19+5:302021-09-19T04:41:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा एसटीची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील ...

Bus at Kalyan ST Depot 100% Corona Free | कल्याण एसटी डेपोतील बस १०० टक्के कोरोना फ्री

कल्याण एसटी डेपोतील बस १०० टक्के कोरोना फ्री

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा एसटीची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ठाणे आणि कल्याण डेपोतून मुंबईच्या दिशेने बससेवा सुरू होती. दुसऱ्या लाटेच्या वेळी बस संचलनावर निर्बंध असतानाही कल्याण डेपोतून एसटी बस सुटत होत्या. प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याची सक्ती कायम होती. त्यावेळी एसटी बसच्या प्रत्येक फेरीनंतर बस निर्जंतूक केली जात होती. आता त्यावर जालीम तोडगा एसटी महामंडळाने शोधला. निर्जंतुकीकरणासाठी प्रत्येक बसना रासायनिक कोटिंग केले जात आहे. त्यामुळे बस दररोज निर्जंतूक करण्याची गरज नाही. हे द्रव्य इतके प्रभावी आहे की, त्याच्या सान्निध्यात आलेला कोरोनाचा विषाणू तग धरत नाही. तसेच एकदा बस कोटिंग केली की दोन महिन्यांपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहतो.

--------------------------

दोन महिन्यांतून पुन्हा कोटिंग

कल्याण एसटी बस डेपोतील सगळ्या बसना १५ दिवसांपूर्वीच कोटिंग केले आहेत. त्यामुळे आता दोन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोटिंग केले जाईल. त्याचे कंत्राट महामंडळाने एका खासगी कंपनीला दिले आहे.

----------------------------------------

बाधित व्यक्ती उठून गेली तरी धोका कमी

कोरोनाबाधित व्यक्ती एखाद्या आसनावर बसला. त्याला कोरोनाची लक्षणे असली तरी त्याच्याकडून पसरला जाणारा विषाणू हा बसमध्ये तग धरू शकत नाही. त्याचा संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी मास्कचा वापर करणे हे देखील आवश्यक आहे. केवळ बस कोटिंग झाली म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही.

---------------------

प्रवासी काय म्हणतात?

१. बस कोटिंग केलेल्या आहेत, ही चांगली माहिती आहे. मात्र अनेक प्रवाशांना ही माहितीच दिली जात नाही. त्यामुळे प्रवासी आजही भीतीच्या सावटाखालीच संशयित वृत्तीने प्रवास करतात.

- शिवम संगारे

२. बसना कोटिंग केले असले तरी मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती हवीच. सॅनिटायझर बस व्यवस्थापनाकडून पुरविले जात नसले तरी प्रवाशांनी मास्क परिधान करूनच प्रवास केला तर अन्य प्रवाशांना त्रास होणार नाही.

- रूपेश बाळदकर

----------------------------------------

कल्याण डेपोतून एकूण ७० बस लांब पल्ल्यासह आसपासच्या मार्गावर धावतात. या बसमधून दिवसाला १० ते १५ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी सगळ्या बस कोटिंग करण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थापनाने बस १०० टक्के कोरोना फ्री केलेल्या आहेत. बाकी काळजी प्रवाशांनी घ्यायची आहे.

-विजय गायकवाड, एसटी डेपो व्यवस्थापक, कल्याण.

----------------------------------------

कल्याण-नाशिक

कल्याण-धुळे

कल्याण-पालघर

कल्याण-नगर

कल्याण-पुणे

कल्याण-जालना

कल्याण-कोल्हापूर

कल्याण-अलिबाग

कल्याण-सोलापूर

एकूण बस - ७०

कोटिंग झालेल्या बस - ७०

----------------------------------------

Web Title: Bus at Kalyan ST Depot 100% Corona Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.