कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:01 PM2020-08-14T15:01:26+5:302020-08-14T15:01:33+5:30

मुंबईत ५ ऑगस्टनंतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. मात्र, ठाण्यात दुकानांवर निर्बंध होते.

BJP leader Sanjay Kelkar has criticized Shiv Sena leader Eknath Shinde | कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका

कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका

Next

ठाणे: एकीकडे कोरोनाच्या आपत्तीत राजकारण नको म्हणायचे. अन्, श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत विरोधकांना डावलायचे, अशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची दुटप्पी भूमिका आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी केली आहे. महापालिका ही कोणाची जहागिरी नाही, असा टोलाही भाजपाने लगावला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्याचा निर्णय काल दुपारी घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला भाजपचे आमदार वा प्रतिनिधींना बोलाविण्यात आले नव्हते. तर शिवसेनेकडून दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतल्याचे श्रेय घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर केळकर व डावखरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबईत ५ ऑगस्टनंतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. मात्र, ठाण्यात दुकानांवर निर्बंध होते. या संदर्भात सर्वप्रथम भाजपाने आर्थिक विवंचनेतून जात असलेल्या व्यापाऱ्यांची अडचण जाणून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन दिले. त्यावेळी अधिकृत भूमिका घेणारा भाजपा हा एकमेव पक्ष होता. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे नेते गप्प होते. मात्र, काल झालेल्या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागली. कोरोनाच्या काळात राजकारण नको, म्हणताना विरोधकांना विश्वासात न घेताच परस्पर बैठका घेण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत, असे केळकर व डावखरे यांनी सांगितले.

ठाण्यात आता कोरोनाच्या संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरातील संसर्ग रोखण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांप्रमाणेच सामान्य ठाणेकरांचाही हातभार लागत आहे. मात्र, महापालिका ही आमचीच जहागिरी आहे, असे कोणी समजू नये. आता पुढील काळात यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्यामुळेच कोरोना आटोक्यात आल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाल्यास ठाणेकरांना आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही केळकर व डावखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.

Web Title: BJP leader Sanjay Kelkar has criticized Shiv Sena leader Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.