Bhiwandi Jilani building accident; The death toll was 38 and 25 injured | भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा 38 तर 25 जखमी

भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा 38 तर 25 जखमी

नितीन पंडित 

भिवंडी-  शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या आकडेवारीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती, बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून मिळत होती. मात्र पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जण मृत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली व त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी या इमारतीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तर  या  दुर्घटनेत एका अडीच वर्षांचा मुसीफ शब्बीर कुरेशी या मुलाचा मृतदेह अजूनही मिळाला नसल्याने मुलाचे वडील शब्बीर कुरेशी हे गुरुवारी चौथ्या दिवशीदेखील आपल्या मुलाची वाट पाहत इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबले होते. तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आपल्या आप्त स्वकीयांची आठवण म्हणून या ढिगाऱ्यात काही मिळते का, यासाठी शोधाशोध करत होते.

दरम्यान या घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी चार सदस्य चौकशी समिती नेमली असून येत्या सात दिवसांत समिती अहवाल देणार आहे. तत्पूर्वी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभाग तिचे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना यापूर्वीच निलंबित केले असून, चौकशीनंतर या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर इमारत कोसळण्याचे नेमकी कारण काय याची देखील चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. 

Web Title: Bhiwandi Jilani building accident; The death toll was 38 and 25 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.