Bend to railway projects due to lack of coordination | समन्वयाअभावी रेल्वे प्रकल्पांना खीळ
समन्वयाअभावी रेल्वे प्रकल्पांना खीळ

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेमार्गावर स्थानकांमधील पादचारी पूल, होम प्लॅटफॉर्म असे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे असहकार्य, रेल्वे आणि विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयाअभावी त्यांना खीळ बसत आहे. यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची खंत ठाणे रेल्वे प्रवासी संघ, वांगणी रेल्वे प्रवासी संघटना आदींनी केली आहे.
ठाणे रेल्वेचा नुकताच १६६ वा वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर सध्याच्या रेल्वे प्रकल्पांची स्थिती आणि प्रवाशांची गैरसोय याबाबत गुरुवारी प्रवासी संघटनांनी ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली.
या संघटनांचे अध्यक्ष मनोहर शेलार, नंदकुमार देशमुख म्हणाले की, टिटवाळा रेल्वेस्थानकातील पादचारी पूल, शहाड-आंबिवली दरम्यानचा उड्डाणपूल, वांगणी स्थानकातील पादचारी पूल तसेच बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्म ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य मिळत नाही.
देशमुख यांनी ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, तर शेलार यांनी वांगणी, बदलापूर नगर परिषद आदींकडे रेल्वे प्रकल्पांसंदर्भात सहकार्याबाबत चर्चा, पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र, अनेकदा टोलवाटोलवी झाल्याने हे प्रकल्प कागदावरच राहिल्याची टीका देशमुख यांनी केली.
देशमुख म्हणाले की, अनेक प्रस्तावित प्रकल्प कागदावरच आहेत. कसारा मार्गावर तिसरी, चौथी रेल्वेलाइन हा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१४ पासून केवळ कागदावर आहे. तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यापलीकडे काहीच झालेले नाही. टिटवाळा-गुरवली स्थानकांदरम्यान गावामध्ये येजा करण्यासाठी उड्डाणपुलाची मंजुरी आहे, पण ते सगळे हवेत असल्याचे देशमुख म्हणाले. आंबिवली-शहाडदरम्यान वडवली सेक्शनमध्ये अनेक वर्षे अर्धवट बांधकाम झालेला उड्डाणपूल, टिटवाळा रेल्वेस्थानकात काम सुरू असलेला पादचारी पूल, कागदावरच असलेला ठामपाच्या हद्दीतील दिव्याचा उड्डाणपूल याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारी यंत्रणांनी सहकार्य करून हे प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.
>रेल्वे प्रशासनाला त्यांच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. ज्यावेळेस त्यांचे प्रकल्प आपल्या हद्दींशी संबंधित असतात, तेव्हा केडीएमसी प्रशासनाकडून सहकार्य केलेच जाते.
- तरुण जुनेजा,
प्रकल्प अभियंता, केडीएमसी
>रेल्वे प्रशासनाला हवे ते सहकार्य केले जाते. ठामपांतर्गत येणारे उड्डाणपूल, पादचारी पूल याबाबतीत जे आराखडे आम्ही रेल्वे प्रशासनाला देणे अपेक्षित असते, ते तातडीने देतो. काही वेळेस तांत्रिक अडचण येते. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. प्रवासी संघटनांना सर्व माहिती दिली जाईल.
- संदीप माळवी, उपायुक्त,
जनसंपर्क अधिकारी, ठामपा


Web Title: Bend to railway projects due to lack of coordination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.