अंबरनाथ चित्रपट महोत्सव : अंकुश चौधरी, मनोज जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:56 PM2020-01-13T22:56:34+5:302020-01-13T22:56:41+5:30

‘माई घाट क्राइम’ चित्रपट सर्वाेत्कृष्ट

Ambarnath Film Festival: Ankush Chaudhary, Manoj Joshi Best Actor | अंबरनाथ चित्रपट महोत्सव : अंकुश चौधरी, मनोज जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

अंबरनाथ चित्रपट महोत्सव : अंकुश चौधरी, मनोज जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

Next

अंबरनाथ : अंबरनाथ येथे अंबरभरारी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे झालेल्या पाचव्या चित्रपट महोत्सवात यंदा ‘माई घाट क्राइम नं १०३/२००५’ हा चित्रपट सर्वाेत्कृष्ट ठरला. तर, या महोत्सवात सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा मान अंकुश चौधरी (ट्रिपल सीट) आणि मनोज जोशी (आता बस्स) या दोघांना विभागून देण्यात आला. सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा मान सावट चित्रपटासाठी स्मिता तांबे यांना देण्यात आला. अंबरनाथच्या गावदेवी मैदानावर दिमाखदार सोहळ्यात हा महोत्सव पार पडला.

अंबरनाथमधील अंबरभरारी या ग्रुपच्या पुढाकाराने सलग पाचव्या वर्षी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटांचे नामांकन आणि त्यांचे परीक्षण झाल्यावर या महोत्सवाचा पारितोषिक समारंभ रविवारी, १२ जानेवारीला गावदेवी मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

अंबरभरारीचे प्रमुख सुनील चौधरी आणि गुणवंत खिरोदिया यांच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवण्यात आला होता. भव्य असे रंगमंच आणि सिनेकलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या महोत्सवात सर्वांना ओढ होती, ती सर्वाेत्कृष्ट चित्रपटाची. यंदा हा मान ‘माई घाट क्राइम’ चित्रपटाला देण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यासोबत इतर मनोरंजनाचे कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले. निखिल चौधरी, रमेश कोळी आणि निषाद जोशी यांनी हे सादरीकरण केले. तर, संपूर्ण कार्यक्रमात प्रेक्षकांना खेळवत ठेवण्यासाठी सूत्रसंचालनाची जबाबदारी अमेय रानडे आणि पूर्वी भावे यांच्यावर होती. या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, ज्येष्ठ अभिनेत्या उषा नाडकर्णी, अभिनेते अंकुश चौधरी, संगीतकार अशोक पत्की आदी उपस्थित होते.

स्वप्नील बांदोडकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा मान ‘ट्रिपल सीट’ चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट फत्ते शिकस्त, सर्वोत्कृष्ट संगीत एक निर्णय या चित्रपटातील कमलेश भडकमकर आणि रोहन देशमुख यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा मान स्वप्नील बांदोडकर, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आनंदी जोशी यांना देण्यात आला.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार किशोर नांदलस्कर यांना देण्यात आला. कारकीर्द सन्मान म्हणून अशोक पत्की यांचा गौरव करण्यात आला. तंत्रज्ञ गौरव म्हणून मनोहर आचरेकर तर सिनेपत्रकारिता गौरव संतोष भिंगार्डे यांना देण्यात आला.

Web Title: Ambarnath Film Festival: Ankush Chaudhary, Manoj Joshi Best Actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.