शासनजमा झालेल्या हॉस्पिटलच्या भूखंडावरुन झाला गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:39 AM2019-12-13T00:39:55+5:302019-12-13T00:41:41+5:30

अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा

Amarnath Municipal Council has seized the land allotted by the government to set up a hospital | शासनजमा झालेल्या हॉस्पिटलच्या भूखंडावरुन झाला गदारोळ

शासनजमा झालेल्या हॉस्पिटलच्या भूखंडावरुन झाला गदारोळ

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदला हॉस्पिटल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५२ वर्षांपूर्वी दिलेला भूखंड पुन्हा ताब्यात घेतला आहे. यासंदर्भातील आदेशाची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाला नव्हती. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त येताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दुसरीकडे पालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करताना काँग्रेसने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. अधिकारी बेजबाबदारपणा दाखवत असल्याने पालिकेच्या ताब्यातील भूखंड शासनजमा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी या वेळी केला. पाटील यांच्या आरोपानंतर प्रशासनाने आपली चूक कबुल केली असून हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पालिका सभागृहात पार पडली. सभा सुरु झाल्यावर लागलीच काँग्रेसच्या गटनेत्यांनी लोकमतमधील वृत्ताबाबत सभागृहात चर्चा सुरु केली. अंबरनाथ पालिकेचा ३ एकरचा हॉस्पीटलसाठी राखवी असलेला भूखंड हा पुन्हा शासन जमा केल्याचे सदस्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. पालिकेच्या विरोधात एवढा मोठा निर्णय झालेला असतानाही पालिकेला त्याची किंचितही कल्पना नव्हती. यासंदर्भात पालिका प्रशासनाने आपली तत्परता दाखवली नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

गेली ५२ वर्षे हा भूखंड संरक्षित ठेवण्याचे काम कोहोजगाव ग्रामस्थांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, या भूखंडाच्या संरक्षणासाठी भिंतदेखील उभारली होती. मात्र २०१४ ते २०१६ या कार्यकाळात सहावेळा सुनावणी झाली असताना पालिकेच्या वतीने एकही अधिकारी या सुनावणीला हजर राहिलेला नाही. ही गंभिर चूक असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी प्रदिप पाटील यांनी केली. या भूखंडाच्या संरक्षणाबाबत नगरसेवक वारंवार पाठपुरावा करत असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला.

पालिकेचा भूखंड शासनजमा होण्यास पालिकेचे सर्व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका वृशाली पाटील यांनी केले. या आधीदेखील असे प्रकार पालिकेसोबत घडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी सभागृहात मान्य करण्यात आली. या चर्चेनंतर प्रदिप पाटील यांनी सभागृहात हा भूखंड शासनाकडून पुन्हा मिळविण्यासाठी अपील करावे अशी मागणी केली. त्यालादेखील सभागृहाने सहमती दर्शवली.

बेथल चर्च रस्त्याची मार्किंग करण्याचे आदेश

अंबरनाथमधील बेथल चर्च ते फुलेनगरकडे जाणाºया एमएमआरडीएच्या रस्त्याचे काम रखडले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने रुंदीकरणाची मार्किंग न केल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ करण्यासाठी मार्किंग करण्याचे आदेश नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी दिले.

भाजपचा सभात्याग

शहरातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना भाजपच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेला विरोध दर्शविला. भाजप नगरसेवकांचे विषय घेतले जात नसल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. यावर संतापलेल्या सत्ताधाºयांनीदेखील भाजप नगरसेवकांचे जे विषय पटलावर आहेत ते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत यानिमित्ताने चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.

मा. गांधी विद्यालयाच्या जागेवर फेरीवाले

अंबरनाथ पालिकेने स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी या फेरीवाल्यांना स्टेशनच्या बाहेर, म्हणजे २०० मिटर अंतरावर हलविण्याची तयारी केली आहे. मात्र पश्चिम भागातील फेरीवाल्यांना ज्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे, ती जागा महात्मा गांधी विद्यालयाची आहे. शासनाने ही जागा महात्मा गांधी विद्यालयाला दिलेली आहे. त्यामुळे पालिकेने हा कसा निर्णय घेतला याबाबत सभागृहात संभ्रम निर्माण झाला होता.

Web Title: Amarnath Municipal Council has seized the land allotted by the government to set up a hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.