बॉस-शेठच्या मनोमिलनाने कार्यकर्ते झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 01:31 AM2020-09-20T01:31:23+5:302020-09-20T01:32:05+5:30

बॅनरबाजी, निवडणुकीत भिडल्याने वितुष्ट

The activists were amazed by the jitendra awhad and pratap sarnaik meeting | बॉस-शेठच्या मनोमिलनाने कार्यकर्ते झाले अवाक्

बॉस-शेठच्या मनोमिलनाने कार्यकर्ते झाले अवाक्

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात ‘बॉस’ अशी ओळख असलेले गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ‘शेठ’ म्हणून परिचित असलेले आ. प्रताप सरनाईक यांना वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या प्रकल्पाने झटपट जवळ आणले. १२ वर्षांचा दुरावा हे दोघे झटपट विसरले. मात्र बॅनरबाजी, निवडणूक प्रचारावरून परस्परांना अक्षरश: भिडलेले, शिवीगाळ केलेले उभयतांचे कार्यकर्ते अवाक् झाले आहेत. कालपर्यंत ज्यांना पाण्यात पाहिले त्यांच्या गळ्यात गळे कसे घालायचे, असा सवाल खासगीत कार्यकर्ते करीत आहेत.


राजकीय पक्ष असो की नेते अनेकदा किरकोळ मुद्द्यावरून, निवडणूक प्रचारावरून अथवा पोस्टर-बॅनर लावण्यावरून त्यांच्यात तीव्र मतभेद होतात. अशावेळी पक्ष किंवा नेत्यासोबत आपली निष्ठा घट्ट असल्याचे दाखविण्याकरिता ‘कार्यकर्ता’ एकमेकांना भिडतो. मात्र राजकारणात सत्तेकरिता अनेकदा स्वार्थी युती-आघाड्या होतात. पण, ठाण्यात बॉस-शेठ जसे एक तपाचे राजकीय वैर विसरून चुटकीसरशी एकत्र येतात तेव्हा खरी गोची होते ती कार्यकर्त्याची.


आम्ही आजही ते दिवस विसरलो नसल्याचे दोघांचे कार्यकर्ते सांगत आहेत. १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात आव्हाड आणि सरनाईक ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. २००८ साली सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. आव्हाडांकडे त्या मानाने तुलनेत कार्यकर्त्यांची फळी कमी होती. काही वेळेस या दोघांचे खंदे समर्थक आपसात भिडतानाही दिसून आले. ठाण्यात या दोघांमधील बॅनरवॉर चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. एकाच्या बॅनरवर दुसऱ्याने बॅनर लावणे, समोरासमोर बॅनर लावणे यावरून या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट आले होते. एकेकाळी जे आमचे मित्र होते, ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र खात-पीत होतो त्यांनाच अनेकदा शिवीगाळ केली. काही भागात त्यांचे कार्यकर्ते राहतात म्हणून तेथे गेलो नाही. पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची दमदाटी सहन केली. आता आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत, असे कार्यकर्ते म्हणाले.

मनाची तयारी नाही
आव्हाड-सरनाईक एकत्र आले तेव्हा कट्टर समर्थकांनी तेथे येण्याचे टाळले, असे कबूल केले. आजही आमच्या मनाची तयारी झालेली नाही. आव्हाड मंत्री आहेत. सरनाईकांनाही मंत्रिपदी पाहायचे आहे. दोघे मंत्री असताना एकत्र आले असते तर त्याचा जास्त आनंद झाला असता, असे सरनाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघे १२ वर्षे एकत्र असते तर आज ठामपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असती, असा दावा आव्हाड यांच्या पदाधिकाºयांनी केला. दोघांमधील वितुष्टाने त्यांचे व आमचे राजकीय नुकसान झाले. अशी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची भावना आहे.

Web Title: The activists were amazed by the jitendra awhad and pratap sarnaik meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.