सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करावी- नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:37 PM2020-01-14T13:37:54+5:302020-01-14T13:38:38+5:30

आज महापौर नरेश म्हस्के यांनी ‍अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची तातडीची बैठक घेतली.

Action should be taken against those cultivating vegetables on sewage - Naresh Mhaske | सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करावी- नरेश म्हस्के

सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करावी- नरेश म्हस्के

Next

ठाणे: रेल्वे ट्रॅकनजीकच्या जागेत तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून, या भाजीपाल्यांसाठी सांडपाणी मिश्रित अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, यानुसार आज महापौर नरेश म्हस्के यांनी ‍अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची तातडीची बैठक घेतली. दूषित पाणी वापरून भाज्यांची लागवड ठाणे शहरात ज्या ज्या  ठिकाणी होत आहे, त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश ‍महापौरांनी ‍दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेचे पहिले कर्तव्य असून, याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तक्रार केली असल्याचे महापौरांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका मालती पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत तसेच शहराच्या बहुतांश  ठिकाणी भाजीचे मळे आहेत, या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी तसेच गटाराचे पाणी देण्यात येते.

मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे असताना देखील याच सांडपाण्यावर अशा प्रकारे भाजीपाला पिकवून एक प्रकारे विविध रोग नागरिकांना दान स्वरुपात दिले जात आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास कळवा, मुंब्रा व दिवा तसेच ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समतानगर, गांधीनगर,सिडको, मफतलाल कंपाऊंड, परिसरात भाजीमळे असून यातून पिकविलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते, ही भाजी  ‍ पिकवण्यासाठी तसेच धुण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे,  अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळून भाज्यांची लागवड केली जात आहे, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून कॅन्सर, पोटाचे विकार, मेंदूचे विकार या सारख्या दुर्धर आजारांना या भाज्या सेवन केल्यामुळे सामोरे जावे लागत आहे.

याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून याची कसून चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य ‍विभागाला तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या सहाय्यक आयुक्तांना ‍दिले आहेत. अशा प्रकारे गलिच्छ ठिकाणी पिकविलेल्या भाज्यांची लागवड जे करीत असतील त्यांच्यावर कठोर पावले उचलून तातडीने कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे पहिले कर्तव्य आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या व अशा बेफिकीरपणे भाजीविकेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेने कोणतीही कसूर करु नये अशा सूचनाही महापौरांनी  प्रशासनाला दिल्या आहेत.

Web Title: Action should be taken against those cultivating vegetables on sewage - Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.